वनामकृविचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे प्रमुख व्याख्यान आणि तज्ज्ञ पॅनेल चर्चेमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका
कुमारगंज, अयोध्या (उत्तर प्रदेश) येथील आचार्य नरेंद्र
देव कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील भारतीय कृषि विद्यापीठ
संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १३-१४
फेब्रुवारी २०२५ रोजी भारतीय कृषि विद्यापीठांच्या ४८व्या कुलगुरू अधिवेशनाचे
आयोजन कुमारगंज, अयोध्या येथे करण्यात आले होते. यावर्षी
अधिवेशनाची प्रमुख संकल्पना "भारतामध्ये कृषि-पर्यटन: शिक्षण व ग्रामीण विकास
यांच्यातील दुवा" अशी होती.
या राष्ट्रीय पातळीवरील महत्त्वपूर्ण
अधिवेशनात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांनी प्रमुख व्याख्यान दिले आणि तज्ज्ञ पॅनेल चर्चेमध्ये महत्त्वपूर्ण
भूमिका बजावली. त्यांच्या व्याख्यानामध्ये भारतातील कृषि-पर्यटनाची संकल्पना, त्याच्या संभाव्य संधी, ग्रामीण भागातील विकास आणि शैक्षणिक
क्षेत्रासोबतचा त्याचा संबंध याविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
भारतामध्ये महाराष्ट्र राज्याने सर्वप्रथम कृषि-पर्यटन संकल्पना स्वीकारली असून, राष्ट्रीय स्तरावर या उपक्रमाची प्रशंसा करण्यात आली. प्रत्येक तालुक्यात एक कृषि-पर्यटन केंद्र स्थापन करणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. तसेच, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथे जुलै-ऑगस्ट २०२५ दरम्यान कृषि-पर्यटन विषयक परिसंवाद आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबरोबरच अधिवेशनात उत्कृष्ट पीएच.डी. प्रबंध आणि सर्वोत्तम प्राध्यापक पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला असल्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले.
या अधिवेशनात देशभरातील विविध कृषि
विद्यापीठांचे सन्माननीय कुलगुरू यांची उपस्थिती होती. कृषि-पर्यटनाच्या
माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्याचे विविध उपाय यावेळी चर्चिले
गेले. माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे या
क्षेत्रातील संशोधन आणि धोरणे अधिक प्रभावीपणे राबवण्याच्या दृष्टीने मौलिक
विचारमंथन घडले. यामुळे त्यांच्या आचार्य नरेंद्र देव कृषि आणि तंत्रज्ञान
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. बिजेंद्र सिंह यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देवून सन्मान
करण्यात आला. या अधिवेशनामुळे कृषि-पर्यटनासंबंधी नव्या संधी उघडण्यास मदत होईल
आणि ग्रामीण भारताच्या सर्वांगीण विकासात सकारात्मक योगदान देईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.