Saturday, June 6, 2026

वनामकृविच्या राजमाता जिजाऊ मुलींच्या वसतिगृहास माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांची सदिच्छा भेट

 

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक ५ जून २०२६ रोजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ मुलींच्या वसतिगृहास सदिच्छा भेट दिली. यावेळी कृषि महाविद्यालय, परभणीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, वसतिगृहाच्या सहाय्यक वसतिगृह अधीक्षिका डॉ. मीनाक्षी पाटील, कीटकशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद सोनकांबळे हेही उपस्थित होते.

भेटीदरम्यान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी वसतिगृहातील विद्यार्थिनींशी संवाद साधून त्यांच्या शैक्षणिक प्रगती, दैनंदिन दिनचर्या तसेच वसतिगृहातील विविध सुविधा, भोजन व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा आणि इतर आवश्यक बाबींची माहिती जाणून घेतली. विद्यार्थिनींनीही आपल्या सूचना व अपेक्षा मांडल्या.

यावेळी माननीय कुलगुरूंनी विद्यार्थिनींना उच्च शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त, आत्मविश्वास आणि स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे मार्गदर्शन केले. तसेच विद्यापीठ प्रशासन विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

विद्यार्थिनींनी माननीय कुलगुरू व सहयोगी अधिष्ठाता यांच्याशी मुक्तपणे संवाद साधत विविध विषयांवर चर्चा केली. या भेटीमुळे विद्यार्थिनींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

राजमाता जिजाऊ मुलींच्या वसतिगृहातील विद्यार्थिनींनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि व सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थिनींना प्रेरणा मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.