सामाजिक वनीकरण व नैसर्गिक संसाधन संवर्धन ही काळाची गरज : : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचा उद्यानविद्या विभाग आणि सामाजिक
वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ जून २०२६ रोजी विद्यापीठाच्या
सिम्पोजियम सभागृहात आयोजित ‘रोपवाटिका व्यवस्थापन व जैविक खत निर्मिती’ या एकदिवसीय
प्रशिक्षण कार्यक्रमास परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील
वनरक्षक, वनपाल आणि विभागीय वन अधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त
प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे
होते. यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे, सहयोगी संचालक (बियाणे) डॉ. हिराकांत
काळपांडे, विभागीय वन अधिकारी श्रीमती पुष्पा पवार आणि श्रीमती एस. एस. पठाण आदींची
प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, वृक्षपूजन आणि वृक्षारोपण करण्यात आले.
अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी शाश्वत शेती
आणि पर्यावरण संवर्धनासाठी सामाजिक वनीकरणाची आवश्यकता अधोरेखित केली. ज्या
शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध आहे त्यांनी आपल्या क्षेत्रापैकी किमान ३०
टक्के क्षेत्रावर सामाजिक वनीकरण उपक्रम राबवावेत, असे आवाहन त्यांनी केले.
वृक्षलागवडीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते, भूजल पातळी
सुधारते, कार्बन शोषण वाढते आणि शेतकऱ्यांना दीर्घकालीन
आर्थिक लाभ मिळतो, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी कडुलिंबाच्या
वृक्षाचे महत्त्व विशेषत्वाने अधोरेखित केले. कडुलिंब हा पर्यावरणपूरक, औषधी गुणधर्मांनी युक्त आणि शेतीसाठी अत्यंत उपयुक्त वृक्ष असून त्याचा
वापर नैसर्गिक कीड नियंत्रणासाठी प्रभावी ठरतो, असे त्यांनी
नमूद केले. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेताच्या बांधावर तसेच उपलब्ध जागेत
कडुलिंबासह इतर उपयुक्त वृक्षांची लागवड करावी, असे आवाहनही
त्यांनी केले शेतकऱ्यांनी जैविक खतांचा वापर वाढवून जमिनीतील सेंद्रिय कर्बाचे
प्रमाण जपावे, माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन करावे
आणि आधुनिक तंत्रज्ञानासोबत नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन करावे, असेही त्यांनी सांगितले. कृषि विद्यापीठ आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत
उपलब्ध होणाऱ्या तांत्रिक मार्गदर्शनाचा लाभ घेऊन शाश्वत शेतीचा मार्ग
स्वीकारण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
विभागीय वन अधिकारी श्रीमती एस. एस. पठाण यांनी प्रास्ताविकातून सामाजिक
वनीकरणाचे महत्त्व विशद केले. वाढते हवामान बदल, घटते वनक्षेत्र आणि पर्यावरणीय
असंतुलन यांचा विचार करता शेतकऱ्यांनी वृक्षलागवडीला प्राधान्य देणे आवश्यक
असल्याचे त्यांनी सांगितले. रोपवाटिका व्यवसाय, दर्जेदार
रोपनिर्मिती आणि जैविक खतांचा वापर यामुळे पर्यावरण संवर्धनाबरोबरच ग्रामीण भागात
रोजगाराच्या संधी वाढू शकतात, असे त्यांनी नमूद केले.
सहयोगी अधिष्ठाता डॉ. विश्वनाथ खंदारे यांनी प्रशिक्षणातून मिळालेल्या
ज्ञानाचा प्रत्यक्ष शेतीमध्ये वापर करून रोपवाटिका व्यवसाय, जैविक खत निर्मिती
आणि सामाजिक वनीकरण उपक्रमांना चालना देण्याचे आवाहन केले.
प्रशिक्षणामध्ये विविध तज्ज्ञांनी विषयानुरूप मार्गदर्शन केले. डॉ. एस. आर. बरकुले यांनी अभिवृद्धीच्या विविध पद्धती या विषयावर कलम, गुटी, दाबकलम आणि रोपनिर्मितीच्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली. डॉ. भाग्यरेषा गजभिये यांनी जैविक खत निर्मिती व व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करताना सेंद्रिय पदार्थांचे महत्त्व, गांडूळखत, कंपोस्ट खत आणि जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आवश्यक उपाय सांगितले तसेच जैविक खत निर्मितीचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
डॉ. ए. टी. दौंडे यांनी रोपवाटिकेतील रोग व्यवस्थापन, तर डॉ. दिगंबर
पटाईत यांनी रोपवाटिकेतील कीड व्यवस्थापन याविषयी सखोल माहिती दिली. डॉ. ए. एस.
लोहकरे यांनी रोपवाटिकेची ओळख व व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. बी.
एम. कलालंबडी यांनी मध्यवर्ती रोपवाटिकेत अभिवृद्धीच्या विविध पद्धतींचे
प्रात्यक्षिक सादर केले, तर डॉ. सी. व्ही. आंबाडकर यांनी
बायोमिक्स प्रक्रिया केंद्र येथे बायोमिक्स निर्मिती या विषयावर मार्गदर्शन केले.
या प्रशिक्षणामुळे परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील वनरक्षक, वनपाल आणि वन अधिकाऱ्यांमध्ये रोपवाटिका व्यवस्थापन, जैविक खत निर्मिती, वृक्षसंवर्धन आणि शाश्वत शेती
तंत्रज्ञानाबाबत जागरूकता निर्माण झाली असून पर्यावरणपूरक शेतीच्या दिशेने
महत्त्वपूर्ण पाऊल उचलले गेले, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त
केली.
कार्यक्रमाच्या शेवटी अन्नप्रक्रिया केंद्र, अन्नतंत्र महाविद्यालय येथे भेट देऊन
कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी उद्यानविद्या
विभाग आणि सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.



.jpeg)


.jpeg)
.jpeg)


.jpeg)

.jpeg)

.jpeg)