वनामकृवि - श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग (दिंडोरी) यांचा संयुक्त उपक्रम
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्वयित
संशोधन प्रकल्प (AICRP) – पशुसंवर्धनाचे यांत्रिकीकरण योजना
आणि श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग प्रणीत, दिंडोरी, जि. नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी विकसित
करण्यात आलेल्या बैलचलित सुधारित शेती अवजारांच्या कस्टम हायरिंग सेंटर स्थापनेचा
महत्त्वपूर्ण कार्यक्रम दिनांक २४ जुलै २०२६ रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
झाला. या कार्यक्रमात वृक्षारोपण, सुधारित शेती अवजारे
संग्रहालयाचे उद्घाटन तसेच सुधारित बैलचलित शेती अवजारांचे वितरण करण्यात आले.
अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख
अतिथी म्हणून कृषिरत्न मा. श्री. आबासाहेब मोरे (श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग,
दिंडोरी प्रणित, नाशिक) उपस्थित होते.
व्यासपीठावर संशोधन संचालक डॉ. भगवान आसेवार, शिक्षण संचालक डॉ.
बाबासाहेब ठोंबरे, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे,
कुलसचिव श्री. पुरभा काळे, विद्यापीठ अभियंता इंजी.
दीपक कशाळकर, सहाय्यक नियंत्रक श्री अनंत कदम, संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे, ट्रस्टचे
कार्यक्रम समन्वयक श्री. बाळासाहेब शिंदे, प्रगतशील शेतकरी उद्यान पंडित श्री
प्रतापराव काळे, संशोधन शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत मान्यवरांच्या हस्ते
नारळाच्या रोपाचे वृक्षारोपण करून करण्यात आली. त्यानंतर पशुसंवर्धनाचे
यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या सुधारित शेती अवजारे
संग्रहालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
या संग्रहालयात पेरणीपूर्व मशागत, पेरणी, आंतरमशागत,
खत व्यवस्थापन, तण नियंत्रण, फवारणी, प्लास्टिक आच्छादन, उसास
माती चढविणे तसेच काढणीपर्यंतच्या विविध शेती कामांसाठी विकसित करण्यात आलेली
एकबैल व दोनबैल चालित सुधारित शेती अवजारे आकर्षक पद्धतीने प्रदर्शित करण्यात आली
आहेत. प्रत्येक अवजारासमोर त्याची वैशिष्ट्ये, उपयोग,
तांत्रिक माहिती व छायाचित्रांसह माहितीफलक लावण्यात आले आहेत.
संग्रहालयाची पाहणी केल्यानंतर उपस्थित मान्यवरांनी या अभिनव उपक्रमाचे विशेष
कौतुक करत हे संग्रहालय शेतकरी, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी
अत्यंत उपयुक्त ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.
यानंतर सामंजस्य करारानुसार स्थापन करण्यात येणाऱ्या कस्टम हायरिंग
सेंटरसाठी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते कृषिरत्न श्री.
आबासाहेब मोरे यांच्याकडे सुधारित बैलचलित शेती अवजारांचे वितरण करण्यात आले.
वितरित करण्यात आलेल्या ११ सुधारित बैलचलित शेती अवजारांमध्ये बैलचलित
सौरऊर्जा फवारणी यंत्र, बैलचलित स्लरी अंथरणी यंत्र, खत व बी टोकण यंत्र,
धसकटे गोळा करणारे यंत्र, तीन पासांचे खत
कोळपे, सुधारित बैलगाडी जू, एकबैल
चालित खत व बी टोकण यंत्र, एकबैल चालित वखर, बैलचलित प्लास्टिक आच्छादन यंत्र, बैलचलित उसास माती
चढविण्याचे यंत्र तसेच इतर सुधारित अवजारांचा समावेश होता.
अध्यक्षीय समारोपात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले, नैसर्गिक व
सेंद्रिय शेतीचा वाढता प्रसार लक्षात घेता बैलचलित सुधारित शेती अवजारे ही काळाची
गरज आहे. कस्टम हायरिंग सेंटरच्या माध्यमातून ही अवजारे शेतकऱ्यांना सहज उपलब्ध
होतील. त्यामुळे उत्पादन खर्चात बचत, श्रमात घट आणि शाश्वत
शेतीला मोठी चालना मिळेल.
प्रमुख अतिथी कृषिरत्न श्री. आबासाहेब मोरे यांनी श्री स्वामी समर्थ सेवा
मार्गामार्फत या अवजारांचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत प्रसार करून नैसर्गिक
शेतीला अधिक गती देण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमास विद्यापीठातील विविध महाविद्यालयांचे अधिष्ठाता, संचालक, विभागप्रमुख, शास्त्रज्ञ, अधिकारी,
कर्मचारी, श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे
पदाधिकारी, नैसर्गिक शेती करणारे शेतकरी तसेच परिसरातील अनेक
शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल
उपस्थितांनी आयोजकांचे अभिनंदन करून समाधान व्यक्त केले.
नैसर्गिक व सेंद्रिय शेतीसाठी आधुनिक बैलचलित तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या
दारी पोहोचविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम राज्यासाठी आदर्श ठरेल, असा विश्वास
उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.


.jpeg)
.jpeg)


