बदलते हवामान, जमिनीचे
खालावत चाललेले आरोग्य, वाढता लागवड खर्च तसेच रासायनिक
निविष्ठांच्या अयोग्य वापराच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमध्ये संतुलित खत वापर,
मृदा आरोग्य संवर्धन आणि शाश्वत शेती पद्धतींबाबत जनजागृती
करण्याच्या उद्देशाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प (AICRPDA)
यांच्या वतीने दिनांक ८ जून २०२६ रोजी “संतुलित
खत वापर व खरीप पिकांचे व्यवस्थापन” या विषयावर विद्यापीठाच्या सायाळा ब्लॉकवर एकदिवसीय
शेतकरी जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
हा कार्यक्रम
विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच संशोधन संचालक डॉ. खिजर
बेग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. परिसरातील अनेक शेतकरी आणि कृषी
क्षेत्राशी संबंधित व्यक्तींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमात सहभाग
नोंदविला.
कार्यक्रमाच्या
प्रारंभी बदलत्या हवामान परिस्थितीत शाश्वत शेतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
वाढते उत्पादन खर्च,
रासायनिक खतांचा असंतुलित वापर, जमिनीची घटती
सुपीकता आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे संतुलित खत व्यवस्थापन व सुधारित शेती
तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले. तसेच एल-निनोच्या
संभाव्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेती तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचे
आवाहन करण्यात आले.
यावेळी
मृदाशास्त्रज्ञ डॉ. पपीता गौरखेडे यांनी खरीप हंगामातील विविध पिकांसाठी संतुलित
खत व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट केले. रासायनिक खतांचा अतिरेक जमिनीच्या भौतिक, रासायनिक
आणि जैविक गुणधर्मांवर विपरीत परिणाम करतो. त्यामुळे मृदा परीक्षणावर आधारित खत
व्यवस्थापन, सेंद्रिय खतांचा वापर, जैविक
खतांचा समावेश आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन तंत्रज्ञान स्वीकारणे गरजेचे
असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यानंतर डॉ.
तेजस्विनी कच्छ्वे यांनी सेंद्रिय शेती आणि मृदा आरोग्य संवर्धन या विषयावर
मार्गदर्शन करत शेतकऱ्यांना रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून सेंद्रिय व
जैविक घटकांचा वापर वाढविण्याचे आवाहन केले. शेणखत, गांडूळखत, हिरवळीची खते आणि जैविक खतांचा नियमित वापर केल्यास जमिनीची सुपीकता,
जलधारण क्षमता आणि पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असे त्यांनी सांगितले.
श्री. सुरेश खटिंग
यांनी कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक शेती पद्धतीचे महत्त्व विशद केले.
हवामान बदलामुळे निर्माण होणारी जोखीम कमी करण्यासाठी आंतरपीक पद्धती, पशुपालन,
फळबाग, कुक्कुटपालन यांसारख्या पूरक
व्यवसायांचा समावेश करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमादरम्यान
उपस्थित शेतकऱ्यांनी खरीप पीक नियोजन, खत व्यवस्थापन, मृदा परीक्षण, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, सेंद्रिय खतांचे प्रमाण आणि कोरडवाहू शेतीतील विविध तांत्रिक बाबींविषयी
प्रश्न विचारले. तज्ज्ञांनी त्यांच्या शंकांचे समाधानकारक निरसन केले.
हा कार्यक्रम यशस्वी
करण्यासाठी प्रकल्पाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे यांच्यासह डॉ. पपीता गौरखेडे, डॉ.
तेजस्विनी कच्छ्वे आणि श्री. सुरेश खटिंग यांनी विशेष परिश्रम घेतले. संतुलित खत
वापर, मृदा संवर्धन आणि शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार
करण्यासाठी अशा प्रकारचे कार्यक्रम अत्यंत उपयुक्त असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त
केले.
.jpeg)

