वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठात ७९ वी विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची
बैठक संपन्न
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषि संशोधन
प्रकल्प येथे दिनांक १८ जून २०२६ रोजी ‘७९ वी विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीची बैठक’ ऑनलाइन पद्धतीने
पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
भूषविले.
या बैठकीस
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी
संशोधन संचालक डॉ. सूर्यकांत पवार, विभागीय कृषि सहसंचालक श्री.
सुनील वानखेडे (छत्रपती संभाजीनगर), डॉ.
संजय पाटील, श्री. दीपक गवळी हे प्रत्यक्ष उपस्थित होते.
तसेच शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विभागीय कृषि सहसंचालक
श्री. महेश तीर्थंकर (लातूर), विद्यापीठातील
विविध कृषि महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख, कृषि संशोधन केंद्रांचे प्रमुख, जिल्हा अधीक्षक कृषि
अधिकारी, कृषि विज्ञान केंद्रांचे कार्यक्रम समन्वयक आणि
विस्तार कृषि विद्यावेत्ते ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले होते.
मार्गदर्शन
करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी “शेतकरी देवो भवः” ही भावना मांडत
विद्यापीठाच्या संशोधन व तंत्रज्ञान विभागामार्फत विकसित करण्यात आलेल्या
तंत्रज्ञान शिफारशी थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की,
बदलत्या हवामानाशी सुसंगत तंत्रज्ञानाचा वापर, उत्पादन खर्चात कपात आणि संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शास्त्रीय
मार्गदर्शनाची आज नितांत आवश्यकता आहे.
सद्य
परिस्थितीत शेतकऱ्यांनी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, कमी कालावधीच्या पिकांची निवड करावी, बीबीएफ पद्धतीने पेरणी करावी, आंतरपिक पद्धतीचा
अवलंब करावा, पाण्याचा कार्यक्षम वापर करावा तसेच चारा
पिकांचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन माननीय कुलगुरुंनी केले.
पुढे त्यांनी सांगितले
की, राज्यातील सर्व कृषि
विद्यापीठे, पुणे येथील कृषि परिषद आणि विविध विभागांमार्फत
आयोजित बैठकीद्वारे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त तंत्रज्ञानाची शिफारस सातत्याने केली
जाते. शेतीच्या सर्वांगीण समृद्धीसाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने
कार्य करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
एखाद्या
संस्थेने चांगले कार्य केल्यास इतर संस्थांनी त्याचा उपयोग करून आपले कार्य पुढे
न्यावे, असे सांगत त्यांनी
सहकार्याची भावना अधोरेखित केली. तसेच “खेत बचाओ अभियान” अंतर्गत
जमिनीच्या आरोग्य सुधारण्यासाठी भारत सरकारच्या ‘पीएम
प्रणाम’ योजनेचा प्रभावी प्रसार केला जात असून माती परीक्षणावर आधारित खत
व्यवस्थापन, जैविक खतांचा वापर आणि हिरवळीच्या खतांचा अवलंब केल्यास
नैसर्गिक व सेंद्रिय शेतीला मोठी बळकटी मिळेल, असे त्यांनी
नमूद केले.
या मोहिमेत कृषि
विभाग, शेतकरी आणि
विद्यापीठाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. “शेतकरी
देवो भवः” ही भावना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी विद्यापीठ आणि इतर सर्व विभागांनी
आपली ताकद ओळखून सहकार्यात्मक भावना, नवोपक्रमशीलता आणि
व्यावसायिक दृष्टिकोन एकत्र साधावा, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी
त्यांनी नमूद केले की, बायोमिक्स क्षेत्रात
विद्यापीठाने उल्लेखनीय कार्य केले असून त्याचे विकेंद्रीकरण करून मराठवाड्यातील
इतर केंद्रांपर्यंत ते पोहोचविण्याची आवश्यकता आहे. परभणीबरोबरच राष्ट्रीय कृषि
संशोधन प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर तसेच इतर जिल्हा
केंद्रांवर बायोमिक्स शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जात आहे. शेतकरी बंधूंनी
त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
बैठकीतील चर्चेदरम्यान
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग व विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या
मार्गदर्शनाखाली संबंधित विषयांवर चर्चा करण्यात आली. शास्त्रज्ञांनी
शेतकऱ्यांच्या प्रत्याभरणावर उत्तरे दिली. तसेच भविष्यात या विषयांवर सखोल संशोधन
करण्याचे निश्चित करण्यात आले.
प्रस्तावना सहयोगी
संचालक डॉ. सूर्यकांत पवार यांनी करत नमूद केले की, चारही कृषि विद्यापीठांच्या
संयुक्त कृषि संशोधन परिषदेतील शिफारशी तसेच विद्यापीठाच्या तंत्रज्ञानाचा कृषि
विभागामार्फत शेतकऱ्यांपर्यंत प्रभावी प्रसार सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने या
बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत
विभागामार्फत शेतकऱ्यांकडून आलेल्या प्रतिक्रिया संकलित केल्या जातात आणि
त्यानुसार पुढील हंगामासाठी संशोधनाची दिशा निश्चित केली जाते. तसेच पिकांसंबंधित
अडचणी समजून घेऊन हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक तंत्रज्ञानाचा विस्तार
करण्यासाठीही प्रयत्न केले जातात, असे त्यांनी सांगितले.
विभागीय कृषि
सहसंचालक श्री. सुनील वानखेडे (छत्रपती संभाजीनगर) व श्री. महेश तीर्थंकर (लातूर) यांनी
सादरीकरण करून शेतकऱ्यांचे प्रत्याभरण (feedbacks - प्रत्यक्ष अनुभव) मांडले. तसेच
विभागासाठी शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आवश्यक तंत्रज्ञानाची माहिती सादर केली.
त्यांनी खजूर, ॲव्होकॅडो, राजमा,
ड्रॅगन फ्रूट, देशी कापूस, फळबाग लागवड यांसह विविध विषयांवर संशोधनाची आवश्यकता अधोरेखित केली.
बैठकीत विविध
विभागीय योजनांची माहिती, तांत्रिक सल्ला,
हवामान आधारित पीक नियोजन, कीड-रोग व्यवस्थापन,
बियाणे उपलब्धता, खत वापर मार्गदर्शन, जलसंधारण आणि शाश्वत शेती या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
बैठकीचे सूत्रसंचालन डॉ. एस. बी. कदम यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. आशिष बागडे यांनी केले. बैठक यशस्वीतेसाठी डॉ. डी. एस. मुटकुळे, डॉ. दिलीप हिंगोले, श्री. ढगे, श्री. साळी, श्री. रामेश्वर ठोंबरे तसेच राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


