भरड धान्याचे आहारात विशेष महत्व!... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा
कृषी विद्यापीठात भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या हैदराबाद येथील अखिल भारतीय
समन्वित संशोधन प्रकल्प (ज्वार व श्री अन्न) आणि परभणीच्या ज्वार संशोधन केंद्र
यांच्या संयुक्त विद्यमाने अनुसूचित जाती उप प्रकल्प अंतर्गत "पोषक भरड धान्य
लागवड" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा २७ फेब्रुवारी रोजी यशस्वीरित्या
संपन्न झाली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि होते.
कार्यशाळेला विद्यापीठाचे
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, तसेच हैदराबाद येथील अखिल भारतीय समन्वित संशोधन प्रकल्पाचे प्रकल्प
समन्वयक डॉ. मधुसुधन यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू
प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यापीठातील शास्त्रज्ञ आणि कर्मचाऱ्यांचे विशेष
कौतुक केले. भरड धान्याचे आहारात विशेष महत्व आहे असे नमूद करून त्यांनी भरड
धान्यांच्या आहारातील महत्त्वावर प्रकाश टाकत विद्यापीठाने विकसित केलेल्या 'परभणी
शक्ती' (ज्वार) आणि 'एएचबी १२०० व
एएचबी १२६९' (बाजरी) या जैव संपृक्त वाणांची महत्ता स्पष्ट
केली. यामध्ये लोह व जस्त यांसारख्या पोषकतत्त्वांचे प्रमाण अधिक असल्याने ही वाणे
शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच भरड धान्य लागवडीसाठी अधिक संशोधन आणि विस्तारकार्य
आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, अखिल भारतीय
समन्वित संशोधन प्रकल्पामार्फत या क्षेत्राला आवश्यक आर्थिक सहाय्य मिळावे,
अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य
शास्त्रज्ञाना लाभत आहे. तेव्हा शास्त्रज्ञानी आणि शेतकऱ्यांनीही या संधीचे सोने करावे
असे प्रतिपादन केले .
संशोधन संचालक डॉ. खिजर
बेग यांनी शास्त्रज्ञांनी चिकाटीने संशोधन करत ज्वारीचे क्षेत्र वाढवण्याचे
महत्त्व स्पष्ट केले. तसेच,
प्रकल्प समन्वयक डॉ. मधुसुधन यांनी ज्वार संशोधन केंद्राच्या
कार्याचे कौतुक करून भविष्यात दुय्यम भरड धान्यांवर अधिक प्रात्यक्षिके घेण्याची
गरज व्यक्त केली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते
अनुसूचित जाती उप प्रकल्पाच्या ५० लाभार्थ्यांना शेती साहित्याच्या किट वितरीत करण्यात
आल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्वार पैदासकार डॉ. लक्ष्मण जावळे यांनी केले. यावेळी सहयोगी अधिष्ठाता डॉ. वासुदेव नारखेडे, विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, शास्त्रज्ञ डॉ. गोदावरी पवार, डॉ.अनंत लाड आणि डॉ. रामप्रसाद खंदारे यांची उपस्थिती होती
सूत्रसंचालन डॉ. प्रितम भुतडा यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. महेश
दडके यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ.
मिलिंद सोनकांबळे, डॉ. गणपत कोटे, कृषि विभागाच्या श्रीमती स्वाती घोडके तसेच ज्वार संशोधन केंद्राच्या सर्व
अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.