Wednesday, June 17, 2026

वनामकृवितील कृषि महाविद्यालयाच्या रावे उपक्रमाद्वारे ‘खेत बचाओ अभियान’ अंतर्गत शेतकरी संवाद कार्यक्रम संपन्न

 मातीचे आरोग्य सुदृढ तरच शेती, पशुधन व मानवाचे आरोग्य निरोगी : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कृषि महाविद्यालय, परभणी येथील ग्रामीण कृषि कार्यानुभव जागरूकता कार्यक्रम – रावे (RAWE) आणि औद्योगिक संलग्नता २०२६ या उपक्रमांतर्गत तसेच अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनाच्या खेत बचाओ अभियान’ या देशव्यापी कार्यक्रमांतर्गत शेतकरी संवाद कार्यक्रम दि. १७ जून २०२६ रोजी मौजे उजळंबा (ता. जिल्हा परभणी) येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात एल निनोचा प्रभाव, आकस्मिक पीक नियोजन तसेच खेत बचाओ अभियान याविषयी मान्यवरांनी सखोल मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी भूषविले. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी खेत बचाओ अभियान’ चे मुख्य उद्दिष्ट स्पष्ट केले. मृदेचे आरोग्य जपण्यासाठी रासायनिक खतांचा वापर २५ टक्क्यांनी कमी करून सेंद्रिय कर्ब वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ज्याप्रमाणे बालिका आणि महिलांचे आरोग्य उत्तम राहिल्यास संपूर्ण कुटुंब व देशाचे आरोग्य चांगले राहते, त्याचप्रमाणे मातीचे आरोग्य चांगले राहिल्यास मातीतून अंकुरित होणाऱ्या पिकांचे तसेच त्यावर अवलंबून असलेल्या पशुधन आणि मानवाचे आरोग्य सुदृढ राहते, असे त्यांनी सांगितले. अन्न हे पूर्णब्रह्म आहे, त्यामुळे अन्नदाता शेतकरी हा संपूर्ण ब्रह्म आहे’, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे नुकसान कसे टाळावे याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे उद्घाटक शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, एल निनोमुळे पावसाचे प्रमाण अनिश्चित होऊ शकते. त्यामुळे कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची निवड, जलसंधारण तसेच आकस्मिक पीक नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांनी बीबीएफ (Broad Bed Furrow - रुंद सरी वरंबा) तंत्रज्ञानाचा वापर करून पेरणी करण्याचा सल्ला दिला. या पद्धतीमुळे अतिवृष्टी झाल्यास अतिरिक्त पाण्याचा निचरा होतो आणि कमी पावसाच्या परिस्थितीत ओलावा टिकून राहतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रमुख पाहुणे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी मृदा स्वास्थ्याचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, जमिनीचा पोत दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी सेंद्रिय कर्ब (जैव कार्बन) वाढविणे अत्यावश्यक आहे. शेतकऱ्यांनी रसायनांचा अतिरिक्त वापर टाळून सेंद्रिय खते, शेणखत आणि कंपोस्टचा नियमित वापर करावा. त्यामुळे जमिनीची उर्वरता वाढते. एल निनोच्या संकटाच्या काळात मृदा स्वास्थ्य राखणे आणि रसायनांचा संतुलित वापर करणे हे टिकाऊ शेतीसाठी आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

विशेष उपस्थिती असलेले विद्यापीठ रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेश कदम यांनी रावे अंतर्गत कृषिदूतांच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाची माहिती दिली. उजळंबा गावचे सरपंच श्री. विठ्ठलजी धोतरे आणि उपसरपंच श्री. स. मेहताब स. ईसाक यांनी ग्रामस्थांना खेत बचाओ मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांनी कोरडवाहू शेतीमध्ये एल निनोच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी पाणी व्यवस्थापन आणि योग्य पीक पद्धतींचे महत्त्व स्पष्ट केले.

विभाग प्रमुख डॉ. पुरुषोत्तम नेहरकर यांनी कीड व्यवस्थापन तसेच बदलत्या हवामानात पिकांवर पडणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कसा रोखावा याविषयी मार्गदर्शन केले. वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर अंबाडकर यांनी बायोमिक्स व सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीचा पोत सुधारून दुष्काळी परिस्थितीत पिकांची तग धरण्याची क्षमता कशी वाढते यावर माहिती दिली. वरिष्ठ शास्त्रज्ञ (मृदा) डॉ. गणेश गायकवाड यांनी माती परीक्षण, खत व्यवस्थापन आणि जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याच्या पद्धतींबाबत मार्गदर्शन केले. कीटक शास्त्रज्ञ प्रा. धनंजय मोहोड यांनी रेशीम उद्योग व तुती लागवडीबाबत माहिती देऊन शासकीय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. रावे कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप शिंदे यांनी बियाण्यांची उगवण क्षमता चाचणी व बीजप्रक्रियेचे महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांमार्फत प्रात्यक्षिक सादर केले. कार्यक्रमास रावे टास्क फोर्स प्रमुख डॉ. गोदावरी पवार तसेच कृषि विभागाच्या सहाय्यक कृषि अधिकारी श्रीमती के. डी. चांदणे यांची विशेष उपस्थिती होती.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उजळंबा येथे ग्रामीण कृषि कार्यानुभव जागरूकता कार्यक्रम (RAWE) अंतर्गत शिक्षण घेत असलेले कृषिदूत ची. जयंत भास्कर, मनीष बिष्णोई आणि नरेंद्र बंसिवाल यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांना श्री. प्रभाकर मोगले यांनी सहकार्य केले. या शेतकरी संवाद कार्यक्रमास उजळंबा परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.