वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठांतर्गत अंबाजोगाई येथील कृषी महाविद्यालयात क्रीडा व सांस्कृतिक
महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले. दिनांक २५ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाचे
कुलगुरू माननीय प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते या महोत्सवाचे उद्घाटन
करण्यात आले.
याप्रसंगी माननीय
कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले युवकांमध्ये
असलेला सळसळता उत्साह क्रीडा व कलेच्या माध्यमातून प्रभावीपणे व्यक्त होतो. यामुळे
त्यांना नव्या प्रेरणा मिळतात आणि त्यांची ऊर्जा अधिक वृद्धिंगत होते. खेळामुळे
सांघिक भावना,
बंधुभाव आणि सजग समाजभान निर्माण होते, तर
सांस्कृतिक कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव देतात. अशा उपक्रमांमुळे
व्यक्तिमत्त्व विकासास मदत होते आणि विद्यार्थी सर्वांगाने सक्षम बनतात.
कार्यक्रमास विद्यापीठाचे
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. संजीव बंटेवाड, डॉ. दिनेशसिंह
चौहान, श्रीमती जयश्री मिश्रा, विद्यापीठ
उपअभियंता डॉ. दयानंद टेकाळे, विस्तार विद्यावेत्ता डॉ. वसंत
सुर्यवंशी, प्राचार्य डॉ. एम. आय. खळगे आदी मान्यवर उपस्थित
होते.
प्रास्ताविक सहयोगी
अधिष्ठाता डॉ. संजीव बंटेवाड यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.
योगेश वाघमारे यांनी करून आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील
प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी आणि
विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा
उत्साह विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण करणारा ठरला.
