Friday, February 21, 2025

महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शनीचे उद्घाटन माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते

 


परभणी विधानसभेचे आमदार माननीय डॉ. राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून यशस्विनी महिला उद्योजिका संस्था यांच्या वतीने महिला बचत गट व महिला गृहउद्योगिकांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे विक्री व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान जागृती मंगल कार्यालय, परभणी येथे सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांच्या हस्ते २१ फेब्रुवारी रोजी संपन्न झाले. या प्रसंगी माजी कुलगुरू माननीय डॉ. वेदप्रकाश पाटील अध्यक्षस्थानी होते. तसेच संस्थेच्या डॉ. संप्रिया पाटील आणि अंबिका डहाळे व्यासपीठावर उपस्थित होत्या.

उद्घाटनप्रसंगी बोलताना माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि यांनी महिला बचत गटाचे महत्त्व विशद केले. महिलांनी उद्योजक बनण्याचा मार्ग स्वीकारावा आणि स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न करावा, असे मार्गदर्शन त्यांनी केले. तसेच, महिला उद्योगनिर्मितीला चालना देण्यासाठी अशा प्रदर्शनांची गरज आणि उपयोगिता त्यांनी अधोरेखित केली. यावेळी त्यांनी प्रदर्शनातील दालनास भेट देवून दालन धारकांना प्रोत्साहन दिले.

अध्यक्षीय भाषणात माजी कुलगुरू माननीय डॉ. वेदप्रकाश पाटील यांनी महिलांच्या स्वावलंबनावर भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की, महिलांनी फक्त नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर व्हावे. आज महिलांना प्रत्येक क्षेत्रात संधी उपलब्ध असून, त्यांना आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवण्याची संधी आहे. त्यांनी कौटुंबिक जबाबदारी सांभाळत उद्योगशील बनण्याचे आवाहन केले.

यावेळी डॉ. संप्रिया पाटील म्हणाल्या की, गृहिणींनी रिकाम्या वेळेचा उपयोग करून घरगुती व्यवसाय सुरू करावा, जेणेकरून त्या अर्थिकदृष्ट्या सक्षम होतील आणि कुटुंबाला हातभार लावू शकतील. त्यांनी हेही नमूद केले की, बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी तयार केलेल्या वस्तूंना स्थानिक बाजारपेठ मिळावी आणि "परभणीतील पैसा परभणीतच खेळता राहावा" यासाठी हा पुढाकार घेतला आहे.

या प्रदर्शनात ९० दालने उभारली असून यामध्ये महिलांनी तयार केलेले खाद्यपदार्थ, गृहसौंदर्याच्या वस्तू आणि इतर गृहउपयोगी उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन महिला उत्पादकांच्या हस्तनिर्मित वस्तू खरेदी कराव्यात, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.