वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी मान्यताप्राप्त आणि मराठवाडा
शेती सहाय्य मंडळ संचलित कृषी महाविद्यालय, खरपुडी (जि. जालना)
या महाविद्यालयाचे नामकरण ‘डॉ. बद्रीनारायण बारवाले कृषी महाविद्यालय,
खरपुडी’ असे करण्यात आले. यानिमित्त आयोजित नामकरण सोहळ्यात वसंतराव
नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि यांच्या शुभहस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम दिनांक
२४ जून २०२६ रोजी महाविद्यालयाच्या परिसरामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न
झाला. अध्यक्षस्थानी मराठवाडा शेती सहाय्य मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेंद्रजी बारवाले हे उपस्थित होते. तसेच
विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
सांगितले की, डॉ. बद्रीनारायण बारवाले यांचे कृषी क्षेत्रातील योगदान अत्यंत मोलाचे,
दूरदृष्टीपूर्ण आणि प्रेरणादायी आहे. त्यांच्या नावाने महाविद्यालयाचे
नामकरण होणे ही गौरवाची बाब असून यामुळे संस्थेला निश्चितच नवी ओळख आणि प्रगतीची दिशा
मिळेल. तसेच त्यांनी महाविद्यालयाने भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR) मानांकन प्राप्त करण्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्याचे सूचित केले.
अध्यक्षीय समारोपात मा. श्री. राजेंद्रजी बारवाले यांनी संस्थेच्या
स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेतला. महाविद्यालयाच्या नामकरणामुळे संस्थेवर
एक मोठी जबाबदारी आली असून, त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी संस्था कटिबद्ध राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी आपल्या मनोगतात डॉ. बद्रीनारायण बारवाले
यांच्या कृषी विकासाशी निगडित कार्याची माहिती देत महाविद्यालयाची आतापर्यंतची
यशस्वी परंपरा भविष्यात अधिक बळकट होत राहील, असा विश्वास व्यक्त केला.
प्रास्ताविकात संस्थेचे सचिव कृषिरत्न मा. श्री. विजयआण्णा बोराडे यांनी
मराठवाडा शेती सहाय्य मंडळाच्या स्थापनेपासूनच्या वाटचालीची माहिती दिली. तसेच डॉ.
बद्रीनारायण बारवाले यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या कृषी क्षेत्रातील
उल्लेखनीय योगदानावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी डॉ. बद्रीनारायण बारवाले यांच्या कृषी, संशोधन आणि बीज
क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. विद्यार्थ्यांना
गुणवत्तापूर्ण कृषी शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी संस्थेने केलेल्या प्रयत्नांचे
विशेष कौतुक करण्यात आले.
या प्रसंगी संस्थेचे सचिव कृषिरत्न मा. श्री. विजयआण्णा बोराडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास देशमुख, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. श्रीकृष्ण सोनुने, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी तसेच परिसरातील प्रतिष्ठित नागरिक व उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. जे. एस. मंठेकर यांनी केले, तर आभार प्रदर्शन संस्थेचे विश्वस्त तथा कृषिभूषण मा. भगवान दादा काळे यांनी केले.


.jpeg)
.jpeg)
.jpeg)