Tuesday, February 4, 2025

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात 'अकॅडमिक मॅनेजमेंट सिस्टिम' (AMS) वर एक दिवशीय कार्यशाळा संपन्न....

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात 'अकॅडमिक मॅनेजमेंट सिस्टिम' (AMS) या वेब-आधारित प्रणाली दिनांक ७ ऑक्टोबर २०२२ पासून लागू करण्यात आलेली आहे. ही प्रणाली शैक्षणिक कार्ये अधिक सुलभ व सुसंगत करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे.

सध्या विद्यापीठाच्या १२ महाविद्यालयांनी 'अकॅडमिक मॅनेजमेंट सिस्टिम' वर नोंदणी केली असून, यावर्षी पासून नव्याने सुरवात केलेल्या चार महाविद्यालयाना या प्रणालीत समाविष्ट केले जाणार आहेत. या प्रणालीच्या माध्यमातून शैक्षणिक सेवा अधिक जलद, प्रभावी आणि पारदर्शक होणार असून, विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कार्यांचे ऑनलाइन कार्य करणे सोपे होणार आहे. तसेच, विद्याशाखीय कार्यक्षमतेत सुधारणा होऊन शिक्षक व विद्यार्थी यांचा वेळ व श्रम वाचणार आहेत.

या प्रणालीबाबत अधिक माहिती देण्यासाठी ४ फेब्रुवारी रोजी विद्यापीठात एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि होते. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, तसेच प्रमुख अतिथी म्हणून नवी दिल्ली येथील भाकृअप –आयएएसआरआयच्या (IASRI-ICAR) संगणक विभागाचे प्रमुख डॉ. सुदीप मारवाह उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी 'अकॅडमिक मॅनेजमेंट सिस्टिम' प्रणालीच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे विद्यापीठातील शैक्षणिक प्रणाली अधिक मजबूत होईल व विद्यार्थ्यांना डिजिटल पद्धतीने शिक्षण घेण्यास मोठा फायदा होईल असे प्रतिपादन केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार आणि विभाग प्रमुख डॉ. सुदीप मारवाह यांनीही मार्गदर्शन केले. कार्यशाळेत भाकृअप –आयएएसआरआयचे श्री. विभोर त्यागी 'अकॅडमिक मॅनेजमेंट सिस्टिम' प्रणालीच्या सर्व तांत्रिक बाबी विशद केल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन 'अकॅडमिक मॅनेजमेंट सिस्टिम'चे नोडल अधिकारी डॉ. रणजित चव्हाण यांनी केले व आभार प्रदर्शनही त्यांनी केले. कार्यशाळेत उप कुलसचिव (विद्या) डॉ गजानन भालेराव, मा. कुलगुरू यांचे तांत्रिक अधिकारी डॉ. प्रवीण कापसे, डॉ. संतोष फुलारी, डॉ. रवी शिंदे आदीनी सहभागी होवून यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. सर्व महाविद्यायाचे 'अकॅडमिक मॅनेजमेंट सिस्टिम' चे हाताळणी करणारे शिक्षण विभाग प्रमुखांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदविला.

मौजे दुर्डी येथे हरभरा पीक व्यवस्थापनावर शेतकरी प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिकाचे आयोजन

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि रिलायन्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ४ फेब्रुवारी  रोजी मौजे दुर्डी (ता. जि. परभणी) येथे  शेतकरी बांधवांसाठी हरभरा पीक व्यवस्थापनावर विशेष प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमात शेतकऱ्यांना हरभरा पिकातील कीड व रोग व्यवस्थापन, खत व पाणी व्यवस्थापन तसेच एकात्मिक पीक संरक्षणाच्या तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. यामध्ये पिवळे-निळे चिकट सापळे, पक्षी थांबे यांचा प्रभावी वापर, योग्य खत व्यवस्थापन आणि आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब यासंदर्भात सखोल मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाला कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे विस्तार कृषी विद्यावेत्ता तथा व्यवस्थापक डॉ. गजानन गडदे, सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत आणि श्री. मधुकर मांडगे यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांना महत्वपूर्ण माहिती दिली.

या उपक्रमाचे आयोजन रिलायन्स फाउंडेशनचे विभागीय व्यवस्थापक श्री. नितिन कोल्हे आणि कार्यक्रम सहाय्यक श्री. रामाभाऊ राऊत यांनी केले. शेतकऱ्यांनी एकात्मिक पीक व्यवस्थापन तंत्राचा अवलंब करून हरभरा उत्पादन वाढवावे, असे आवाहन या वेळी करण्यात आले.


Sunday, February 2, 2025

वनामकृविचे कार्य देशपातळीवर पोहोचणार

विद्यापीठाच्या संशोधन प्रकल्पांना सात राज्यातील २५ शास्त्रज्ञांच्या भेटी: माननीय कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली अभ्यासदौरा

मध्यवर्ती प्रक्षेत्रास भेट

संतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू प्रा.(डॉ.) इन्द्र मणि  यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार दिनांक १ फेब्रुवारी रोजी विद्यापीठाचे संशोधन प्रकल्प व नव्या विकास उपक्रमांना अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले. हा अभ्यासदौरा विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागामार्फत आणि नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्कृत  शाश्वत शेतीत उपयुक्त फाइटो-मायक्रोबायोमची भूमिका, महत्त्व आणि तंत्रज्ञान या विषयावरील दहा दिवशीय लघु अभ्यासिकेत सहभागी शास्त्रज्ञांसाठी होता. या दौऱ्याद्वारे विद्यापीठातील विविध संशोधन व कृषी विकासाच्या क्षेत्रातील प्रगतिपथावरील कार्य पाहण्याची संधी अभ्यासिकेत पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगढ, जम्मू काश्मीर, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र या सात राज्यातील २५ सहभागी शास्त्रज्ञांना मिळाली.

या अभ्यासदौऱ्यादरम्यान विविध महत्त्वाच्या ठिकाणांना भेटी देण्यात आल्या. यामध्ये विद्यापीठाच्या नव्याने विकसित मध्यवर्ती प्रक्षेत्रास भेट देवून यांत्रिकराणातून जमीन विकास आणि गोदावरी तूर पिकासाठी अवलंबलेले नवनवीन तंत्रज्ञान व संशोधन तसेच गुणवत्ता युक्त बीजोत्पादन क्षेत्र पाहण्याची संधी मिळाली. महाराष्ट्र मेकॅनायझेशन सेंटर ‘J फार्म’ याठिकाणी भेट देवून कृषी यांत्रिकीकरणाच्या आणि ट्रॅक्टरचे कट मॉडेलद्वारे प्रकल्पाची महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. सेंद्रिय शेती प्रकल्पातून पर्यावरणपूरक शेतीच्या प्रकल्पाविषयी माहिती घेण्यात आली. ड्रोन द्वारे फवारणी या आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतीत कसा वापर करता येईल याचे प्रात्यक्षिक सादरीकरण करण्यात आले. दीर्घ कालीन खत प्रयोगाच्या संशोधनातून करडई सारख्या पिकातील खताच्या वापराच्या संशोधनाबाबत माहिती घेण्यात आली. अन्न तंत्र महाविद्यालयातील गूळ आणि रस इन्क्युबेशन सेंटरमधून  प्रक्रिया उद्योगाच्या संधी आणि तंत्रज्ञानाची ओळख उद्योजकता विकासाकरिता करून देण्यात आली. रेशीम संशोधन केंद्राद्वारे  रेशीम उद्योगाच्या संशोधन कार्याचा अभ्यास करण्यात आला, तर जैव कीटकनाशक युनिट व कीटकशास्त्र विभागाच्या भेटीतून  जैविक कीटकनाशके आणि कीटक व्यवस्थापन यावर सखोल चर्चा करून शास्त्रज्ञानी माहिती घेतली. दुसऱ्या दिवशी (२ फेब्रुवारी) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, जर्मन एजन्सी जीआयझेड, सन सीड प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सामंजस्य करारातून मानवत येथील ॲग्री-फोटोव्होल्टेईक तंत्रज्ञान विकास व संशोधन प्रकल्पास भेट दिली. या  तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातुन शेतजमिनीवर सौर ऊर्जा निर्मिती आणि पिक लागवड या दुहेरी लाभाची तसेच ॲग्री-फोटोव्होल्टेईक तंत्रज्ञान उपकरणाची प्रभावी उपयुक्तता आणि हाताळणी तंत्रज्ञाची माहिती घेतली.

या अभ्यासदौऱ्यातून मराठवाड्याच्या विकासाकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे मोलाचे योगदान असल्याचे मत सहभागी शास्त्रज्ञानी व्यक्त करून याप्रमाणेच आपल्या संभधित राज्यात या तंत्रज्ञाचे माहिती देवून या विद्यापीठाचे कार्य पोहचले जाईल असे भावना व्यक्त केल्या. 

या अभ्यासदौऱ्याच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाच्या विविध विभागाचे प्रमुख आणि प्रभारी अधिकारी डॉ. विलास खर्गखराटे, डॉ. पी.एस. नेहरेकर, डॉ. आनंद गोरे, डॉ. गोपाल शिंदे, डॉ. हेमंत देशपांडे, डॉ. भारत आगरकर, डॉ गोदावरी पवार, डॉ. सी.बी. लटपटे, डॉ. मीनाक्षी पाटील , डॉ. विशाल इंगळे, डॉ. आर.एन. खंदारे, डॉ. शारदा  दुर्गुडे, श्री मोरे, श्री किश्ते, श्री शिवपुजे या मान्यवर, संशोधक व तज्ज्ञांनी आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल अभ्यासदौरा आयोजक तथा अभ्यासिकेचे समन्वयक डॉ. विक्रम घोळवे आणि सहभागी शास्त्रज्ञानी मनःपूर्वक आभार मानले.

मध्यवर्ती प्रक्षेत्रास भेट


अमृत सरोवर मध्यवर्ती प्रक्षेत्र

महाराष्ट्र मेकॅनायझेशन सेंटर ‘फार्म’
महाराष्ट्र मेकॅनायझेशन सेंटर ‘फार्म’

ड्रोन द्वारे फवारणी प्रात्यक्षिक

गूळ आणि रस इन्क्युबेशन सेंटर
गूळ आणि रस इन्क्युबेशन सेंटर
दीर्घ कालीन खत प्रयोग- करडई

सेंद्रिय शेती प्रकल्प
 कीटकशास्त्र विभाग

जैव कीटकनाशक युनिट

रेशीम संशोधन केंद्र
ॲग्री-फोटोव्होल्टेईक तंत्रज्ञान विकास व संशोधन प्रकल्प






Saturday, February 1, 2025

शाश्वत शेतीत उपयुक्त फाइटो-मायक्रोबायोमची भूमिका, महत्त्व आणि तंत्रज्ञान याविषयी लघु अभ्यासिकेत माननीय कुलगुरू मा.प्रा.(डॉ.)इन्द्र मणि यांचे मार्गदर्शन...

 


वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वनस्पती रोगशास्त्र विभागामार्फत आणि नवी दिल्ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषद पुरस्कृत  शाश्वत शेतीत उपयुक्त फाइटो-मायक्रोबायोमची भूमिका, महत्त्व आणि तंत्रज्ञान या विषयावरील २७ जानेवारी ते ५ फेब्रुवारी दरम्यान दहा दिवशीय लघु अभ्यासिकेचे आयोजन करण्यात आलेले आहे.  दिनांक ३१ जानेवारी रोजी विद्यापीठाच्या सिम्पोजीयम सभागृहामध्ये मा.कुलगुरू मा. प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी या अभ्यासिकेत संपूर्ण भारतातून सहभागी असलेल्या २५ प्रशिक्षणार्थीना आणि विभागाचे आचार्य आणि पदव्युत्तर विद्यार्थी यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिले.

मार्गदर्शनपर भाषणात मा.कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सद्य परिस्थितीमध्ये शेती मध्ये यांत्रिकीकरणाचा महत्व असुन विद्यापीठामध्ये यांत्रीकरणातून मागील दोन वर्षांमध्ये ८०० हेक्टर जमीन लागवडी खाली आणून बिजोत्पादानात तिप्पट वाढ झाल्याचे सांगितले. शेतीसाठी पाण्याचे महत्त्व जाणून विद्यापीठात एक कोटी लीटर क्षमतेचे शेततळे तयार करण्यात आले. त्याचा उपयोग रब्बी तसेच उन्हाळी प्रयोगासाठी व बीजोत्पादनासाठी होत आहे. सध्या परिस्थितीमध्ये ड्रोन, रोबोट यांचाही वापर वाढवावा लागेले. विद्यापीठ सदैव शेतकऱ्यांसाठी विविध विस्तार कार्याचे उपक्रम राबवीत असून याची दखल राज्य आणि देशपातळीवर घेतली जाता आहे. यामध्ये ‘माझा एक दिवस बळीराजा सोबत’ आणि ऑनलाईन शेतकरी शास्त्रज्ञ कृषि सवांद नियमित करत असून विद्यापीठ शेतकरी देवो भव: याभावानेतून पुढे जात आहे. विद्यापीठामार्फत संशोधित केलेल्या गोदावरी तुर शेतकऱ्यांसाठी एक वरदान ठरले व शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचा एक स्त्रोत झाले असून यापासून एकरी एक लाख रुपये उत्पन्न मिळाल्याच्या प्रतिक्रिया प्राप्त झाल्या आहेत. या वाणास ऊसाला पर्याय म्हणून शेतकरी पाहत आहेत. हरभरा पिकामध्ये जमिनीपासून 30 सेंटीमीटरच्या वरती दाणे भरणाऱ्या वाणादेखील विकसित केलेला असून काढणीच्या वेळी यांत्रिकीचा वापर करणे शक्य झाले आहे. ड्रोन द्वारे विविध पिकांच्या फवारणी करता पिकानुसार त्याच्या राष्ट्रीय पातळीवर मापदंड ठरविण्याची महत्वपूर्ण जबाबदारी ते स्वतः इतर शास्त्रांसोबत पार पाडत असल्याचे सांगितले. वीज निर्मिती आणि जमिनीचा वापर असा दुहेरी फायदा  ॲग्री पीव्ही या प्रकल्पाचा  माध्यमातून होण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. या प्रकल्पास आणि विद्यापीठाच्या प्रक्षेत्रास भेट आयोजित करावी. यातून शाश्वत शेतीसाठी प्रशिक्षणार्थीना अधिक अनुभव मिळेल असे नमूद केले. या लघु अभ्यासिकेच्या सहभागातून विविध संस्थांशी सामंजस्य करार करण्याकरिता लाभ व्हावा. याद्वारे विचारांची देवाण-घेवाण होईल, असे प्रतिपादन केले.

यावेळी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या कार्याची थोडक्यात ओळख डॉ. प्रवीण कापसे यांनी करून दिली. तर मा.कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी वेळ देऊन अमूल्य मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिल्याबद्दल अभ्यासिका संचालक डॉ. विक्रम घोळावे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमात विभाग प्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे, पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगढ, जम्मू काश्मीर, कर्नाटक, गुजरात इ. राज्यातील सहभागी शास्त्रज्ञ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.