वनामकृविद्वारा “खेत बचाओ अभियान” अंतर्गत मौजे पेठशिवनी येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न
माननीय
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्रीय कृषी व
किसान कल्याण मंत्री श्री. शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वात देशभर “खेत बचाओ अभियान” राबविण्यात येत आहे. “स्वस्थ माती, सक्षम किसान, समृद्ध
भारत” या संकल्पनेवर आधारित या अभियानाचा प्रमुख उद्देश मातीचे आरोग्य संवर्धन,
जलसंधारण, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन,
पर्यावरण संरक्षण तसेच शाश्वत शेतीविषयी शेतकऱ्यांमध्ये व्यापक
जनजागृती निर्माण करणे हा आहे.
या अभियानाच्या
अनुषंगाने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या वतीने माननीय कुलगुरू प्रा.
(डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार
यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २० जून २०२६ रोजी परभणी जिल्ह्यातील पालम
तालुक्यातील मौजे पेठशिवनी येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी शेतकऱ्यांना एल-निनोच्या संभाव्य परिणामांबाबत तसेच आकस्मिक पीक नियोजन या
विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
अध्यक्षस्थानावरून
मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी मातीचे आरोग्य हेच
शेती, पशुधन आणि मानवाच्या
सुदृढ आरोग्याचा मूलभूत पाया असल्याचे स्पष्ट केले. मृदेचे आरोग्य चांगले
राहिल्यास पिकांची उत्पादकता वाढते, पर्यावरणाचा समतोल राखला
जातो आणि शेती अधिक शाश्वत बनते, असे त्यांनी सांगितले.
मृदेची सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी रासायनिक खतांचा वापर किमान २५ टक्क्यांनी कमी
करून जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
यावेळी
त्यांनी हिरवळीच्या खतांचा अधिकाधिक वापर,
जैविक खतांचा अवलंब, पीक फेरपालट पद्धतीचा
स्वीकार तसेच मर्यादित प्रमाणात नैसर्गिक शेती पद्धती अंगीकारण्याचे आवाहन केले.
कृषी क्षेत्रासमोरील बदलते हवामान, जमिनीची घटती सुपीकता आणि
उत्पादन खर्चातील वाढ या आव्हानांचा सामना करण्यासाठी शास्त्रज्ञांनी
प्रयोगशाळेतील संशोधन थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे
त्यांनी नमूद केले.
शास्त्रज्ञांनी
जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या संपर्कात राहून सातत्याने संवाद साधावा, त्यांच्या अडचणी समजून घेऊन स्थानिक परिस्थितीनुसार
तंत्रज्ञान विकसित करावे, असे आवाहन करताना त्यांनी सांगितले
की, सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत शेतकरी आणि शास्त्रज्ञ
यांनी खांद्याला खांदा लावून कार्य केल्यासच कृषी क्षेत्र अधिक सक्षम होईल.
एकेकाळी
देशाची लोकसंख्या ४० कोटी असताना भारताला अन्नटंचाईचा सामना करावा लागत होता; मात्र आज १४० कोटी लोकसंख्या असूनही भारत केवळ
अन्नधान्यात आत्मनिर्भर नाही, तर जगातील अनेक देशांना
अन्नपुरवठा करण्याची क्षमता बाळगतो. या अभूतपूर्व यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या
कष्टकरी शेतकरी बांधवांना जाते, असे गौरवोद्गार काढत त्यांनी
शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.
शेती हा केवळ
व्यवसाय नसून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे शेती आणि शेतकऱ्यांना
समाजात योग्य सन्मान, आधुनिक तंत्रज्ञानाची
साथ आणि धोरणात्मक पाठबळ मिळणे ही काळाची गरज असल्याचे सांगून त्यांनी “स्वस्थ
माती, सक्षम किसान, समृद्ध भारत” या
संकल्पनेला प्रत्यक्षात आणण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
शिक्षण संचालक
डॉ. भगवान आसेवार यांनी एल-निनोमुळे पावसाचे स्वरूप अनिश्चित राहण्याची शक्यता
व्यक्त करत कमी पाण्यावर येणाऱ्या पिकांची निवड,
जलसंधारण आणि योग्य पीक व्यवस्थापनाचे महत्त्व अधोरेखित केले. रुंद
सरी-वरंबा पद्धतीने पेरणी केल्यास अतिवृष्टीच्या काळात पाण्याचा निचरा होतो आणि
कमी पावसाच्या परिस्थितीत जमिनीत ओलावा टिकून राहतो, असे
त्यांनी स्पष्ट केले.
प्रास्ताविकात
डॉ. राहुल रामटेके यांनी एल-निनो आणि जागतिक पातळीवरील संघर्षजन्य परिस्थितीमुळे
निर्माण होणाऱ्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर बदलत्या हवामानाशी सुसंगत
तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीचे योग्य नियोजन करण्याचा सल्ला दिला.
मृदा
शास्त्रज्ञ डॉ. गणेश गायकवाड यांनी मृदा आरोग्य सुधारण्यासाठी सेंद्रिय कर्ब
वाढविणे तसेच शेणखत व कंपोस्ट खतांचा वापर आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ. चंद्रशेखर
अंबाडकर यांनी बायोमिक्स आणि सेंद्रिय खतांचे फायदे स्पष्ट केले. डॉ. गोपाळ शिंदे
व डॉ. दयानंद टेकाळे यांनी कृषी क्षेत्रातील यांत्रिकीकरणाविषयी मार्गदर्शन केले.
डॉ. सुमंत जाधव यांनी सूक्ष्म सिंचन पद्धती आणि पाणी बचतीचे उपाय सांगितले, तर डॉ. अनिल कांबळे यांनी मृदा व जलसंधारणाचे
महत्त्व पटवून दिले.
या
कार्यक्रमास पेठशिवनी व शिंगणापूर परिसरातील सुमारे ७० शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. दत्ता पाटील,
डॉ. विशाल इंगळे आणि डॉ. ओमकार गुप्ता यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वसू निओटेक कंपनीचे सभासद, कंपनीचे संचालक श्री. संभाजी शिराळे तसेच गावातील मान्यवर श्री. मंचकराव
शिंगारे, श्री. प्रेमनारायण शेटे आणि श्री. गुरव यांनी विशेष
सहकार्य केले.
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
