महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेनेचा तसेच शिक्षणाच्या विचाराचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा... माननीय कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राद्वारे शेतकरी प्रशिक्षण व निविष्ठा वाटप कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १० फेब्रुवारी रोजी मौजे अंबाडी (ता. किनवट) येथे करण्यात आले. हा कार्यक्रम विद्यापीठातंर्गत असलेल्या भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या अखिल भारतीय कापूस संशोधन परियोजनेच्या ‘अनुसूचित जाती उपयोजना (Scheduled Caste Sub Plan – SC SP)’ अंतर्गत राबविण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि होते. विशेष अतिथी म्हणून संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, नांदेडचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. दत्तकुमार कळसाईत, सरपंच श्रीमती शीतल जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात माननीय
कुलगुरू प्रा (डॉ.) इन्द्र मणि यांनी गौतम बुद्धांचे प्रज्ञा, शील व
करुणा आणि महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेनेचा तसेच शिक्षणाच्या
विचाराचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा आणि कृषी क्षेत्रातील नवतंत्रज्ञान अवगत करून
परस्पर सहकार्य वाढवण्यासाठी संघटित होऊन, आपल्या जीवनात उन्नती साधावी असा संदेश
दिला. तसेच नांदेड येथील कापूस संशोधन केंद्राची गौरवशाली परंपरा असून, देशी व
अमेरिकन कापसाचे अनेक संकरीत व सरळ वाण येथे विकसित करण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी
या संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांशी नियमित संपर्क ठेवावा, असे त्यांनी प्रतिपादन केले.
संशोधन संचालक डॉ. खिजर
बेग यांनीही शेतकऱ्यांना कापूस उत्पादनात सुधारणा करण्यासाठी विविध आधुनिक तंत्रज्ञानाची
माहिती दिली. विद्यापीठ हे सदैव शेतकाऱ्यासाठी तंत्रज्ञान प्रसारासाठी कटिबद्ध असून
शेतकऱ्यानी त्याचा उपयोग करावा, असे नमूद केले.
श्री. बालाजी मुंढे यांनी
महाराष्ट्र शासन, कृषि विभाग यांच्या विविध उपक्रमाची माहिती दिली व शासन सदैव शेतकऱ्याच्या
हितासाठी प्रयत्नशील राहील अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे प्रास्तविक सहयोगी
कृषी विद्यावेत्ता डॉ. अरविंद पांडागळे यांनी केले
या कार्यक्रमादरम्यान निविष्ठा
वाटपाचा लाभ सहभागी १२० शेतकऱ्यांनी घेतला. उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या
शंका समाधान करून त्यांना योग्य मार्गदर्शन दिले. हा कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी
उपयुक्त ठरला असून भविष्यातही अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे, अशी
मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रेमानंद कानिंदे यांनी केले तर आभार योजनेचे समन्वयक डॉ. बस्वराज भेदे यांनी मानले. यावेळी संशोधन उपसंचालक डॉ. गजेंद्र जगताप, विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ पावन ढोके, डॉ. संजय देवकुळे, उपविभागीय कृषी अधिकारी श्री. राजकुमार रणविर तसेच विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आणि कृषि विभागाचे अधिकारी बहुसंखेने उपस्थित होते.