Thursday, July 23, 2026

माननीय मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वनामकृवित वृक्षारोपण

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत उद्यानविद्या विभागाच्या वतीने दिनांक २२ जुलै २०२६ रोजी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. राज्यभर विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री ना. श्री. देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला असून, त्याचाच एक भाग म्हणून हा पर्यावरणपूरक उपक्रम आयोजित करण्यात आला.

वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली झाले. यावेळी त्यांच्या हस्ते उद्यानविद्या विभाग परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षारोपणाचे महत्त्व अधोरेखित केले. वृक्ष लागवडीबरोबरच त्यांचे संगोपन करून हरित परिसर निर्माण करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे तसेच उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे आयोजन उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या उपक्रमांतर्गत आंब्याच्या विविध जातींची ४५० रोपे व जांभळाची ५० रोपे, अशी एकूण ५०० रोपांची लागवड करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कार्यक्रमास विभागातील प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृक्षारोपणानंतर उपस्थितांनी वृक्षसंवर्धनाची सामूहिक प्रतिज्ञा घेत पर्यावरण संरक्षणाचा संकल्प केला..





वनामकृवित बैलचलित सुधारित शेती अवजारे वाटप कार्यक्रमाचे आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत भा.कृ.अ.प.च्या अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण) यांच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या बैलचलित सुधारित शेती अवजारांचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २४ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता विद्यापीठातील पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण योजना येथे आयोजित करण्यात आला आहे.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांनी विकसित केलेल्या बैलचलित सुधारित शेती अवजारांवर आधारित कस्टम हायरिंग सेंटर श्री स्वामी समर्थ कृषि विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, दिंडोरी (जि. नाशिक) येथे स्थापन करण्यात येत असून, त्यासाठी या अवजारांचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे अल्पभूधारक व पारंपरिक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक, कमी खर्चिक व कार्यक्षम शेती अवजारांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे राहणार असून, श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी (प्रणित), नाशिक येथील प्रमुख कृषिशास्त्र विभागाचे मा. श्री. आबासाहेब मोरे (कृषिरत्न) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

यावेळी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, महाबीज, अकोला येथील महाव्यवस्थापक श्री. दिलीप स्वामी, कुलसचिव श्री. पुरषा काळे, विद्यापीठ अभियंता इंजी. दीपक कशाळकर, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव तसेच कार्यक्रम समन्वयक श्री. बाळासाहेब शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण) अंतर्गत करण्यात आले असून, संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, शास्त्रज्ञ (पशुविज्ञान) डॉ. संदेश देशमुख आणि वरिष्ठ संशोधन सहाय्यक इंजी. अजय वाघमारे यांनी शेतकरी, कृषि संस्था आणि संबंधितांनी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


वनामकृवितील संकरीत गो-पैदास प्रकल्पात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते ‘शुद्ध देशी देवणी गोवंशाचे पूजन’

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाच्या संकरीत गो-पैदास प्रकल्पात महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार दि. २२ जुलै २०२६ रोजी शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते शुद्ध देशी देवणी गोवंशाचे पूजन करण्यात आले.

संकरीत गो-पैदास प्रकल्पाची स्थापना सन १९७५ मध्ये या भागातील देशी जातीच्या गायींचे संकरीकरण करून दुग्धोत्पादन वाढविणे तसेच देशी गोवंशाचे जतन व संवर्धन करणे या उद्देशाने करण्यात आली. मराठवाड्यातील प्रसिद्ध देवणी ही देशी जात दुहेरी उपयुक्ततेसाठी (दुग्धोत्पादन व शेतीकाम) विशेष ओळखली जाते. सध्या या प्रकल्पावर होलदेव व देवणी जातींचा मिळून एकूण १६९ गोवंश असून, त्यापैकी ८७ जनावरे शुद्ध देवणी जातीची आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या कृषि, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाच्या शासन निर्णय क्र. पविआ-१०२५/प्र.क्र. ११५/पदुम-३, दि. १३ जून २०२५ नुसार राज्यात दरवर्षी २२ जुलै हा दिवस शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन’ म्हणून साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. देशी गायीच्या दुधाचे पोषणमूल्य तसेच शेण व गोमूत्राचे कृषि आणि पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन गायीस कामधेनू असे संबोधले जाते. महाराष्ट्रात देवणी, लाल कंधारी, खिल्लार, डांगी, कोकण कपिला, गवळाऊ व कठाणी अशा विविध देशी गोवंशाच्या जाती आढळतात. मात्र, देशी गोवंशाच्या संख्येत सातत्याने घट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शासनाने दि. २० सप्टेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार देशी गायीस राज्यमाता गोमाता’ म्हणून घोषित केले आहे.

यावेळी कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शुद्ध देवणी गोवंशाच्या संवर्धनाबरोबरच त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे निर्देश दिले. तसेच देशी गोवंशाचे संवर्धन हे शाश्वत शेती, पर्यावरण संरक्षण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमास संशोधन संचालक डॉ. भगवान असेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश आहिरे, पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभागाचे प्रमुख तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जी. के. लोंढे, सहयोगी प्राध्यापक तथा प्रभारी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्ता बैनवाड, डॉ. शंकर नरवाडे, डॉ. प्रभाकर पडघान, डॉ. रमेश पाटील, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. जी. पी. भोसले, कनिष्ठ संशोधन सहाय्यक श्री. रवी काळे, कृषि सहाय्यक श्री. विश्वंभर शिंदे, पशुधन पर्यवेक्षक श्री. महेंद्र कचरे, श्री. माणिक शिंदे तसेच पदव्युत्तर व आचार्य पदवीचे विद्यार्थी, कर्मचारी, मजूर बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




वनामकृवित मसाला व सुगंधी पिकांच्या विकास कार्यक्रमाचा आढावा; विस्तार व गुणवत्तापूर्ण लागवड साहित्य निर्मितीवर भर

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील उद्यानविद्या विभागामार्फत केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान (MIDHMission for Integrated Development of Horticulture) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या मसाला व सुगंधी पिकांच्या विकास कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी दिनांक २२ जुलै २०२६ रोजी बैठक आयोजित करण्यात आली. ही बैठक माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.

अध्यक्षीय मार्गदर्शनात माननीय कुलगुरूंनी मसाला व सुगंधी पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याची उपलब्धता, संशोधन व विस्तार यांच्यातील समन्वय अधिक बळकट करणे तसेच मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे नियोजन करण्यावर भर दिला. तसेच हा प्रकल्प समूहाधारित दृष्टिकोनातून (Cluster Approach) प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

बैठकीस संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे तसेच प्रकल्पाचे प्रमुख संशोधक व उद्यानविद्या विभागप्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रास्ताविकात डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी कार्यक्रमाची उद्दिष्टे, विविध केंद्रांवरील अंमलबजावणी, दर्जेदार लागवड साहित्य निर्मिती, मसाला व सुगंधी पिकांच्या सुधारित उत्पादन तंत्रज्ञानाचा प्रसार तसेच मराठवाड्यात या पिकांच्या क्षेत्रवाढीसाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. या प्रकल्पांतर्गत मसाला व सुगंधी पिकांचे गुणवत्तापूर्ण रोपवाटिका साहित्य उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांपर्यंत सुधारित तंत्रज्ञान पोहोचविणे आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाचे कार्यक्रम प्रभावीपणे राबविणे ही प्रमुख उद्दिष्टे असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी विभागातील अधिकारी व शास्त्रज्ञ उपस्थित होते. बैठकीत प्रकल्पाच्या विविध घटकांचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रात्यक्षिके, प्रशिक्षण कार्यक्रम, रोपवाटिका विकास, शेतकरी मार्गदर्शन आणि विस्तार उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

हा प्रकल्प विद्यापीठाच्या उद्यानविद्या विभागासह विविध संशोधन केंद्रे, मध्यवर्ती रोपवाटिका, कृषि महाविद्यालये आणि कृषि विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून राबविण्यात येत असून, मसाला व सुगंधी पिकांच्या उत्पादनवाढीसह शेतकऱ्यांना दर्जेदार लागवड साहित्य व सुधारित तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.




वनामकृवित लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले अभिवादन


लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे गुरुवार, दि. २३ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले. हा कार्यक्रम विद्यापीठाच्या सिम्पोजियम सभागृहात संपन्न झाला.

यावेळी संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे तसेच प्रशासकीय इमारतीतील विविध कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केले.

कार्यक्रमात लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रनिर्मिती, स्वातंत्र्यलढा, शिक्षण आणि समाजजागृतीतील अमूल्य योगदानाचे स्मरण करण्यात आले. उपकुलसचिव (सामान्य प्रशासन) श्री. पद्माकर पाटील यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनकार्याचा व राष्ट्रसेवेतील योगदानाचा परिचय उपस्थितांना करून दिला.




Wednesday, July 22, 2026

वनामकृवित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; महसूलपासून आरोग्यापर्यंत सर्व सेवा एकाच छताखाली

 शेतकऱ्यांशी थेट संवादातून आधुनिक शेतीला चालना – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास प्रशासन कटिबद्ध – माननीय जिल्हाधिकारी श्री संजयसिंह चव्हाण





नागरिकांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ पारदर्शक, सुलभ आणि वेळेत मिळावा या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराला' परभणीत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध विभागांच्या सेवा एकाच छताखाली उपलब्ध करून देत लाभार्थ्यांना योजनांचे प्रातिनिधिक स्वरूपात लाभवितरण करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी नागरिकाभिमुख उपक्रम, आधुनिक शेती, कायदा व सुव्यवस्था तसेच शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचा संकल्प व्यक्त केला.

माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त परभणी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी महाराष्ट्र शासन व  वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर' विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात दिनांक २२ जुलै २०२६ रोजी संपन्न झाले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माननीय अध्यक्षा श्रीमती लता वाकळे, महापौर माननीय श्री. सय्यद इक्बाल सय्यद खाजा, कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, माननीय जिल्हाधिकारी श्री. संजयसिंह चव्हाण, कृषितज्ज्ञ पद्मश्री श्री. श्रीरंग देवबा लाड, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नताशा माथूर, उपविभागीय अधिकारी श्री. उदयसिंह भोसले, तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे आदींसह लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने नागरिक व लाभार्थी उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तसेच स्वर्गीय अजित पवार यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' या उपक्रमाचे कौतुक केले. शासनाच्या विविध सेवा व योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणारा हा अत्यंत उपयुक्त उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. कृषि विद्यापीठामार्फत शेतकऱ्यांसाठी आधुनिक शेती तंत्रज्ञान, संशोधन आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असून, शेतकऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या गरजांनुसार मार्गदर्शन करण्यासाठी विद्यापीठ सदैव कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांना सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळावा यासाठी राज्य शासनाने 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर' अभियान सुरू केले आहे. या अभियानाच्या माध्यमातून शेतकरी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या महसूल व इतर शासकीय सेवांशी संबंधित अडचणी तत्परतेने सोडविण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

ग्रामीण भागातील दळणवळणाची प्रमुख रक्तवाहिनी मानल्या जाणाऱ्या आणि अनेक वर्षांपासून अतिक्रमणामुळे बंद झालेल्या जिल्ह्यातील अनेक पाणंद रस्त्यांवरील अतिक्रमणे हटवून ते नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतापर्यंत सहज पोहोचणे, कृषि मालाची वाहतूक करणे आणि ग्रामीण दळणवळण अधिक सक्षम होण्यास मोठी मदत होत आहे.

महिलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, विशेषतः एकल महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट मिळावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत असून, त्यांना आवश्यक मार्गदर्शन व शासकीय सेवाही उपलब्ध करून दिल्या जात आहेत. याचबरोबर नागरिकांनी आभा कार्ड तयार करून घ्यावे, विविध आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा तसेच विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेत सहभागी होऊन गणना फॉर्म वेळेत भरावेत, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

पद्मश्री श्रीरंग लाड यांनी कापूस पिकासाठी विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण लागवड तंत्रज्ञानामुळे उत्पादनात लक्षणीय वाढ होऊन अनेक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याचे सांगितले. शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा अवलंब करून शास्त्रशुद्ध पद्धतीने कापूस लागवड करावी. तसेच महिला शेतकऱ्यांनी आत्मविश्वासाने व सक्षमपणे शेती करत नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून अधिक उत्पादन व आर्थिक समृद्धीकडे वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले.

जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांनी सांगितले की, जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण करणे आणि सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे पोलीस प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी जिल्ह्यात विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. 'पोलीस आपल्या दारी' हा उपक्रम पोलीस आणि नागरिकांमधील विश्वासाचे नाते अधिक दृढ करणारा असल्याचे सांगून सुरक्षित, शांततामय व गुन्हेमुक्त समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी नगरसेवक केदार खटींग, जिल्हा परिषद गटनेते दिलीप देशमुख, सुरेश भुमरे व शिवाजी भरोसे यांनी मनोगत व्यक्त केले. तसेच अर्जुन पाटील, नारायण राऊत आणि शुभांगी सर्जे या लाभार्थ्यांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त केले.

प्रास्ताविकात तहसीलदार डॉ. संदीप राजपुरे यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे' उद्दिष्टे व महत्त्व विषद केले. यावेळी विविध विभागांच्या लोककल्याणकारी योजनांतील लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभांचे वितरण करण्यात आले. विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बीएलओ तसेच भूमिअभिलेख अधिकारी सुनील मोरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे,  शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, सर्व महाविद्यालयाचे अधिष्ठाता, विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर नागरिकांच्या माहितीसाठी उभारण्यात आलेल्या विविध विभागांच्या स्टॉल प्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक प्रवीण वायकोस यांनी केले.
(सौजन्य – जिल्हा माहिती अधिकारी, परभणी)


















वनामकृविद्वारा "सद्यस्थितीत खरीप पिकांचे व्यवस्थापन" विषयावरील ऑनलाइन मार्गदर्शन संपन्न

पाण्याचा कार्यक्षम वापर आणि हवामान-अनुकूल शेतीवर भर देण्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ) इन्द्र मणि यांचे आवाहन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र, तसेच अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प आणि शेकरू फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार, दिनांक २१ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ७.०० वाजता "सद्यस्थितीत खरीप पिकांचे व्यवस्थापन" या विषयी ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. मार्गदर्शनात त्यांनी सांगितले की, सध्याच्या अनिश्चित पावसाच्या परिस्थितीत विद्यापीठातील सर्व शास्त्रज्ञांनी गावपातळीवर जाऊन शेतकऱ्यांच्या शेतभेटी घ्याव्यात. प्रत्यक्ष पीक परिस्थिती, मृदेतील ओलावा आणि हवामान अंदाजाचा सखोल अभ्यास करून पीकनिहाय व परिस्थितीनुसार शास्त्रीय मार्गदर्शन करावे. उपलब्ध सिंचनाच्या पाण्याचा कार्यक्षम व काटकसरीने वापर करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना संरक्षी सिंचन, सूक्ष्म सिंचन पद्धती आणि पाण्याचा प्रत्येक थेंब पिकासाठी उपयुक्त ठरेल अशा उपाययोजनांवर भर द्यावा, असे त्यांनी सांगितले.

यासोबतच कमी खर्चातील, स्थानिक स्तरावर उपलब्ध नैसर्गिक साधनसामुग्रीवर आधारित आणि शाश्वत कृषी तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रसार करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. पीक अवशेषांचे आच्छादन, अंतरमशागत, मृदा ओलावा संवर्धन, सेंद्रिय निविष्ठांचा वापर, संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन तसेच कोरडवाहू शेतीतील हवामान-अनुकूल (Climate Resilient) तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे आवाहन त्यांनी केले. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळोवेळी योग्य सल्ला देऊन उत्पादनातील जोखीम कमी करणे, उपलब्ध संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न टिकवून ठेवण्यासाठी विद्यापीठाची संशोधन व विस्तार यंत्रणा अधिक प्रभावीपणे कार्य करावी, असेही त्यांनी मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुणे संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्या भागात सध्या पावसाचा खंड आहे, तेथे पिकांमध्ये हलकी कोळपणी व अंतरमशागत करून जमिनीतील ओलावा टिकवून ठेवावा, तणांचे प्रभावी व्यवस्थापन करावे, १ टक्का पोटॅशियम नायट्रेटची फवारणी करून पिकावरील ताण कमी करावा, पिकांमध्ये सेंद्रिय आच्छादनाचा वापर करावा तसेच पाण्याची उपलब्धता असल्यास संरक्षी सिंचन द्यावे.

तसेच ज्या भागात अद्याप पेरणी झालेली नाही, त्या ठिकाणी तूर, बाजरी, सूर्यफूल आणि एरंडी यांसारख्या पर्यायी पिकांना प्राधान्य द्यावे. सोयाबीन + तूर, तूर + बाजरी, तूर + एरंडी तसेच एरंडी + धने या आंतरपीक पद्धतींचा अवलंब केल्यास बदलत्या हवामान परिस्थितीत उत्पादनाचा धोका कमी होऊन शाश्वत उत्पन्न मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

शेतकरी प्रतिनिधी म्हणून बाभुळगाव (जि. परभणी) येथील प्रगतशील शेतकरी श्री. ज्ञानोबा पारधे यांनी आपल्या अनुभवांचे कथन केले. या कार्यक्रमास विद्यापीठाचे बदनापूर येथील कृषि महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील, छत्रपती संभाजी नगर येथील राष्ट्रीय संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. सूर्यकांत पवार,  कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, कोरडवाहू संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी तथा सेंद्रिय शेती संशोधन केंद्राचे मुख्य अन्वेषक डॉ. आनंद गोरे, शास्त्रज्ञ डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. श्रद्धा धुरगुडे, डॉ. पपिता गौरखेडे, डॉ. मधुकर मोरे, डॉ. गणेश गायकवाड, डॉ. वसंत सूर्यवंशी तसेच कृषि विज्ञान केंद्रांचे वरिष्ठ शास्त्रज्ञ, विद्यापीठातील अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव ऑनलाइन सहभागी झाले होते.

यावेळी सध्याच्या पावसाच्या परिस्थितीत खरीप पिकांचे व्यवस्थापन, पावसाच्या खंडाचा पिकांवरील परिणाम, सुरुवातीच्या व मध्य अवस्थेतील पिकांचे व्यवस्थापन, कमी पावसातील ताण व्यवस्थापन, मृदा ओलावा संवर्धन तंत्रज्ञान, जलसंधारण उपाययोजना तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमाचे आयोजन डॉ. आनंद गोरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. श्रद्धा धुरगुडे यांनी केले, तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. मीनाक्षी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.