Thursday, June 4, 2026

आयआयआरएफ २०२६ रँकिंगमध्ये वनामकृविला राज्यात १ ला, राष्ट्रीय स्तरावर ३४ वा क्रमांक

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली वनामकृविचे राष्ट्रीय यश

परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने भारतीय शैक्षणिक संस्था मूल्यांकन प्रणाली (IIRF – Indian Institutional Ranking Framework) २०२६ च्या भारतातील कृषि व उद्यानविद्या विद्यापीठांच्या गटात महाराष्ट्रात १ला तर राष्ट्रीय स्तरावर ३४वा क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी नोंदविली आहे. नवी दिल्ली येथील आयआयआरएफ सेंटर फॉर इन्स्टिट्यूशनल रिसर्च (ICIR) तर्फे ही रँकिंग जाहीर करण्यात आली असून, विद्यापीठाला ३ जून २०२६ रोजी अधिकृत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

आयआयआरएफ ही भारतातील उच्च शिक्षण संस्थांची स्वतंत्र व संशोधनाधिष्ठित मूल्यांकन प्रणाली मानली जाते. विविध शैक्षणिक निकष, संशोधन कार्य, नवोपक्रम, पायाभूत सुविधा, विद्यार्थी सुविधा आणि विस्तार उपक्रमांच्या आधारे विद्यापीठांचे मूल्यमापन करण्यात येते. केंद्रीय, राज्य, अभिमत व खासगी विद्यापीठांच्या स्वतंत्र गटांमध्ये ही रँकिंग जाहीर केली जाते. कृषि व उद्यानविद्या विद्यापीठांच्या श्रेणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने मिळविलेले हे स्थान विशेष मानाचे मानले जात आहे.

विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व व प्रभावी मार्गदर्शनामुळे हे यश शक्य झाल्याची भावना विद्यापीठ परिवाराने व्यक्त केली आहे. याबाबत बोलताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, शिक्षण, संशोधन, विस्तार आणि नवोपक्रम क्षेत्रातील सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण कार्याची ही पावती आहे. विद्यापीठातील शिक्षक, शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांतून हे यश प्राप्त झाले आहे. तसेच महाराष्ट्र शासन, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद, पुणे तसेच विद्यापीठाच्या कार्यकारी व विद्वत परिषदेच्या सहकार्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार म्हणाले की, विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरण २०२० अवलंबून विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासास चालना देत त्यांना उद्योजकतेकडे वाटचाल करण्यासाठी शैक्षणिक प्रगती साधली आहे. तसेच सन २०२५ – २६ मध्ये विद्यापीठाद्वारा परिसर मुलाखतींचे आयोजन करून जवळपास १८० विद्यार्थ्यांना शासकीय व खासगी क्षेत्रातील विविध संस्थांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्यात आला असल्याची नोंदही घेण्यात आली.

मागील काही वर्षांत विद्यापीठाने शिक्षण, संशोधन व विस्तार क्षेत्रात अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले आहेत. विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सुविधा, वसतिगृहांची दुरुस्ती, अंतर्गत रस्त्यांचे नूतनीकरण, सीएसआर निधीतून ‘महाराष्ट्र यांत्रिकीकरण केंद्र’, कौशल्य विकास उपक्रम आणि ‘कॉमन इन्क्युबेशन सेंटर’ची स्थापना करण्यात आली. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, सहाव्या अधिष्ठाता समितीचे अभ्यासक्रम आणि पदव्युत्तर स्तरावरील बीएसएमए (BSMA) अभ्यासक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारतीय कृषि अनुसंधान परिषद (आयसीएआर) अंतर्गत असलेल्या राष्ट्रीय कृषि शिक्षण अधिस्वीकृती मंडळाकडून दिनांक १६ मे २०२५ रोजी विद्यापीठास अधिस्वीकृतीसाठी उच्चांकी ३.२१ गुण प्राप्त झाले असून, त्यास ‘ए-ग्रेड’ उत्कृष्ट मानांकन प्राप्त झाले आहे. तसेच विद्यापीठाच्या १० संशोधन केंद्रांना राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळाला आहे.

याशिवाय बाह्यस्त्रोत निधीतून सुरू असलेले संशोधन प्रकल्प, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी सामंजस्य करार, ‘माझा एक दिवस माझ्या बळिराजासोबत’ हा शेतकरी उपक्रम, ऑनलाईन शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद, तसेच विद्यापीठाने विकसित केलेले नवीन पीक वाण, अवजारे व तंत्रज्ञान यांच्या प्रभावी विस्तारामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक व संशोधन कार्याला अधिक गती मिळाली आहे. या सर्व बाबींचा सकारात्मक परिणाम आयआयआरएफ रँकिंगमध्ये दिसून आला आहे.

या यशामध्ये शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, नियंत्रक श्री. अनंत कदम, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर तसेच सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान राहिले आहे.

या सर्व संबंधित माहितीचे संकलन व सादरीकरण शिक्षण संचालनालयातील तांत्रिक अधिकारी तथा विभागप्रमुख डॉ. सचिन मोरे आणि तांत्रिक अधिकारी डॉ. गणपत कोटे यांनी केले.

या यशामुळे विद्यापीठ परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध स्तरांतून विद्यापीठावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.