Sunday, June 7, 2026

“माँ, माटी और जमीन” संकल्पनेतून रासायनिक खतांचा वापर २५ टक्क्यांनी कमी करण्याचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांचे आवाहन

वनामकृविच्या परभणी येथील कृषि महाविद्यालयाद्वारा सावरगाव येथे खेत बचाव अभियानांतर्गत भव्य कृषि मेळावा संपन्न

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील कृषि महाविद्यालय, परभणी अंतर्गत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम (रावे - RAWE), राष्ट्रीय सेवा योजना तसेच विद्यापीठाचे रेशीम संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी “खेत बचाव अभियानांतर्गत” कृषि मेळाव्याचे आयोजन दिनांक ०६ जून २०२६ रोजी सावरगाव खु. ता. मानवत, जि. परभणी येथे करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याला ३५२ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य आणि सावरगाव गावचे सरपंच श्री. गजानन घाटुळ उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. स्वाती झाडे, डॉ. विक्रम घोळवे, डॉ. संदीप शिंदे व प्रा. धनंजय मोहड यांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास प्रभारी अधिकारी डॉ. धीरज कदम, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. मकरंद भोगावकर, डॉ. धीरज पाथ्रीकर, डॉ. फारिया खान, कृषि सहाय्यक श्री. नारायण पवार तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री. माणिकराव सोन्नेकर, श्री. परमेश्वर नाना घाटुळ, श्री. आबासाहेब घाटुळ, श्री. संतोष सावते, श्री. अर्जुन घाटुळ व श्री. बबनराव गव्हाणे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. तसेच RAWE अंतर्गत गावामध्ये कार्यरत असलेले ४० विद्यार्थीही कार्यक्रमास उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. तसेच रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अति वापरामुळे त्यांचे अंश उत्पादित धान्यामध्ये राहतात, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. “माँ, माटी और जमीन” या संकल्पनेनुसार शेतजमिनीची काळजी घेताना रासायनिक खतांचा वापर किमान २५ टक्क्यांनी कमी करून जैविक खतांचा वापर वाढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्यांनी FFF (Fertilizer, Fuel, Foreign Currency) या सूत्राचे पालन करण्याचे आवाहन केले. या सूत्रानुसार खते, इंधन व परकीय चलनाचा वापर काटेकोरपणे आणि योग्य प्रमाणात करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, रुंद वरंबा-सरी पद्धत या तंत्रज्ञानाचा वापर केल्यास अतिवृष्टीच्या परिस्थितीत पाण्याचा निचरा होतो, तर दुष्काळी परिस्थितीत जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. तसेच शक्यतो दरवर्षी शेतीची नांगरणी न करता ३ ते ४ वर्षांतून एकदाच खोल नांगरणी करावी. सरळवाण्यामध्ये बियाण्यांची साठवण करून त्यांचा पेरणीसाठी वापर करावा. या पद्धतींचा अवलंब केल्यास पेरणी खर्चात ३० ते ४० टक्क्यांपर्यंत बचत होऊन प्रति एकर ३ ते ४ क्विंटल उत्पादनवाढ होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांनी माती परीक्षण करूनच रासायनिक खतांचा संतुलित वापर करावा तसेच गांडूळ खत व शेणखत यांसारख्या जैविक खतांचा वापर वाढवावा, असे आवाहन केले. शेतीतील लागवड खर्च, उत्पादन व इतर बाबींची दैनंदिन नोंद ठेवावी तसेच पावसाच्या अंदाजानुसार पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करावे, असेही त्यांनी नमूद केले.

सावरगाव खु. व मंगरुळ या गावांमध्ये रावे अंतर्गत कार्यरत असलेल्या ४० विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केले. हे विद्यार्थी संबंधित गावांमध्ये पूर्णवेळ वास्तव्यास राहून शेतीविषयक अभ्यास करतात व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज पाथ्रीकर, डॉ. फारिया खान तसेच तुती पीक उत्पादक शेतकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृषि कन्या स्नेहा थोरात व मनिषा सोनटक्के यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. मकरंद भोगावकर यांनी केले.