वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वित करडई
संशोधन प्रकल्प आणि हैदराबाद येथील भारतीय तेलबिया संशोधन संस्था यांच्या संयुक्त
विद्यमाने "करडई शेती दिन" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम
दिनांक ११ फेब्रुवारी रोजी आंबेगाव रोड (ता. मानवत) येथील प्रगतशील शेतकरी श्री.
वसंतरावजी लाड यांच्या शेतात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संशोधन संचालक माननीय डॉ. खिजर बेग होते. प्रमुख
पाहुणे म्हणून सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत काळपांडे, हैदराबाद येथील
भारतीय तेलबिया संशोधन संस्थेचे प्रमुख अन्वेषक डॉ. कदीरवेल पी, तांडूर (तेलंगणा) कृषी संशोधन संस्थेचे विभाग प्रमुख डॉ. सी. सुधाकर,
अन्नेगिरी (कर्नाटक) कृषी संशोधन संस्थेचे वनस्पती रोगशास्त्रज्ञ
डॉ. एस. एन. होटकर, हैदराबाद येथील शास्त्रज्ञ डॉ. हर्षा आणि
परभणीचे शास्त्रज्ञ डॉ. एस. बी. घुगे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी करडई
उत्पादन तंत्रज्ञान, सुधारित वाणे, पेरणी पद्धती, कीड
व रोग व्यवस्थापन तसेच उत्पादनवाढीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान याबद्दल सखोल माहिती
दिली.
डॉ. कदीरवेल, डॉ. सुधाकर सी आणि डॉ. होटकर यांनी शेतकऱ्यांना करडई पिकाच्या उच्च
उत्पादनासाठी तांत्रिक मार्गदर्शन केले. तज्ज्ञांनी करडई पिकासाठी शेती व्यवस्थापन,
सुधारित बियाणे, खतांचा संतुलित वापर, सिंचन तंत्रज्ञान आणि संभाव्य कीड-रोग प्रतिबंधन यावर सविस्तर माहिती
दिली.तसेच करडई पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी अशा वैज्ञानिक दृष्टिकोनातून
मार्गदर्शन करणाऱ्या उपक्रमांची गरज असल्याचे मत कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. आर. आर. धुतमल यांनी केले. शेतकरी
बांधवांनीही या कार्यक्रमादरम्यान आपले अनुभव आणि मनोगत व्यक्त केले. या
उपक्रमातून करडई उत्पादनवाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, संशोधित बियाणे आणि शेतकऱ्यांसाठी
उपयुक्त माहिती मिळाल्याने शेतकरी आनंदी दिसले. "करडई
उत्पादन वाढविण्यासाठी असे उपक्रम गरजेचे असून, संशोधन
संस्थांनी अधिकाधिक सुधारित माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी," अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
सूत्रसंचालन डॉ. एस. एस. शिंदे आणि डॉ. एस. एस. शिलेवंत यांनी केले, तर आभार डॉ. सी.
व्ही. अंबाडकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी प्रगतिशील शेतकरी श्री. वसंतरावजी लाड आणि श्री. प्रतापरावजी सोरेकर यांनी महत्त्वाचा पुढाकार घेतला. तसेच डॉ. व्ही. आर. घुगे, श्री. व्ही. एम. पांचाळ, श्री. मगर आणि इतर कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले.