वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी वनस्पतीशास्त्र विभागाला शिक्षण संचालक डॉ.
भगवान आसेवार यांनी ७ फेब्रुवारी (शुक्रवारी) रोजी भेट दिली. या भेटीदरम्यान
त्यांनी पदव्युत्तर व आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांच्या प्रयोगांसह कृषी
वनस्पतीशास्त्र आणि भाभा अनुसंशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने
उत्परिवर्तनाद्वारे रबी पिवळी ज्वारीमध्ये उच्च उत्पादन व गुणवत्तेत सुधारणा
करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रयोगांचे निरीक्षण केले.
या भेटीत त्यांनी रब्बी ज्वारी, पिवळी ज्वारी, लाह्या ज्वारी, मूग
आणि कंगणी– राळ (Foxtail Millet) यांच्या उत्परिवर्तन प्रजनन
संशोधनाचा आढावा घेतला. या प्रयोगांमधून विविध वाणांमध्ये अधिक उत्पादनक्षम,
प्रतिकूल हवामान सहन करणाऱ्या आणि रोगप्रतिरोधक वाणांच्या विकासावर
भर देण्यात येत आहे.
डॉ. आसेवार यांनी संशोधन प्रक्रियेबद्दल तपशीलवार माहिती घेतली आणि संशोधक व शास्त्रज्ञांशी संवाद साधून त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. या अभिनव संशोधनामुळे भविष्यात कृषी उत्पादनवाढीला मदत होणार असून, शेतकऱ्यांना अधिक टिकाऊ आणि उपयुक्त वाण उपलब्ध होण्याची शक्यता आहे.