Friday, July 24, 2026

वनामकृवि–श्री स्वामी समर्थ ट्रस्टमध्ये सामंजस्य करार; बैलचलित शेती अवजारांच्या कस्टम हायरिंग सेंटरची स्थापना

अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वयातूनच खरा विकास : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

शेतकऱ्यांनी बांधावर वृक्षांची लागवड करून बांध सजीव करावेत; विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा विवेकपूर्ण वापर करून संस्कार जपावेत : कृषिरत्न माननीय श्री. आबासाहेब मोरे

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि 

कृषिरत्न मा. श्री. आबासाहेब मोरे (श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी प्रणित, नाशिक) 
वनामकृवि–श्री स्वामी समर्थ ट्रस्टमध्ये सामंजस्य करार

माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि आणि कृषिरत्न मा. श्री. आबासाहेब मोरे 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत भाकृअनुप–अखिल भारतीय समन्वयित संशोधन प्रकल्प (पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण) यांच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या बैलचलित सुधारित शेती अवजारे कस्टम हायरिंग सेंटर स्थापनेसंदर्भात श्री स्वामी समर्थ कृषि विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट, दिंडोरी (जि. नाशिक) यांच्याशी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला असून त्यानिमित्त नैसर्गिक शेती प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम शुक्रवार, दिनांक २४ जुलै २०२६ रोजी विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात संपन्न झाला.

अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कृषिरत्न मा. श्री. आबासाहेब मोरे (श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग, दिंडोरी प्रणित, नाशिक) उपस्थित होते. व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ. बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता इंजी. दीपक कशाळकर, सहाय्यक नियंत्रक श्री अनंत कदम,  संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, ट्रस्टचे कार्यक्रम समन्वयक श्री. बाळासाहेब शिंदे, प्रगतशील शेतकरी उद्यान पंडित श्री प्रतापराव काळे, श्रीमती ज्योती भूक्तार आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमामध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षरी, शाकंभरी सीड बँकेच्या प्रमाणपत्रांचे वितरण तसेच मान्यवरांचे मार्गदर्शन झाले.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरूंनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून अपेक्षित उद्दिष्ट पूर्ण होवो, अशी प्रार्थना व्यक्त केली. अध्यात्म आणि विज्ञान जेव्हा एकत्र येतात, तेव्हाच खरा विकास घडतो. अध्यात्माशिवाय विज्ञान अपूर्ण आहे, असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, विद्यापीठ शिक्षणाबरोबरच संशोधन आणि विस्तार शिक्षणाच्या माध्यमातून जनसेवा व शेतकऱ्यांची सेवा करण्यास प्राधान्य देत आहे. श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्थेद्वारे आदर्श व दिशादर्शक कार्य उभारले जात असून, या संस्थेच्या कार्याबद्दल त्यांनी मनःपूर्वक आदर व्यक्त केला. आपण पुण्याचे कार्य करत आहात. समाज आणि देशाच्या प्रगतीसाठी कार्यरत आहात. विकासासाठी शेती आणि शेतकरी यांची निवड करून आपण अत्यंत महत्त्वाचे कार्य हाती घेतले आहे, असे सांगून त्यांनी श्री. आबासाहेब मोरे यांचे अभिनंदन केले. या कार्यामागील त्यांची समर्पण भावना व तपश्चर्या उल्लेखनीय असल्याचे सांगताना ते म्हणाले की, सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करणे अत्यंत कठीण असते; मात्र आपण तपस्वी वृत्तीने हे कार्य करत आहात. त्यामुळे आपण खऱ्या अर्थाने एक तपस्वी आहात, असे आदरयुक्त उद्गार त्यांनी श्री. आबासाहेब मोरे यांच्याविषयी काढले.

उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी ही म्हण आज पुन्हा सत्य ठरत असल्याचे नमूद करून त्यांनी शेतीचे वाढते महत्त्व अधोरेखित केले. शेतकरी हा देशाच्या विकासाचा केंद्रबिंदू असून त्याचा मान, सन्मान आणि कल्याण साधणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. याच विचारातून केंद्रीय कृषी मंत्रालयाचे नामकरण कृषी व किसान कल्याण मंत्रालय असे करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

आज भारत अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण असून निर्यातीमध्येही महत्त्वपूर्ण स्थान मिळवत आहे. याचे श्रेय शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ आणि दिंडोरी प्रणित संस्थेसारख्या सेवाभावी संस्थांना जाते, असे त्यांनी सांगितले. श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्था आणि विद्यापीठ यांच्या संयुक्त प्रयत्नांतून विषमुक्त, जोखीमरहित, कर्जमुक्त आणि नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी कार्य करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आज झालेला सामंजस्य करार हा केवळ दोन संस्थांमधील करार नसून, शाश्वत शेती आणि शेतकरी कल्याणाच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी 'वन हेल्थ (One Health)' या संकल्पनेचाही उल्लेख केला. प्राणी, वनस्पती, मृदा आणि मानव यांचे आरोग्य परस्परांशी निगडित असून सर्वांच्या आरोग्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. या अभियानाच्या माध्यमातून हे उद्दिष्ट निश्चितच साध्य होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्रात ट्रॅक्टरच्या जागी बैलचलित अवजारे आणण्याचा प्रश्न नसून, बैलचलित अवजारांना अधिकाधिक प्राधान्य देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. पशुशक्तीवर आधारित कृषी यांत्रिकीकरणाच्या क्षेत्रात विद्यापीठाने उत्कृष्ट कार्य केले असून देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. याच अनुषंगाने बैल संवर्धनासाठी स्वतंत्र प्रकल्प उभारण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला. श्री स्वामी समर्थ सेवाभावी संस्थेने विद्यापीठाच्या संशोधनाधारित तंत्रज्ञानाचा अधिकाधिक प्रचार व प्रसार करावा, अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. तसेच मागील चार वर्षांपासून विद्यापीठात कार्यरत असताना शिक्षण, संशोधन, विस्तार शिक्षण आणि शेतकरी हितासाठी करण्यात आलेल्या विविध उपक्रमांबद्दल समाधान व आनंद व्यक्त केला.

श्री. आबासाहेब मोरे म्हणाले की, विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान श्री स्वामी समर्थ संस्थान आत्मीयतेने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवेल. शेती स्वावलंबी करण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. पूर्वी शेती समृद्ध होती. प्रत्येक शेतकऱ्याकडे स्वतःचे बियाणे व आवश्यक साधनसामग्री उपलब्ध होती आणि शेतात नैसर्गिक साधनसंपत्ती मुबलक प्रमाणात होती. मात्र, कालांतराने रासायनिक घटकांचा वापर वाढल्याने त्याचे विपरीत परिणाम दिसून येऊ लागले. त्यामुळे वृक्षारोपणाची नितांत आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. प्रत्येकाने आपल्या शेताच्या बांधावर वृक्षांची लागवड करून बांध सजीव करावेत. त्यासाठी आवश्यक ज्ञान आत्मसात करणे गरजेचे असून, प्रत्येक शेतात पशुधन, विशेषतः गायी-गुरे असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर कितीही वाढला, तरी गाईंशिवाय शेती पूर्ण होऊ शकत नाही. गाय ही अध्यात्मिक तसेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. गरजेनुसार करण्यात आलेल्या संकरामुळे देशी गाईंची प्रतिकारशक्ती कमी झाली असून, शुद्ध देशी गोवंशाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. गाई-गुरांच्या आजारांवर नियंत्रणासाठी विविध वनस्पती उपयुक्त ठरतात. काही वनस्पतींच्या सान्निध्यामुळेही आरोग्यास लाभ होतो. त्यामुळे या विषयावर विद्यापीठाने अधिक मार्गदर्शन करावे, अशी त्यांनी विनंती केली.

देशात पशुधनाच्या शक्तीच्या वापरावर संशोधन करणाऱ्या प्रमुख विद्यापीठांपैकी हे एक विद्यापीठ असल्याचा त्यांनी आनंद व्यक्त केला. गाईचे शेण व गोमूत्र हे अत्यंत उपयुक्त असून, शेणामध्ये अनेक लाभदायक सूक्ष्मजीव आढळतात. गोमूत्रापासून तयार केलेल्या जैविक कल्चरचा वापर शेतीत करावा. तसेच तणनाशकांचा वापर टाळून तणांचा उपयोग भाजीपाला, सेंद्रिय खत किंवा औषधी निर्मितीसाठी करावा, असे त्यांनी सांगितले.

गाईप्रमाणेच बैलांचेही शेतीमध्ये महत्त्व असून, नंदी संवर्धनावर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. वाढत्या यांत्रिकीकरणामुळे, विशेषतः ट्रॅक्टरच्या अतिवापरामुळे होणारे दुष्परिणाम त्यांनी नमूद केले. बैलचलित शेती अवजारांचा प्रचार व प्रसार व्हावा, त्यासाठी नियमित प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करावेत आणि सामंजस्य कराराच्या माध्यमातून हे कार्य अधिक वेगाने पुढे न्यावे, अशी त्यांनी विनंती केली. या कार्यामध्ये कोणताही भेदभाव न करता केवळ ज्ञानदानाचा उद्देश असावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर मर्यादित ठेवावा. रील्सच्या आभासी विश्वात रमण्यापेक्षा वास्तव जीवनात सक्रिय राहून स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे. तंत्रज्ञानाचा योग्य व संयमित वापर करावा. ताण-तणाव कमी करण्यासाठी गाई-गुरे आणि नैसर्गिक वातावरणाच्या सान्निध्यात वेळ घालवावा. तसेच आई-वडिलांची निरपेक्ष भावनेने सेवा करून संस्कार जपावेत, असे आवर्जून त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. प्राचीन ऋषी-मुनींनी कृषीशास्त्राचा कसा विकास केला, याची उदाहरणे देत त्यांनी विज्ञानाला अध्यात्माची जोड देऊन पुढे जाण्याचे आवाहन केले.

डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, हा केवळ सामंजस्य करार नसून शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठीचा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. शेतीमध्ये यांत्रिकीकरणाची नितांत आवश्यकता असून मराठवाड्यातील बहुतांश शेतकऱ्यांची जमीनधारणा अल्प आहे. तसेच मराठवाड्यातील सुमारे ८० टक्के शेती ही पावसावर अवलंबून असल्याने उपलब्ध पावसाच्या पाण्याचा प्रभावी वापर करण्यासाठी आधुनिक यांत्रिकीकरण आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विद्यापीठाने ५६ आधुनिक कृषी अवजारे तसेच विविध पिकांसाठी उपयुक्त वाण विकसित केले असून हे तंत्रज्ञान आणि वाण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा सामंजस्य करार आणि कस्टम हायरिंग सेंटर अत्यंत उपयुक्त ठरेल, असे त्यांनी सांगितले. यासाठी श्री स्वामी समर्थ संस्थेने घेतलेला पुढाकार इतर संस्थांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करत विद्यापीठाचे संशोधन व तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठ सदैव कटिबद्ध व तत्पर राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रास्ताविकात डॉ. दयानंद टेकाळे यांनी सांगितले की, आजच्या कार्यक्रमात दीड हजारांहून अधिक शेतकऱ्यांचा सहभाग पाहून विद्यापीठ आणि शेतकरी यांच्यातील आत्मीय नाते अधिक दृढ झाल्याची प्रचिती येते. माननीय कुलगुरूंच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ "शेतकरी देवो भव:" या भावनेने कार्यरत असून शेतकऱ्यांचा सन्मान करण्यास सदैव अग्रक्रम देत आहे. ते पुढे म्हणाले की, गतवर्षी नाशिक येथे झालेल्या कार्यक्रमात गुरुमाऊलींनी विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान व बैलचलित कृषी अवजारे पाहिल्यानंतर सामंजस्य करार करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार श्री स्वामी समर्थ संस्थेसोबत दीड हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या उपस्थितीत झालेला हा सामंजस्य करार ऐतिहासिक ठरला आहे. विद्यापीठाचे बैलचलित कृषी अवजारांचे कस्टम हायरिंग सेंटर महाराष्ट्रातील सर्व विभागांमध्ये स्थापन करण्याचा मानस असून, नैसर्गिक शेतीला चालना देण्यासाठी देशी गोवंशाचे संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे. या कस्टम हायरिंग सेंटरमध्ये ११ बैलचलित कृषी अवजारांचा समावेश असून ती एक किंवा दोन बैलांच्या साहाय्याने चालविता येतील. त्यामुळे सामान्य शेतकऱ्यांनाही त्याचा मोठा लाभ होईल, असे त्यांनी नमूद केले.

श्री. बालासाहेब शिंदे यांनी सांगितले की, संघर्षातूनच नवी ऊर्जा निर्माण होत असते. शेतीमध्ये यापूर्वी न झालेली अभिनव कामे करण्याच्या उद्देशाने हा सामंजस्य करार करण्यात आला आहे. श्री स्वामी समर्थ संस्थेमार्फत २० टक्के अध्यात्म आणि ८० टक्के समाजसेवा या तत्त्वावर कार्य केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या कार्यक्रमासाठी संस्थेचे सुमारे दीड हजार सेवेकरी विविध केंद्रांतून सहभागी झाले असून त्यांच्यामार्फत सुमारे २० हजार गावांतील संपर्क शेतकऱ्यांपर्यंत विद्यापीठाचे तंत्रज्ञान पोहोचविले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. बैलचलित कृषी अवजारांच्या वापरामुळे शेतीवरील खर्चात सुमारे ३० टक्क्यांपर्यंत बचत होऊ शकते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी दिंडोरी प्रणित संस्थेमार्फत राबविण्यात येणारे रोजगार, विवाह, मानसिक स्वास्थ्य समुपदेशन तसेच विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली.

यावेळी संस्थेचे सेवेकरी श्री. कृष्णा मोरे यांनी श्री आबासाहेब मोरे यांचा परिचय करून दिला. त्यांनी देशभरातील तालुका, जिल्हा तसेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शेतकरी व सामाजिक उन्नतीसाठी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. तसेच शाकंभरी सीड बँकेच्या परवाना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.

तांत्रिक सत्रात एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीत, पावसाच्या खंडकाळात घ्यावयाची काळजी तसेच नैसर्गिक शेती या विषयांवर डॉ. आनंद गोरे व डॉ. पपिता गौरखेडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. वीणा भालेराव आणि डॉ. रणजीत चव्हाण यांनी केले.



संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार

संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे
ट्रस्टचे कार्यक्रम समन्वयक श्री. बाळासाहेब शिंदे
संस्थेचे सेवेकरी श्री. कृष्णा मोरे 

प्रगतशील शेतकरी उद्यान पंडित श्री प्रतापराव काळे यांचा सन्मान