Saturday, February 22, 2025

वनामकृविच्या नांदेड येथील कृषी तंत्र विद्यालयात परिसर मुलाखती संपन्न

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची प्रेरणा

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या नांदेड येथील कृषी तंत्र विद्यालयातील कृषी पदविकाधारक विद्यार्थ्यांसाठी सांगलीच्या प्रतीक इंडस्ट्रीज द्वारे दिनांक २१ फेब्रुवारी रोजी परिसर मुलाखतीचे आयोजन करण्यात आले. या मुलाखती विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून आणि शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) डॉ. गजेंद्र लोंढे होते. यावेळी प्रतीक इंडस्ट्रीजचे संचालक श्री. प्रतीक शहा उपस्थित होते. मुलाखतींसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला, एकूण ६२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, यामध्ये १६ विद्यार्थिनींचा समावेश होता.

मुलाखतीच्या प्रक्रियेतून प्रतीक इंडस्ट्रीज सांगली यांनी कृषी विस्तार अधिकारी या पदासाठी एकूण आठ विद्यार्थी आणि दोन विद्यार्थिनींची निवड केली. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक रुपये तीन लक्ष मानधन देण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

सहयोगी अधिष्ठाता (शिक्षण) डॉ. गजेंद्र लोंढे म्हणाले की, कृषी पदविकाधारक विद्यार्थ्यांतून शेतीसाठी सक्षम मनुष्यबळ विकास करण्यासाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे प्रोत्साहन लाभते. त्यांच्या प्रेरणेतूनच असे उपक्रम राबविले जात आहेत असे नमूद करून या उपक्रमाचे कौतुक करत अशा संधी मराठवाड्यातील इतर कृषी तंत्र विद्यालयांमध्येही उपलब्ध व्हाव्यात, असे मत व्यक्त केले.  त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, निवड झालेल्यांनी अधिक प्रयत्न करून आपल्या क्षेत्रात भरारी घ्यावी आणि ज्यांची निवड झाली नाही त्यांनी खचून न जाता नव्या संधींसाठी मेहनत करावी.

प्रास्ताविकात प्राचार्य डॉ. नरेशकुमार जायेवार यांनी कृषी शिक्षणाच्या नव्या धोरणावर प्रकाश टाकला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा कृषी शिक्षणाकडे वाढता कल लक्षात घेता, त्यांना मातृभाषेतून शिक्षण देण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

प्रतीक इंडस्ट्रीजचे संचालक श्री. प्रतीक शहा यांनी नांदेड कृषी तंत्र विद्यालयाच्या शिक्षणाच्या दर्जाबाबत समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. प्रकाश सिंगरवाड, कनिष्ठ संशोधन सहाय्यक तथा प्रभारी शिक्षण श्री. विजय जाधव, कृषी सहाय्यक श्री. श्रीकृष्ण वारकड, वरिष्ठ लिपिक श्रीमती स्वाती ताटपल्लेवार, कनिष्ठ लिपिक श्रीमती महानंदा उत्तरवाढ, कनिष्ठ लिपिक श्रीमती माधवी कल्याणकर व कृषी तंत्र विद्यालय नांदेडच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.