जालना जिल्ह्यातील
गोलापांगरी येथील कृषि पदवीधारक कृषि कन्या अंकिता मोरे यांच्या दुधना पोल्ट्री
फार्मला माननीय कुलगुरू प्रा (डॉ) इन्द्र मणि यांनी भेट देऊन त्यांच्या
नाविन्यपूर्ण कुक्कुटपालन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांनी अंकिता मोरे व
त्यांच्या परिवाराचे अभिनंदन करत या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. अंकिता मोरे
यांनी घरातील कृषि परंपरा आणि आजीच्या मार्गदर्शनातून प्रेरणा घेत शेवगा
लागवडीसोबत मुक्त कुक्कुटपालन पद्धतीवर आधारित कमी खर्चिक व शाश्वत पोल्ट्री मॉडेल
विकसित केले आहे. शेतातील उपलब्ध उत्पादनांचा वापर करून कुक्कुटपालन करणारे हे
मॉडेल सध्या शेतकरी आणि उद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या अभिनव प्रयोगाला
आतापर्यंत चार हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. तसेच पोल्ट्री
व्यवसायापासून दुरावलेल्या सुमारे १५०० व्यावसायिकांना पुन्हा या व्यवसायाकडे
वळण्यासाठी प्रेरित करण्यात अंकिता मोरे यांना यश आले आहे.
यावेळी माननीय
कुलगुरू यांनी दुधना पोल्ट्री फार्मची सविस्तर पाहणी करून प्रकल्पाचा आर्थिक
ताळेबंदची माहिती घेतली. तसेच या मॉडेलच्या माध्यमातून कृषि क्षेत्रात
उद्योगाभिमुख प्रशिक्षणाची मोठी संधी उपलब्ध असल्याचे नमूद केले. कृषि विज्ञान
केंद्रांच्या माध्यमातून या उपक्रमाचा विकास करून भविष्यात उद्योगाभिमुख प्रशिक्षण
केंद्र म्हणून कार्यरत राहावे व ग्रामीण भागातील युवकांना स्वयंरोजगार आणि
उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करावे, अशी अपेक्षाही त्यांनी
व्यक्त केली.
भेटीदरम्यान मोरे
परिवाराने विकसित केलेल्या व ‘केशवराज’ या नावाने नोंदणीकृत आंबा वाणाचीही
माहिती जाणून घेतली. शेती, फलोत्पादन आणि कुक्कुटपालन क्षेत्रातील विविध नाविन्यपूर्ण प्रयोगांबद्दल
त्यांनी मोरे परिवाराचे विशेष कौतुक केले.
या प्रसंगी डॉ.
भगवान आसेवार (संचालक शिक्षण), डॉ. राकेश अहिरे
(संचालक विस्तार शिक्षण), डॉ. एस. डी. सोमवंशी (कार्यक्रम
समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, बदनापूर),
डॉ. श्रीकृष्ण सोनुने (कृषि विज्ञान केंद्र, खरपुडी),
डॉ. राहुल कदम (विषय विशेषज्ञ), डॉ. हनुमंत
आगे (विषय विशेषज्ञ) तसेच अंकिता मोरे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते.
या भेटीमुळे कृषिपूरक उद्योग, ग्रामीण उद्योजकता आणि नाविन्यपूर्ण शेती प्रयोगांना नवी दिशा मिळणार असल्याचा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

.jpeg)