Sunday, June 14, 2026

खेत बचाव अभियानांतर्गत राणीसावरगाव येथे सेंद्रिय व नैसर्गिक शेतीबाबत मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

 

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहानजी यांच्या नेतृत्वात दि. १ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत देशभर राबविण्यात येत असलेल्या खेत बचाओ अभियान” अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वय संशोधन प्रकल्प (पशुसंवर्धन यांत्रिकीकरण योजना) यांच्या वतीने मौजे राणीसावरगाव (ता. गंगाखेड, जि. परभणी) येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा येथे दिनांक १२ जून २०२६ रोजी मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या पुढाकारातून तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉ. दयानंद टेकाळे यांनी केली.

या कार्यक्रमामध्ये योजनेद्वारे विकसित करण्यात आलेल्या विविध बैलचलित सुधारित कृषी अवजारांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच सेंद्रिय शेती व नैसर्गिक शेतीचे महत्त्व पटवून देत शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करण्याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळा येथे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना भेट देण्यात आली. गोशाळेमध्ये गाईच्या शेणापासून तयार करण्यात येणारे शेणखत, गो-अमृत यांसारख्या सेंद्रिय उत्पादनांचा शेतीमध्ये वापर करून रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करावे, असे प्रतिपादन प्रकल्पाचे शास्त्रज्ञ डॉ. दयानंद टेकाळे यांनी केले. तसेच योजनेद्वारे विकसित करण्यात आलेल्या सुधारित बैलचलित अवजारांचा वापर करून इंधनावरील खर्च कमी करता येतो व शेती अधिक किफायतशीर बनविता येते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज गोशाळेचे संचालक श्री शिवदास कोरे, पशुशास्त्रज्ञ डॉ. संदेश देशमुख, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री अजय वाघमारे, टेक्निशियन श्री मंगेश खाडे तसेच राणीसावरगाव येथील महिला व पुरुष शेतकरी उपस्थित होते.

उपस्थित शेतकऱ्यांनी योजनेद्वारे विकसित करण्यात आलेल्या अवजारांचा वापर केल्यामुळे शेतीतील उत्पादन खर्च कमी झाला असून नैसर्गिक शेतीचा अवलंब करण्यास मोठी मदत होत असल्याचे आपले अनुभव यावेळी व्यक्त केले. हा कार्यक्रम शेतकऱ्यांमध्ये शाश्वत, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक शेती पद्धतींचा प्रसार करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला.