पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड ही काळाची गरज : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
जागतिक पर्यावरण
दिनाचे औचित्य साधून यंदाच्या वर्षाची अधिकृत थीम “निसर्गापासून
प्रेरित : हवामानासाठी, आपल्या भविष्यासाठी” (Inspired by
Nature: For Climate, For Our Future) यानुसार वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सेंद्रिय व नैसर्गिक शेती संशोधन व प्रशिक्षण केंद्र
आणि सामाजिक वनीकरण विभाग, परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने
विद्यापीठाच्या सायाळा ब्लॉक येथे वृक्षलागवड अभियानाचा शुभारंभ दिनांक ५ जून २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख पाहुणे
म्हणून परभणी जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री. पंकज कुमावत (आयपीएस) उपस्थित
होते, तर विशेष अतिथी म्हणून माननीय विभागीय वन अधिकारी श्रीमती सायमा पठाण
यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी
मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमास विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन
संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे,
माजी शिक्षण संचालक डॉ. उदय खोडके, सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, विभाग प्रमुख डॉ. हिराकांत काळपांड, डॉ विलास खर्गखराटे, प्रमुख
अन्वेषक डॉ. आनंद गोरे,
शास्त्रज्ञ डॉ. मीनाक्षी पाटील, डॉ. पपीता गौरखेडे, डॉ. श्रद्धा धुरागुडे
तसेच वन विभागाचे अधिकारी श्री गजापुरे, श्रीमती निलोफर पठाण, श्रीमती चंद्रमोरे,
श्रीमती गोरे आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षलागवड ही केवळ
सामाजिक जबाबदारी नसून भावी पिढ्यांसाठीची अमूल्य गुंतवणूक असल्याचे प्रतिपादन केले.
हवामान बदल,
वाढते तापमान, भूजल पातळीतील घट, जैवविविधतेचा ऱ्हास आणि नैसर्गिक संसाधनांवरील वाढता ताण या गंभीर आव्हानांवर
मात करण्यासाठी व्यापक वृक्षारोपण व त्यांचे संगोपन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी
नमूद केले. ते पुढे म्हणाले की, “एक वृक्ष म्हणजे केवळ हरित संपत्ती
नसून तो शुद्ध हवा, पाणी संवर्धन, मृदा
संरक्षण आणि पर्यावरणीय संतुलनाचा आधार आहे.” प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान एक
तरी वृक्ष लावून त्याचे जतन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन
त्यांनी केले. विद्यापीठ परिसर हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक
बनविण्यासाठी विद्यापीठ सातत्याने विविध उपक्रम राबवत असून, विद्यार्थ्यांनी
आणि शेतकऱ्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
माननीय पोलीस
अधीक्षक श्री. पंकज कुमावत (आयपीएस) यांनी पर्यावरण संरक्षण ही सामूहिक जबाबदारी
असून समाजातील प्रत्येक घटकाने वृक्षलागवड चळवळीत सक्रिय सहभाग घ्यावा, असे
आवाहन केले. माननीय विभागीय वन अधिकारी श्रीमती सायमा पठाण यांनी सामाजिक वनीकरण
विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देत पर्यावरणपूरक
जीवनशैलीचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
विद्यापीठाच्या सायळा
ब्लॉकमधील गट क्रमांक ३१ ते ४५ आणि ९१ ते १०३ या परिसरात सुमारे ३० मीटर रुंदी आणि
९ किलोमीटर लांबीच्या परिसरात एकूण २४.०० हेक्टर क्षेत्रावर (दोन टप्प्यात) विविध
फळझाडे तसेच औषधी वनस्पतींची लागवड करून हरित पट्टा विकसित करण्यात येणार आहे.
तसेच सायळा ब्लॉक (गट क्र. ५०, ५१ व ५४) येथे १०.०० हेक्टर क्षेत्रावर
औषधी, सुगंधी वनस्पती तसेच फळझाडांचे रोपवन विकसित करून पर्यावरण संवर्धन, जैवविविधता
वाढ आणि विद्यापीठ परिसर अधिक हरित करण्याच्या उद्देशाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम
राबविण्यात येत असून तो सन २०२५ ते २०२८ या तीन वर्षांच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने
पूर्ण करण्यात येणार आहे.
याबरोबरच विद्यापीठाने हरित विद्यापीठ संकल्पनेअंतर्गत उल्लेखनीय कार्य सुरू केले आहे. विद्यापीठाच्या परिसरातून जाणाऱ्या ४.५ किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गालगत ५०० मीटर रुंद हरित पट्टा विकसित करण्यात आला आहे.


.jpeg)
.jpeg)