Sunday, June 7, 2026

भारतीय कृषि विद्या सोसायटीत वनामकृविचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांची महाराष्ट्र राज्य समुपदेशकपदी नियुक्ती

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी केले अभिनंदन


भारतीय कृषि संशोधन परिषदेचे (ICAR) माननीय महासंचालक तथा कृषि संशोधन व शिक्षण विभागाचे (DARE) सचिव डॉ. मांगीलाल जाट यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथील भारतीय कृषि विद्या सोसायटीच्या (Indian Society of Agronomy) कार्यकारी समितीची बैठक दिनांक ३० मे २०२६ रोजी संपन्न झाली. या बैठकीत द्वैवार्षिक कालावधी २०२६–२०२७ साठी विविध राज्यांच्या समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांची महाराष्ट्र राज्य समुपदेशक (Councillor) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या बहुमानाबद्दल विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कुलसचिव श्री. पुरभा काळे, नियंत्रक श्री. अनंत कदम, विद्यापीठ अभियंता श्री. दीपक कशाळकर तसेच सर्व महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता व विभागप्रमुख यांनी शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांचे अभिनंदन करून कौतुक केले.

देशातील विविध राज्यांमध्ये कृषि शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या तज्ज्ञांची या पदासाठी निवड करण्यात आली आहे. डॉ. भगवान आसेवार यांच्या नियुक्तीमुळे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ तसेच मराठवाड्यातील कृषि क्षेत्राच्या कार्याला राष्ट्रीय स्तरावर अधिक बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे.

डॉ. भगवान आसेवार यांनी कृषि शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले असून, त्यांच्या या नियुक्तीबद्दल विद्यापीठ परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.