वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या परिसरात छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या उभारणी रीन्युवेबल एनर्जी सर्व्हिस कंपनी मोड (RESCO Mode) अंतर्गत पूर्णत्वास आलेला आहे. याद्वारे विद्यापीठाची प्रशासकीय इमारत तसेच मुख्यालयातील महाविद्यालयांच्या इमारतींच्या छतावर ५०० किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. या प्रकल्पाचे उद्घाटन माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इंद्र मणि यांच्या हस्ते दिनांक २५ फेब्रुवारी रोजी करण्यात आले.
या प्रसंगी बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.)
इन्द्र मणि यांनी सांगितले की, हा प्रकल्प विद्यापीठासाठी
पथदर्शी ठरणार असून, सौर उर्जेचे महत्त्व अधोरेखित करेल. सौर ऊर्जा ही आजच्या काळातील सर्वाधिक स्वच्छ, पुनर्नवीनीकरणीय आणि दीर्घकालीन टिकणारा अक्षय
ऊर्जा स्रोत आहे. प्रदूषणमुक्त आणि कमी खर्चिक असलेल्या या ऊर्जेचा उपयोग
वाढविणे काळाची गरज बनली आहे. भारतात मुबलक प्रमाणात सूर्यप्रकाश उपलब्ध
असल्यामुळे सौर ऊर्जा निर्मितीला मोठा वाव असून अक्षय ऊर्जा मध्ये मोठ्या प्रमाणात
कार्य करण्याची गरज आहे. सूर्य आणि चंद्र हे खरे अक्षय ऊर्जेचे स्त्रोत आहेत. त्यांचा
वक्तशीरपणा अनमोल असून तो सर्वांनी अंगीकारावा, सौर ऊर्जेचा वापर म्हणजेच खरी
सूर्याची पूजा असे यावेळी माननीय कुलागुरुनी प्रतिपादन केले. ते पुढे म्हणाले की, या
प्रकल्पामुळे विद्यापीठाच्या वीज खर्चात ५० ते ६० टक्के बचत होणार असून, त्यामुळे विद्यापीठाची आर्थिक बचत होईल. विद्यापीठाच्या परभणी येथील
मुख्यालय तसेच बाहेरील कार्यालयास विद्युत बिलाचा खर्च शून्य व्हावा, या दृष्टीने सर्व ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प पूर्व क्षमतेने
उभारण्यात येतील. याबरोबरच “विजेची बचत म्हणजेच वीज निर्मिती”
असे सांगून विजेची बचत करण्यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी व आवश्यकतेनुसारच विजेचा
वापर करावा. यासाठी त्यांनी “तुम्हाला आराम आणि थंडावा मिळण्यासाठी मी जळत आहे”, “बाहेर
जाताना माझे बटन बंद करा” असे विद्युत बचतीसाठी वाक्य प्रत्येक कार्यालयात आणि विजेचा
उपकरणा जवळ लावून मोहीम उभारण्याचे आवाहन केले.
यावेळी सौर प्रकल्पाविषयी अपारंपारिक ऊर्जा
विभाग प्रमुख तथा सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहूल रामटेके यांनी माहिती दिली.
सौर प्रकल्प उभारणीचे कार्य ठाणे येथील मे.
इ ऊर्जा इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीद्वारे करण्यात येत आहे. सध्या ५०० किलोवॅट
क्षमतेचा प्रकल्प उभारला जात असला, तरी
भविष्यात ६४० किलोवॅट पर्यंत सौर ऊर्जा क्षमता वाढविण्याचे प्रस्तावित आहे.
विद्यापीठ आणि कंपनी यांच्यात पुढील पंचवीस वर्षांसाठी दर युनिट रु. ४.९९ प्रमाणे
वीज खरेदी करार करण्यात आला आहे. या कालावधीत देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी
कंपनीची असेल. तसेच, कंपनी विद्यापीठाला कार्बन क्रेडिट
मिळवून देण्यासाठीही मदत करणार आहे.
उद्घाटन प्रसंगी विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी वाघमारे, संशोधन संचालक डॉ खिजर बेग, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, सहयोगी अधिष्ठाता डॉ. सय्यद इस्माईल, अपारंपारिक ऊर्जा विभाग प्रमुख तथा सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहूल रामटेके, विभाग प्रमुख डॉ राजेश कदम, उप अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, कनिष्ठ विद्युत अभियंता अनिल जोधळे, इ - ऊर्जा कंपनीचे प्रतिनिधी श्री. पुर्वांक शहा आणि श्री प्रशांत तिवारी आदी मान्यवर यांच्या सह अभियंता कार्यालयाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.