संशोधन, उत्पादन आणि व्यापारीकरणाच्या समन्वयातून शेती विकास शक्य : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि महाराष्ट्र
राज्य बियाणे महामंडळ (महाबीज), अकोला यांच्यात चिया (Salvia
hispanica L.) या पिकाच्या सुधारित वाणांच्या संशोधन, बीज उत्पादन आणि व्यापारीकरणासाठी दिनांक १५ जून २०२६ रोजी महत्त्वपूर्ण
सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या उपक्रमामुळे राज्यातील
शेतकऱ्यांना प्रथमच अधिकृत, उच्च उत्पादनक्षम आणि दर्जेदार
चिया बियाणे उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
महाराष्ट्रात
चिया पिकाखालील क्षेत्र सातत्याने वाढत असताना प्रमाणित बियाण्यांची मागणीही वाढत
आहे. मात्र अधिकृत सुधारित वाण उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना स्थानिक आणि कमी
गुणवत्तेच्या बियाण्यांवर अवलंबून राहावे लागत होते. ही गरज ओळखून विद्यापीठ आणि
महाबीज यांच्या संयुक्त प्रयत्नातून पांढऱ्या व काळ्या बियांच्या उच्च उत्पादनक्षम
चिया वाणांच्या विकासासाठी संशोधन सुरू करण्यात आले आहे.
या
उपक्रमांतर्गत विविध हवामान परिस्थितींमध्ये बहुस्थळी संशोधन चाचण्या, उत्पादन क्षमता व गुणवत्ता परीक्षण, रोग व किडींचे निरीक्षण, तांत्रिक अहवाल तयार करणे
तसेच आशादायी वाणांचे बीज उत्पादन आणि व्यापारीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये
विद्यापीठ संशोधन, मूल्यांकन व शिफारसी विकसित करेल, तर महाबीजकडून बीज उत्पादन, प्रसार, प्रात्यक्षिके आणि विक्रीची जबाबदारी पार पाडली जाणार आहे.
या करारामुळे
चिया पिकासाठी राज्यात प्रथमच अधिकृत वाण विकसित होण्यास चालना मिळणार असून
उत्पादनवाढीसोबतच शेतकऱ्यांना विश्वासार्ह बियाणे उपलब्ध होणार आहे. संशोधन संस्था
आणि उद्योग क्षेत्रातील हे सहकार्य कृषी क्षेत्रासाठी नवे संधी निर्माण करणारे
ठरणार आहे. हा करार पुढील पाच वर्षांसाठी वैध राहणार असून संयुक्त मालकी हक्क, गुणवत्ता नियंत्रण, बीज
परवाना आणि व्यापारीकरणाच्या बाबी त्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
हा करार विद्यापीठाचे
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि,
महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप स्वामी (भाप्रसे) यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. यावेळी विद्यापीठाचे संशोधन
संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान
आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, नियंत्रक श्री अनंत कदम, विभाग
प्रमुख तथा उपसंचालक संशोधन डॉ. हिराकांत काळपांडे, महाबीजचे विभागीय व्यवस्थापक
श्री जगदीशसिंग खोकड, जिल्हा व्यवस्थापक श्री रज्जाक शेख यांच्यासह दोन्ही
संस्थांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी ‘शेतकरी देवो भवः’ हा मूलमंत्र देत कृषी संशोधन संस्थांनी विकसित केलेले
आधुनिक तंत्रज्ञान, सुधारित वाण आणि नाविन्यपूर्ण संशोधनाचे
लाभ अंतिम घटक असलेल्या शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचणे अत्यंत आवश्यक
असल्याचे प्रतिपादन केले. कृषी क्षेत्रातील प्रगती ही संशोधन, उत्पादन, विस्तार यंत्रणा आणि व्यापारीकरण
यांच्यातील सशक्त समन्वयातून तसेच शेतकऱ्यांना उच्च दर्जाचे बियाणे उपलब्ध करून
देण्यामधून साध्य होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले. विद्यापीठ
आणि महाबीज यांच्यातील ही भागीदारी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, उत्पादनक्षमता वृद्धिंगत करणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे यासाठी अत्यंत
महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच
दोन्ही संस्थांनी समर्पित भावनेने कार्य करून राज्यातील शेती विकासाला नवी दिशा
देण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
या निमित्ताने
महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप स्वामी (भाप्रसे) यांनी विद्यापीठ परिसराला भेट दिली. विशेष म्हणजे श्री. स्वामी
हे याच विद्यापीठाचे माजी विद्यार्थी असून त्यांनी १९८९ मध्ये बी.एस्सी. (कृषी)
तसेच १९९१ मध्ये कृषी अर्थशास्त्र विषयात एम.एस्सी. पदवी संपादन केली आहे.
त्यांच्या या पुनर्भेटीमुळे विद्यापीठ परिवारात विशेष आनंदाचे वातावरण निर्माण
झाले.
सामंजस्य
करारावरती विद्यापीठाच्या वतीने संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी तर महाबीजच्या
वतीने गुणनियंत्रण आणि संशोधनाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी एस लहाने यांनी
स्वाक्षरी केल्या. यावेळी संशोधनाधारित नवीन वाणांचा प्रसार, बीज उत्पादन साखळी मजबूत करणे आणि शेतकरी
हितासाठी संयुक्तपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
दरम्यान महाबीजच्या
अधिकाऱ्यांनी विद्यापीठातील विविध संशोधन प्रकल्प,
बियाणे उत्पादन केंद्रे तसेच बायोमिक्स संशोधन व प्रक्रिया
केंद्राची पाहणी करून विद्यापीठात सुरू असलेल्या संशोधन कार्याचे विशेष कौतुक
केले. या सहकार्यामुळे विकसित तंत्रज्ञानाचा लाभ थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यास
मोठी मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

.jpeg)

