Thursday, June 11, 2026

वनामकृविच्या ‘ माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ उपक्रमासह ‘खेती बचाओ अभियान’ प्रभावीपणे राबविले

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्यासह ११ चमूंनी मराठवाडाभर शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत राबविण्यात येणारामाझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत” हा उपक्रम दर महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष जाऊन आयोजित केला जातो. यावेळी या उपक्रमासोबतच केंद्र शासन पुरस्कृतखेती बचाओ अभियान” देखील प्रभावीपणे राबविण्यात आले. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या नेतृत्वाखाली व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संशोधन केंद्रे, कृषि व संलग्न महाविद्यालये, विस्तार शिक्षण केंद्रे, कृषि विज्ञान केंद्रे तसेच कृषि विभागाच्या सहकार्याने हे उपक्रम राबविण्यात येत आहेत.

या उपक्रमांतर्गत दिनांक १० जून २०२६ रोजी विद्यापीठाच्या ११ चमूंच्या माध्यमातून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्यासह विद्यापीठाचे २५ शास्त्रज्ञ आणि कृषि विभागाचे १४ अधिकारी-कर्मचारी यांनी प्रक्षेत्र भेटी, चर्चासत्रे, कृती प्रात्यक्षिके व शेतकरी मेळाव्यांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांशी संवाद साधला. या माध्यमातून सुमारे ४७० शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

या उपक्रमांतर्गत विस्तार शिक्षण संचालनालयाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या वतीने मौजे खांबेगाव, ता. पूर्णा, जि. परभणी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली राबविण्यात आला. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. किरण जाधव, डॉ. सुदाम शिराळे व डॉ. दिगंबर पटाईत उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनीखेती बचाओ अभियान” चे महत्त्व विशद केले. ते म्हणाले की, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे. तसेच रासायनिक खते व कीटकनाशकांच्या अति वापरामुळे त्यांचे अवशेष उत्पादित धान्यामध्ये राहून नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात. त्यामुळे शेतजमिनीची काळजी घेताना रासायनिक खतांचा वापर किमान २५ टक्क्यांनी कमी करून जैविक खतांचा वापर वाढविणे आवश्यक आहे.

यावेळी बोलताना विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी सांगितले की, पेरणीची घाई न करता पुरेशा पावसानंतरच पेरणी करावी. शेतकऱ्यांनी शेती करताना शास्त्रीय पद्धतींचा अवलंब करावा. विद्यापीठाने विकसित व शिफारस केलेल्या वाणांचा, विविध तंत्रज्ञानांचा, बीजप्रक्रिया तसेच बायोमिक्स, रायझोबियम आणि पीएसबी यांसारख्या जैविक निविष्ठांचा वापर केल्यास उत्पादनवाढीस निश्चितच मदत होईल.

मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी आपल्या भाषणात विद्यापीठाच्या विविध समाजमाध्यमांद्वारे शेतकऱ्यांपर्यंत माहिती पोहोचविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली.

विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी मराठवाड्यातील विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये खरीपातील कापूस, सोयाबीन व तूर या प्रमुख पिकांसह इतर पिकांच्या लागवड तंत्रज्ञान, एकात्मिक कीड व्यवस्थापन, मातीचे आरोग्य तसेच यावर्षीच्या संभाव्य एल-निनो परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील पीक नियोजन व व्यवस्थापन याविषयी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. पावसाचे अनियमित वितरण, पावसास होणारा उशीर, पावसातील खंड आणि संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा पिकांवर होणारा परिणाम लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी योग्य पीक निवड, कमी कालावधीच्या वाणांचा वापर, आंतरपीक पद्धतीचा अवलंब, मृदा व जलसंवर्धन तंत्रज्ञानाचा वापर तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार पीक व्यवस्थापन करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

तसेच रुंद वरंबा-सरी (Broad Bed and Furrow - BBF) पद्धतीचे महत्त्व उपस्थितांना समजावून सांगण्यात आले. या पद्धतीमुळे अतिरिक्त पाण्याचा निचरा सुलभ होतो, जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो, मुळांची वाढ चांगली होते तसेच पिकांची वाढ आणि उत्पादनक्षमता सुधारण्यास मदत होते. बदलत्या हवामान परिस्थितीत ही पद्धत कोरडवाहू शेतीसाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगण्यात आले. याशिवाय सेंद्रिय खते व जीवाणू खतांचा वापर करून रासायनिक खतांवरील खर्च कमी करण्याचे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमात परभणी येथील विस्तार शिक्षण संचालनालय, कृषि महाविद्यालय (लातूर), कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्र, छत्रपती संभाजीनगर येथील कृषि महाविद्यालय, राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्प तसेच विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्रे (छत्रपती संभाजीनगर, अंबाजोगाई व परभणी) आणि कृषि विज्ञान केंद्रे (छत्रपती संभाजीनगर, बदनापूर, खामगाव व तुळजापूर), एकात्मिक शेती पद्धती, अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प आदी संलग्न कार्यालयांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. सूर्यकांत पवार, प्रा. अरुण गुट्टे, डॉ. आनंद गोरे, डॉ. किरण जाधव, डॉ. सुदाम शिराळे, डॉ. दिगंबर पटाईत, डॉ. टी. बी. सुरपाम, डॉ. गणेश मंडलिक, डॉ. एफ. आर. तडवी, डॉ. एस. आर. धांडगे, श्री. अरबाड बी. के., श्री. मधुकर मांडगे, श्री. एस. आर. रोडे, कृषि विज्ञान केंद्र, दिघोळअंबा (अंबाजोगाई) येथील प्रा. नरेंद्र जोशी, श्री. जाधव तसेच कृषि विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष योगदान दिले.