Monday, February 17, 2025

बालकांच्या कलाविष्काराचे सादरीकरण म्हणजे आनंदोत्सव!... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

 प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेचा टॅलेन्ट शो संपन्न 

  

परभणी : बालकांच्या कलाविष्काराचे सादरीकरण म्हणजे आनंदोत्सव असतो असे मत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी व्यक्त केले.  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील मानव विकास व कौटुंबिक अभ्यास विभागांतर्गत असणाऱ्या प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत आयोजित टॅलेंट शो उद्घाटन सोहळ्यात उपस्थितांना  मार्गदर्शन करताना त्यांनी आपले विचार मांडले. पालकांनी बालकांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्यातील सुप्त कलागुण विकसित करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असले पाहिजे. असे यावेळी त्यांनी विशद केले. तसेच बालकांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी त्यांचे संगोपन हे तणावरहित वातावरणात होणे नितांत गरजेचे असल्याने त्यानी यावेळी सांगून सर्व बालकांना त्यांच्या उज्वल भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मा. कुलगुरू यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती जयश्री मिश्रा, संचालक शिक्षण डॉ.  भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरधारी  वाघमारे आणि सामुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या सहयोगी अधिष्ठाता डॉ. जया बंगाळे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेतील टॅलेंन्ट शोच्या दोन दिवसीय कार्यक्रमात विशेष  अतिथी मा. श्री. संदिप बेंडसुरे, जिल्हा समन्वयक, चाईल्ड हेल्प लाईन महिला आणि बाल विकास विभाग, परभणी यांनी बालकांना असणाऱ्या हक्कांची उपस्थितांना जाणीव करुन दिली.  तसेच चाईल्ड हेल्प लाईन  ही बालकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असून त्याकरिता १०९८ या टोल फ्री क्रमाकांवर संपर्क करण्याचे त्यांनी आवाहन केले. या संपूर्ण शैक्षणिक वर्षात नवीन शैक्षणिक धोरणानुसार राबवल्या गेलेल्या उपक्रमांचा आढावा डॉ. जया बंगाळे यांनी आपल्या प्रास्ताविकात सादर केला. या  दोन दिवसातील स्नेहसंम्मेलनात विद्यार्थ्यांनी वैविध्यपूर्ण कलाविष्कार जसे की, देशभक्तिपर गीत, शास्त्रीय नृत्य, लोकनृत्य, नाटिका, लेझीम, वेशभुषा,  बालगीते, कोळी नृत्य असे अनेक कलाप्रकार सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या समन्वयिका डॉ. नीता गायकवाड व डॉ. वीणा भालेराव  तसेच या शाळेच्या सर्व शिक्षिका व मदतनीस, महाविद्यालयातील कर्मचारी, पदवीपूर्व  व पदव्युत्तर विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. वीणा भालेराव आणि शिक्षिका  श्रुती औंढेकर यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी, पालक, प्राध्यापक व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.\