Monday, June 1, 2026

वनामकृविच्या समुदायिक विज्ञान महाविद्यालयात जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त तंबाखूमुक्ती जनजागृती कार्यक्रम

 

जागतिक तंबाखू निषेध दिनानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत समुदायिक विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दिनांक १ जून २०२६ रोजी तंबाखू व व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी जीवनशैलीची जाणीव निर्माण करून तंबाखूमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहयोगी अधिष्ठाता डॉ. नीता गायकवाड उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तंबाखू सेवनामुळे होणारे शारीरिक, मानसिक तसेच सामाजिक दुष्परिणाम याविषयी सविस्तर माहिती दिली. तंबाखूजन्य पदार्थांमुळे कर्करोग, हृदयरोग, श्वसनाचे आजार यांसारख्या गंभीर व्याधी उद्भवतात, त्यामुळे युवकांनी व्यसनांपासून दूर राहून निरोगी व सकारात्मक जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. शंकर पुरी यांनी तंबाखूमुक्त जीवनाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांना तंबाखू व इतर सर्व प्रकारच्या व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ दिली. त्यांनी युवकांनी स्वतः व्यसनमुक्त राहण्याबरोबरच समाजातही जनजागृती करून तंबाखूविरोधी चळवळ अधिक प्रभावी करण्याची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तंबाखूमुक्त समाज निर्मितीसाठी सक्रिय योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला. संपूर्ण परिसरात “तंबाखूला नकार – आरोग्याला होकार” हा संदेश देत जनजागृती करण्यात आली.