Saturday, June 13, 2026

अल निनोच्या पार्श्वभूमीवर वनामकृविद्वारा खरीप पिक व्यवस्थापन विषयक शेतकरी-शास्त्रज्ञ ऑनलाईन कृषि संवाद संपन्न

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून १०२ व्या भागाचे यशस्वी आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय तसेच मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र, लातूर यांच्या वतीने दिनांक १२ जून २०२६ रोजी आभासी माध्यमाद्वारे शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाच्या १०२ व्या भागाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना अल निनोच्या पार्श्वभूमीवर खरीप हंगामातील पिक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले त्यास शेतकरी आणि कृषि क्षेत्रातील तज्ज्ञांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आणि प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्री. एस. बी. देशमुख यांनी केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी प्रास्ताविकातून कृषि विद्यापीठाने विकसित केलेले अद्ययावत तंत्रज्ञान आणि संशोधनाधारित माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची गरज अधोरेखित केली.

यावेळी विभागीय कृषि विस्तार शिक्षण केंद्र, लातूर येथील विस्तार कृषि विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी अल निनोचा पर्जन्यमानावर होणारा परिणाम, तसेच खरीप हंगामातील सोयाबीन व तूर पिकांच्या प्रभावी व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजनांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. बदलत्या हवामान परिस्थितीत पिकांचे नियोजन, योग्य वाणांची निवड आणि जलसंधारणाच्या उपायांवर त्यांनी विशेष भर दिला. तसेच कृषि विभागाचे श्री. राजेंद्र कदम यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषि विभागाच्या विविध योजना आणि अनुदानांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, प्रगतशील शेतकरी श्री. डोंगापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बेद्रे एस. बी. यांनी केले, तर आभार प्रदर्शन कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्री. देशमुख एस. बी. यांनी केले.

या ऑनलाईन संवाद कार्यक्रमातून शेतकऱ्यांना अल निनोच्या संभाव्य परिणामांचा सामना करण्यासाठी आवश्यक कृषि तांत्रिक मार्गदर्शन मिळाले असून, खरीप हंगामातील पिकांचे नियोजन अधिक प्रभावीपणे करण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.