वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागाचे प्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी मौजे किन्होळा (ता. पाथरी) येथे शेतकऱ्यांना कांदा बीजोत्पादन उत्पादन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले. परभणी जिल्हा कृषि विभागाच्या कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेद्वारे शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद व प्रक्षेत्र भेटी अंतर्गत कांदा बीजोत्पादन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ६ फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमात कांदा बिजोत्पादनामधील परागीकरण व्यवस्थापन या महत्वाच्या तंत्रज्ञानासह जमीन, बियाणे निवड, अन्नद्रव्य, सिंचन, कीड, रोग व्यवस्थापन याबाबत डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात कृषि विज्ञान
केंद्राचे किटक शास्त्रज्ञ श्री. अमोल काकडे आणि प्रगतशील शेतकरी श्री. शिवाजी
घुले यांनीही उपस्थित राहून शेतकऱ्यांना महत्त्वपूर्ण सल्ले दिले. तज्ज्ञांनी
शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देवून कांदा पिकांची पाहणी करून योग्य अशा उपयोजना
सुचविल्या. कांदा बीजोत्पादनामध्ये लागवडीपासून ते काढणीपर्यंत घ्यावयाच्या
काळजीविषयी विशेष मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तालुका कृषि अधिकारी श्री. गोविंद कोल्हे, मंडळ कृषि अधिकारी श्री. पांडुरंग गोरे यांनी पुढाकार घेतला. यावेळी कृषि विभागाचे सर्व क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मौजे किन्होळा गावातील कांदा बीजोत्पादन करणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
शेतकऱ्यांनी या कार्यक्रमातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून कांदा बीजोत्पादन वाढवण्याचा संकल्प केला. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार असून कृषि क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास चालना मिळणार आहे.