वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठांतर्गत जिरेवाडी (ता. परळी वैजनाथ) येथे नव्याने स्थापन झालेल्या
कृषी महाविद्यालय आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयास माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक २५ फेब्रुवारी रोजी भेट दिली. त्यांच्या समवेत शिक्षण
संचालक डॉ. भगवान आसेवार,
विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, सहयोगी
अधिष्ठाता डॉ. संजीव बंटेवाड (अंबाजोगाई), डॉ. दिनेश सिंग
चौहान (जीरेवाडी), विद्यापीठ उपभियांता डॉ. दयानंद टेकाळे,
श्रीमती जयश्री मिश्रा, वैद्यनाथ शिक्षण
संस्थेचे अध्यक्ष श्री सदाशिवभाऊ आप्पा मुंडे, वैद्यनाथ महाविद्यालयाच्या
प्राचार्य श्रीमती अर्चना चव्हाण व उपप्राचार्य श्री पी. एल. कराड आदी मान्यवर
उपस्थित होते.
या दौऱ्यादरम्यान माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी महाविद्यालयाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा
घेतला व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांना
कठोर मेहनत,
जिद्द आणि शिस्त यांचा अवलंब करून अभ्यासात उत्तम कामगिरी करण्याचा
सल्ला दिला. "यश हे सततच्या प्रयत्नांतून मिळते. आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग
समाजाच्या आणि देशाच्या प्रगतीसाठी केला पाहिजे," असे
ते म्हणाले. त्यांनी विद्यार्थ्यांना नवनवीन संशोधन आणि नवोपक्रमांमध्ये सहभाग
घेण्यास प्रोत्साहित केले.
त्यानंतर त्यांनी
महाविद्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केली. "ही इमारत केवळ
विटा आणि सिमेंटची नव्हे,
तर ती ज्ञानाच्या पायावर उभी राहिली पाहिजे. इमारत मजबुतीने उभी
राहावी आणि येत्या शंभर वर्षांसाठी एक प्रेरणादायी शिक्षण मंदिर ठरावी,"
असे मार्गदर्शन त्यांनी दिले. वैद्यनाथ शिक्षण संस्थेचे इमारती मध्ये
विद्यापीठाचे महाविद्यालये सुरु करण्यासाठी
जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल माननीय कुलागुरुनी संस्थेचे अध्यक्ष श्री सदाशिवभाऊ
आप्पा मुंडे यांचे आभार मानले.
विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर यांनी बांधकामाच्या प्रगतीचा आढावा सादर केला, तर सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिनेश सिंग चौहान यांनी शैक्षणिक कार्याचा अहवाल सादर केला. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. विनोद शिंदे यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानले.