शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यात जास्तीत जास्त संवाद होणे गरजेचे.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील सेंद्रिय शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र आणि शेकरू फाऊंडेशन
यांच्या संयुक्त विद्यमाने “एल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामाचे नियोजन” या
विषयावर ऑनलाइन मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन दिनांक १६ जून २०२६ रोजी करण्यात
आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. तर प्रमुख पाहुणे
म्हणून संचालक संशोधन डॉ. खिजर बेग हे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन
करताना माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, यावर्षी
मोसमी पावसाची परिस्थिती अनिश्चित असून शेतकऱ्यांनी पेरणीबाबत घाई करू नये.
पेरणीसाठी किमान ७५ ते १०० मिमी पाऊस झाल्यानंतरच पेरणी करणे हितावह राहील.
हवामानातील बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आंतरपीक पद्धती, मिश्र
पीक पद्धती, सेंद्रिय खते, जिवाणू खते,
हिरवळीची खते यांचा अधिकाधिक वापर करावा, असे
त्यांनी सांगितले. तसेच जमीन व हवामानाच्या प्रकारानुसार योग्य पीक व पीक पद्धतीची
निवड करणे, खतांवरील आणि
एकूण लागवडीवरील खर्च कमी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. संभाव्य
हवामान जोखमीमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी रुंद वरंबा-सरी (Broad Bed
and Furrow) पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन
त्यांनी केले. खेत बचाव अभियान कार्यक्रमातून खतांचा कमी आणि काटेकोर वापर यावर भर
देण्यात येत आहे असे त्यांनी सांगितले.
अशा कार्यक्रमात
शेतकरी आणि शास्त्रज्ञ यांच्यात जास्तीत जास्त संवाद होणे गरजेचे असून त्यातून अनेक शंकांचे निरसन होऊन
योग्य निर्णय घेण्यास अनेक शेतकरी बंधू भगिनी यांना मदत मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात प्रमुख वक्ते विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ.
आनंद गोरे यांनी एल निनो परिस्थितीत खरीप पिकांचे व्यवस्थापन याविषयी सविस्तर
मार्गदर्शन केले. त्यांनी उताराला आडवी पेरणी, आंतरपीक
पद्धतीचा अवलंब, तसेच कमी कालावधीची वाण निवडण्याचा सल्ला
दिला. पाऊसाचे आगमन ७ जुलै पर्यंत झाल्यास मग उडीद सोयाबीन कपाशी अशी सर्वच पिके
घेता येतील. पावसास थोडा उशीर झाल्यास मुग, उडीद आणि भुईमूग या पिकांऐवजी कापशी,
तूर, बाजरी, सोयाबीन
सूर्यफूल ही पिके आणि आंतरपीक पद्धतीत पिके
घ्यावीत आणि अधिक उशीर झाल्यास तूर, बाजरी, विविध
आंतरपीक पद्धती जसे एरंडी अधिक धने, यांसारख्या कमी पाण्यावर तग
धरणाऱ्या पिकांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी स्पष्ट
केले. याशिवाय शेत तळे आणि इतर प्रकारे केलेले जल संधारण यातील पाणी पावसाच्या खंड
काळात काटेकोर पणे संरक्षित सिंचन म्हणून वापरावे.
कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित
केले. पीक नियोजन, वाण निवड, खत व्यवस्थापन, पावसातील अनिश्चितता, आंतरपीक पद्धती आणि जलसंधारण उपाययोजना यासंदर्भातील प्रश्नांना
तज्ज्ञांनी समाधानकारक उत्तरे दिली.
यावेळी विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, विभाग प्रमुख, कृषी विभाग अधिकारी कर्मचारी, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तसेच डॉ. एम. दीन, डॉ.
जी. के. गायकवाड तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी शेतकरी
बांधवांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर शास्त्रशुद्ध पीक नियोजन करण्याचा
निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व समन्वय सेंद्रिय शेती संशोधन
व प्रशिक्षण केंद्र आणि शेकरू फाऊंडेशन यांच्या वतीने करण्यात आले. शेतकरी
बांधवांनी या मार्गदर्शनाचा लाभ घेऊन हवामान बदलाच्या आव्हानांवर मात करत शाश्वत
शेतीकडे वाटचाल करावी, असे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमास
शेतकरी, कृषी तज्ज्ञ व कृषी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने
सहभाग नोंदविला.


.jpeg)

