Monday, February 17, 2025

शेतकरी केंद्रित संशोधन, विस्तार आणि विकास कार्यक्रम हवा - माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 २३ वी वैज्ञानिक सल्लागार समिती बैठक संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील कृषी विज्ञान केंद्राद्वारे २३ वी वैज्ञानिक सल्लागार समिती बैठक दिनांक १७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची ऑनलाईन उपस्थिती होती.

या बैठकीत विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. प्रकाश देशमुख, सहयोगी संशोधन संचालक डॉ. सूर्यकांत पवार, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी श्री. प्रकाश पाटील, लीड बँक व्यवस्थापक श्री. मंगेश केदार, विभागीय वनविकास अधिकारी श्रीमती कीर्ती जमदाडे, प्राचार्य डॉ. पंडित मुंडे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी श्रीमती मनीषा हराळ, सहाय्यक मत्स्यविकास अधिकारी श्रीमती पवार, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक श्री. चंदनसिंग राठोड आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषी विद्यापीठ, कृषी विभाग आणि जिल्ह्यातील कृषी संलग्नित सर्वच विभागांनी शेतकरी केंद्रित संशोधन, विस्तार आणि विकास कार्य करावे, असे मत व्यक्त केले. तसेच, सर्व विभागांनी एकाच व्यासपीठावर येऊन प्रत्याभरणावर आधारित शेतकऱ्यांसाठी नियोजन करण्यासाठी वैज्ञानिक सल्लागार समिती बैठक आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यापीठाने विकसित केलेल्या तुरीच्या गोदावरीसारख्या चांगल्या वाणांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी येत असून, हवामानाशी सुसंगत नवीन वाण विकसित करण्यासाठी विद्यापीठ प्रयत्नशील आहे. हे तंत्रज्ञान प्रभावीपणे अवलंबण्यासाठी विद्यापीठामार्फत विस्तार कार्यक्रमांमध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरिधारी वाघमारे यांनी बैठकीत दिलेल्या सूचनांचे अवलोकन करून त्यानुसार पुढील कार्य अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच, केंद्राद्वारे घेण्यात आलेल्या विविध चाचण्यांचे निष्कर्ष इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहित करावे, असे त्यांनी सांगितले. भविष्यात शेतकऱ्यांच्या गरजेनुसार विविध प्रशिक्षण आणि विस्तार कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे त्यांनी सुचवले.

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवण्यात येत असून, त्याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. प्रकाश देशमुख यांनी केले. याशिवाय, कार्यक्रमात डॉ. सूर्यकांत पवार, श्री. मंगेश केदार, श्रीमती कीर्ती जमदाडे यांनीही मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रम समन्वयक डॉ. दीप्ती पाटगावकर यांनी मागील दोन वर्षांतील विविध विस्तार कार्यांचा अहवाल सादर केला. यावेळी उपस्थित प्रगतशील शेतकरी आणि कृषी उद्योजकांनी प्रत्याभरणे दिली आणि त्यानुसार सर्व विभागांनी कार्य करावे, असे मत व्यक्त केले. यावेळी वैज्ञानिक सल्लागार समिती बैठकीचे सदस्य प्रगतशील शेतकरी श्री. जगन्नाथ तायडे, श्रीमती सुनंदा क्षीरसागर, श्रीमती शारदा कागदे, श्री. कय्युम शेख, श्रीमती छाया साबदे आदींची उपस्थिती होती.

कृषी विज्ञान केंद्राद्वारे प्रशिक्षित प्रगतशील शेतकरी कृषी उद्योजकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बस्वराज पिसुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. अनिता जिंतूरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केव्हीकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी नियोजन केले.