ननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले इंजि. विशाल काळबांडे यांचे अभिनंदन
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठांतर्गत कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी येथील कृषि यंत्र व शक्ती अभियांत्रिकी विभागातील आचार्य पदवीचे विद्यार्थी इंजी. विशाल दशरथराव काळबांडे यांना प्रिसिजन अॅग्रीकल्चर, ड्रोन तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित शेती क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ‘अटल बिहारी वाजपेयी सेवा रत्न सन्मान २०२६’ या प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार जिवरण फाउंडेशनतर्फे विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट व समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान करण्यात येतो.
इंजी. विशाल काळबांडे यांनी कृषि क्षेत्रात ड्रोनच्या माध्यमातून पीक आरोग्य निरीक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), मशीन लर्निंग (ML), स्मार्ट फार्मिंग तसेच आधुनिक कृषि तंत्रज्ञानाच्या विकासासाठी उल्लेखनीय संशोधन व कार्य केले आहे. त्यांच्या कार्यामुळे शेतीतील उत्पादकता, कार्यक्षमता आणि शाश्वतता वाढविण्यास महत्त्वपूर्ण मदत होत असून कृषि क्षेत्रातील तंत्रज्ञानाधारित नाविन्यपूर्ण संशोधनाची दखल घेऊन त्यांना हा राष्ट्रीय सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
सध्या इंजि. विशाल काळबांडे हे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात आचार्य पदवी शिक्षण घेत असून आंतरराष्ट्रीय संशोधन सहकार्यात सक्रिय आहेत. नेपाळमधील काठमांडू विद्यापीठ, थायलंडमधील नामांकित विद्यापीठे तसेच व्हिएतनाममधील कृषि व तंत्रज्ञान संस्थांबरोबर ते प्रिसिजन अॅग्रीकल्चर, ड्रोन-आधारित पीक निरीक्षण, स्मार्ट शेती आणि शाश्वत कृषि तंत्रज्ञान विषयक संयुक्त संशोधन प्रकल्पांवर कार्यरत आहेत. या संशोधनातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढविणे, संसाधनांचा कार्यक्षम वापर करणे तसेच हवामान बदलाच्या आव्हानांवर उपाय शोधणे यावर विशेष भर दिला जात आहे.
यापूर्वीही इंजि. विशाल काळबांडे यांची विविध आंतरराष्ट्रीय संशोधन उपक्रमांसाठी निवड झाली असून त्यांनी कृषि अभियांत्रिकी क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राहुल रामटेके यांनी प्रशंसा व्यक्त करून अभिनंदन केले. तसेच त्यांचे कृषि-ड्रोन मार्गदर्शक व कृषि यंत्र व शक्ती अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. गोपाळ शिंदे यांनीही त्यांच्या कार्याचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
याशिवाय महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक आणि कार्यालयीन सहकाऱ्यांनी इंजि. विशाल काळबांडे यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील संशोधन कार्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
