Tuesday, February 4, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात 'अकॅडमिक मॅनेजमेंट सिस्टिम' (AMS) वर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न....

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात 'अकॅडमिक मॅनेजमेंट सिस्टिम' (AMS) या वेब-आधारित प्रणाली दिनांक ७ ऑक्टोबर २०२२ पासून लागू करण्यात आलेली आहे. ही प्रणाली शैक्षणिक कार्ये अधिक सुलभ व सुसंगत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

सध्या विद्यापीठाच्या १२ महाविद्यालयांनी 'अकॅडमिक मॅनेजमेंट सिस्टिम' वर नोंदणी केली असून, यावर्षी पासून नव्याने सुरवात केलेल्या चार महाविद्यालयाना या प्रणालीत समाविष्ट केले जाणार आहेत. या प्रणालीच्या माध्यमातून शैक्षणिक सेवा अधिक जलद, प्रभावी आणि पारदर्शक होणार असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यांचे ऑनलाइन कार्य करणे सोपे होणार आहे. तसेच, विद्याशाखीय कार्यक्षमतेत सुधारणा होऊन शिक्षक व विद्यार्थी यांचा वेळ व श्रम वाचणार आहेत.

या प्रणालीबाबत अधिक माहिती देण्यासाठी ४ फेब्रुवारी रोजी विद्यापीठात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, तसेच प्रमुख अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील भाकृअप –आयएएसआरआयच्या (IASRI-ICAR) संगणक विभागाचे प्रमुख डॉ. सुदीप मारवाह उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी 'अकॅडमिक मॅनेजमेंट सिस्टिम' प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे विद्यापीठातील शैक्षणिक प्रणाली अधिक मजबूत होईल व विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने शिक्षण घेण्यास मोठा फायदा होईल असे प्रतिपादन केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि विभाग प्रमुख डॉ. सुदीप मारवाह यांनीही मार्गदर्शन केले. कार्यशाळेत भाकृअप –आयएएसआरआयचे श्री. विभोर त्यागी 'अकॅडमिक मॅनेजमेंट सिस्टिम' प्रणालीच्या सर्व तांत्रिक बाबी विशद केल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन 'अकॅडमिक मॅनेजमेंट सिस्टिम'चे नोडल अधिकारी डॉ. रणजित चव्हाण यांनी केले व आभार प्रदर्शनही त्यांनी केले. कार्यशाळेत उप कुलसचिव (विद्या) डॉ गजानन भालेराव, मा. कुलगुरू यांचे तांत्रिक अधिकारी डॉ. प्रवीण कापसे, डॉ. संतोष फुलारी, डॉ. रवी शिंदे आदीनी सहभागी होवून यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. सर्व महाविद्यायाचे 'अकॅडमिक मॅनेजमेंट सिस्टिम' चे हाताळणी करणारे शिक्षण विभाग प्रमुखांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदविला.