शिवरायांचा आदर्श – विद्यापीठाची प्रेरणा !... माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील विद्यार्थी कल्याण अधिकारी कार्यालयाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि हे होते. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व आदरपूर्वक अभिवादन करण्यात आले.
विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांनी मागील आठवड्यापासूनच शिवजयंती
उत्सवाची सुरुवात केली होती. या निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिरे
तसेच विद्यार्थी व प्राध्यापकांच्या सहभागाने अनेक उपक्रम राबविण्यात आले. १९
फेब्रुवारी रोजी विद्यापीठात भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले. सकाळी "जय
शिवाजी, जय भारत" पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र
मणि, संचालक, सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख,
प्राध्यापक, अधिकारी, विद्यार्थी
आणि अन्य कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य व त्यांचे प्रशासन कौशल्य याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा साम्राज्याची अस्मिता जगभर पोहोचवली. त्यांनी जनतेची गुलामगिरीतून मुक्तता करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ते उत्तम प्रशासक होते आणि त्यांनी धार्मिक सहिष्णुतेचे पालन केले. कुशल प्रशासन हे राज्याची सुरक्षा तर करतेच, पण आर्थिक व सामाजिक विकासालाही चालना देते. यावेळी त्यांनी शिवाजी महाराजांच्या अंगी असलेल्या सर्व गुण विशेषांचे वर्णन केले. विद्यापीठाच्या कर्मचारी, अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी महाराजांचे गुण अंगीकारून पुढे चालावे आणि जीवन यशस्वी बनवावे, हाच खरा छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान आहे असे प्रतिपादन केले.
कृषि क्षेत्रातील महाराजांच्या योगदानाचा उल्लेख करतांना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि म्हणाले की, शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी अनेक सुधारणा केल्या. सिंचन सुविधा वाढवल्या आणि शेतकऱ्यांचे शोषण थांबवले. विद्यापीठ देखील या आदर्शावर आणि प्रेरणेतून कार्य करत असून, महाराष्ट्रात विद्यापीठाने शिफारस केलेल्या मॉडेलचा शेततळ्यांची निर्मिती करिता केला जात आहे. कोरडवाहु शेती संशोधनातील योगदानामुळे विद्यापीठाच्या कोरडवाहू शेती संशोधन केंद्रास पुरस्कर प्राप्त झाला असून, शासनाने एक कोटींचा विशेष निधी मंजूर केला आहे. याशिवाय, विद्यापीठाच्या संशोधनाद्वारे विकसित केलेला गोदावरी तुरीचा वाण राष्ट्रीय स्तरावर क्रांती घडवत आहे. नुकत्याच पार पडलेल्या अयोध्येतील भारतीय कृषि विद्यापीठांच्या ४८व्या कुलगुरू संमेलनात महाराष्ट्रातील कृषि पर्यटन उपक्रमांची प्रशंसा करण्यात आली. पुढील संमेलन परभणी येथे जुलै-ऑगस्टमध्ये होणार असून, लवकरच विद्यापीठात कृषि पर्यटन प्रकल्प स्थापन केला जाणार आहे, असे त्यांनी नमूद केले.
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी
महाराजांचे गुण आत्मसात करावेत, असे सांगितले. कुलसचिव श्री. संतोष वेणीकर यांनी
विद्यार्थ्यांनी महाराजांचा आदर्श घेऊन आनंदी व यशस्वी जीवन घडवावे, असे मत व्यक्त केले.
विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम यांनी मागील आठवड्यात विद्यापीठात
पार पडलेल्या शिवजयंती उपक्रमांची माहिती दिली. कृषि महाविद्यालयाच्या लेझीम
पथकाने प्रभावी सादरीकरण केले, ज्याचे कुलगुरूंनी विशेष कौतुक केले. विविध सांस्कृतिक
कार्यक्रम आणि क्रीडा स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना
प्रमाणपत्रे, पदके व प्रेरणादायी पुस्तके देऊन सन्मानित करण्यात
आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चौथ्या वर्षातील विद्यार्थी किशोर जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन कृषि महाविद्यालयाचे जिमखाना उपाध्यक्ष डॉ. आर. जी. भाग्यवंत यांनी मानले. या प्रसंगी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, नियंत्रक श्री. प्रवीण निर्मळ, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, डॉ. जया बंगाळे, डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. गजेंद्र लोंढे, डॉ. राहुल रामटेके आणि विविध विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.