वनामकृवि आणि परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त उपक्रम
परभणी | वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ आणि परभणी
ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने स्कुल कनेक्ट अभियानांतर्गत परभणीतील
पहिली विज्ञानजत्रा आयोजित करण्यात आली आहे. ८ फेब्रुवारी (शनिवार)
रोजी सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत ही विज्ञानजत्रा विद्यापीठातील मुख्य प्रशासकीय
इमारतीच्या मागील बाजुस असलेल्या आंतरराष्ट्रीय विज्ञान संकुल येथे पार पडणार
आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय कुलगुरू डॉ इन्द्र मणि यांच्या हस्ते होणार असून
माननीय आमदार डॉ राहुल पाटील हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
विज्ञानजत्रेत विविध शाळांचे विद्यार्थी अन्न, आरोग्य
व स्वच्छता, वाहतूक व दळणवळण, आपत्ती
व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, नैसर्गिक
शेती, संसाधन व्यवस्थापन, रोबोटिक्स
व गणितीय मॉडेल्स अशा विविध विषयांवर प्रकल्प व प्रयोग सादर करणार आहेत. तसेच
वनामकृवि विद्यापीठाचे संशोधन प्रकल्प आणि तंत्रज्ञान मॉडेल्स यामध्ये आकर्षणाचा
केंद्रबिंदू असतील. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार विद्यापीठाच्या स्कुल
कनेक्ट अभियांनांतर्गत हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
विज्ञानप्रेमींसाठी येथे आनंदनगरी, तारांगण, लहान
मुलांसाठी खेळ, ब्रह्मांड संकल्पना, दिवसाउजेडीचे
खगोल निरीक्षण, ड्रोन तंत्रज्ञान, , कृत्रिम
बुद्धिमत्ता आणि रोबोट, विज्ञान प्रयोगशाळा साहित्य प्रदर्शन आणि पुस्तक
प्रदर्शन-विक्री अशी विविध दालने असणार आहेत. परभणी आणि परिसरातील विद्यार्थी, शिक्षक, विज्ञानप्रेमी
आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विज्ञानजत्रेचा लाभ घ्यावा, असे
आवाहन परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी व विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रम
यशस्वीतेकरिता परभणी ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटीचे अध्यक्ष डॉ रामेश्वर नाईक आणि विद्यापीठाच्या
शिक्षण संचालक डॉ भगवान आसेवार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध समित्यांचे गठण करण्यात
आले आहे.