Monday, June 8, 2026

वनामकृविच्या नागनाथ मुलांच्या वसतिगृहातील सुविधांचा आढावा घेत माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी विद्यार्थ्यांशी साधला संवाद

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी दिनांक ६ जून २०२६ रोजी विद्यापीठाच्या नागनाथ मुलांच्या वसतिगृहास सदिच्छा भेट दिली. यावेळी शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार, कृषि महाविद्यालय, परभणीचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, वसतिगृहाचे सहाय्यक वसतिगृह अधीक्षक डॉ. प्रशांत जाधव व डॉ. किशोर कौसाडीकर तसेच कीटकशास्त्र विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. मिलिंद सोनकांबळे उपस्थित होते.

भेटीदरम्यान माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेतला. तसेच विद्यार्थ्यांच्या दैनंदिन दिनचर्या, वसतिगृहातील सुविधा, भोजन व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षा आणि इतर आवश्यक बाबींबाबत माहिती जाणून घेतली. विद्यार्थ्यांनीदेखील आपल्या सूचना, समस्या व अपेक्षा मोकळेपणाने मांडल्या. यावेळी माननीय कुलगुरूंनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासोबत व्यक्तिमत्त्व विकास, नियमित व्यायाम, शिस्तबद्ध जीवनशैली, आत्मविश्वास वृद्धी आणि स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचे मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी माननीय कुलगुरू, शिक्षण संचालक आणि सहयोगी अधिष्ठाता यांच्याशी विविध विषयांवर मुक्त संवाद साधला. यावेळी भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या एसआरएफ व नेट परीक्षांच्या तयारीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन मार्गदर्शन वर्गांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. तसेच या परीक्षांमध्ये उत्कृष्ट यश संपादन करण्यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट रँक मिळविण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार यांनी केले.

नागनाथ मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, शिक्षण संचालक डॉ. भगवान असेवार आणि सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. त्यांच्या भेटीमुळे व मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना नवचैतन्य व प्रेरणा मिळाल्याची भावना यावेळी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.