आयआयआरएफ (IIRF) यशानंतर माननीय कुलगुरूंचा निर्धार : “राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान मिळविण्याची विद्यापीठाची वाटचाल कायम राहील”
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शैक्षणिक
उपक्रम,
संशोधन, विद्यार्थी कल्याण, संस्थात्मक विकास तसेच विद्यापीठाची एकूण गुणवत्ता व क्रमवारी
सुधारण्यासाठी परस्पर हिताच्या विविध विषयांवर माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र
मणि यांनी दिनांक २३ जून २०२६ रोजी पदवी (UG),
पदव्युत्तर (PG) व पीएच.डी. विद्यार्थ्यांशी
तसेच प्राध्यापकांशी कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात संवाद साधला.
व्यासपीठावर शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, माजी शिक्षण संचालक
डॉ. उदय खोडके, नियंत्रक श्रीमती भाग्यश्री जाधव, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रविण वैद्य, डॉ. राजेश
क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ नीता गायकवाड, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.
राजेश कदम, सहाय्यक नियंत्रक श्री. अनंत कदम, डॉ. गजेंद्र
जगताप आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
संवाद साधताना
माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी
भारतीय शैक्षणिक संस्था मूल्यांकन प्रणाली (आयआयआरएफ - IIRF – Indian Institutional Ranking
Framework) क्रमवारीत विद्यापीठाने मिळवलेल्या उल्लेखनीय यशाचा
उत्साह साजरा करण्यासाठी हा संवाद आयोजित केल्याबद्दल शिक्षण संचालक डॉ. भगवान
आसेवार तसेच आयोजकांचे अभिनंदन केले. त्यांनी सांगितले की, विद्यापीठाने
शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्याबरोबरच भौतिक व पायाभूत
सुविधांच्या विकासातही उल्लेखनीय प्रगती साधली आहे. मुख्यमंत्री सहायता निधी,
RKVY, DST, DBT आदी योजनांच्या माध्यमातून अनेक संशोधन प्रकल्प केवळ
परभणीपुरते मर्यादित न राहता छत्रपती संभाजीनगर, लातूर,
धाराशिव यांसह मराठवाड्यातील विविध ठिकाणी उभारण्यात आले आहेत.
विद्यापीठ ज्या वेगाने आणि गुणवत्तेने प्रगती करत आहे, तीच
वाटचाल कायम ठेवून भविष्यात राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान निश्चित मिळवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे
म्हणाले की, विद्यापीठ आपल्या
संलग्न आणि मान्यता प्राप्त महाविद्यालयांसह कृषी तंत्र विद्यालयांच्या माध्यमातून
गुणवत्तापूर्ण मनुष्यबळ निर्माण करत आहे. विद्यापीठातील ८५ शास्त्रज्ञांनी
आंतरराष्ट्रीय शैक्षणिक व संशोधनात्मक दौरे केले असून त्याचा सकारात्मक लाभ आता
दिसून येत आहे. अनेक विद्यार्थी या शास्त्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती करत
आहेत. नुकत्याच पुणे येथे आयोजित ॲग्री हॉकीथान (Agri
Hackathon) मध्ये
विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी उपविजेतेपद मिळविले. तसेच विद्यापीठाच्या १०
संशोधन केंद्रांना राष्ट्रीय स्तरावर अव्वल स्थान प्राप्त झाले असून ऊर्जा
बचतीमध्ये महाराष्ट्रात विद्यापीठाने दुसरे स्थान मिळविले आहे.
माननीय
कुलगुरूंनी सांगितले की, एनआयआरएफ (NIRF - National Institutional
Ranking Framework) क्रमवारीत उच्च स्थान मिळविण्यासाठी
Web of Science आणि Scopus
सारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या संशोधन नियतकालिकांमध्ये अधिकाधिक
संशोधन लेख प्रकाशित होणे अत्यंत आवश्यक आहे. विद्यापीठातील शास्त्रज्ञ या
दृष्टीने सातत्याने प्रयत्नशील असून संशोधन प्रकाशनांमध्ये सातत्यपूर्ण वाढ होताना
दिसत आहे.
विद्यार्थी
आणि शास्त्रज्ञांना जागतिक स्तरावरील ज्ञान,
अनुभव आणि संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच विद्यापीठाबरोबरच
परभणी शहराची प्रतिमा उंचावावी या उद्देशाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील
परिषदांचे, चर्चासत्रांचे आणि शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन
करण्यात आले आहे. या उपक्रमांचा विद्यापीठाच्या क्रमवारी आणि मानांकन प्रक्रियेतही
मोठा लाभ होत आहे. कापूस, तूर आणि सोयाबीन यांसारख्या प्रमुख
पिकांच्या संशोधनात विद्यापीठाचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण असून या पिकांचे
विकसित वाण राष्ट्रीय स्तरावर मागणीसह चर्चेत आहेत.
मराठवाड्यातील
शेतकरी पूर्वी विद्यापीठाशी तितक्या प्रमाणात जोडले गेले नव्हते. मात्र “शेतकरी देवो भव:” या
भावनेतून आणि शेतकरी हा अन्नदाता आहे या विचारातून विद्यापीठाने शेतकऱ्यांपर्यंत
थेट पोहोचण्यासाठी नाविन्यपूर्ण विस्तार कार्यक्रम राबविले. यामुळे शेतकऱ्यांशी
अधिक जवळीक निर्माण झाली असून विद्यापीठ सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आपलेसे झाले आहे.
माननीय कुलगुरूंनी
नमूद केले की, विद्यापीठाचे हे यश
अत्यंत कमी मनुष्यबळावर मिळालेले आहे. नवीन आकृतीबंध मंजूर झाल्यामुळे पदभरतीचा
मार्ग मोकळा झाला असून वाढीव १५५ पदांनाही मंजुरी मिळाली आहे. भविष्यात
विद्यापीठाला तसेच स्वतःला अधिक यशस्वी बनवण्यासाठी प्रत्येकाने प्रामाणिकपणे,
कठोर परिश्रमाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्य करणे आवश्यक आहे.
आपली ऊर्जा अनावश्यक गोष्टींमध्ये वाया न घालवता उद्दिष्टपूर्तीसाठी केंद्रित
करावी. कोणीही स्वतःच्या कमजोरींना कारण बनवू नये किंवा कार्य अर्धवट सोडू नये.
वरिष्ठांनी आपल्या कार्यातून आदर्श निर्माण करावा.
याबरोबरच मानवतेच्या
भावनेतून आनंदाने कार्य करावे, सद्भावना जपावी, द्वेष आणि मत्सर टाळावा, आपली दिशा योग्य ठेवून सातत्याने प्रगतीसाठी प्रयत्न करावेत; यातूनच विद्यापीठ देशातील अव्वल संस्थांमध्ये स्थान मिळवेल, असा निर्धार आपण सर्वांनी करूया, असे आवाहन त्यांनी
केले.
डॉ. उदय खोडके
यांनी नमूद केले की, कोणत्याही संस्थेच्या
सर्वांगीण विकासासाठी भौतिक संसाधने, आर्थिक बळ आणि मनुष्यबळ
हे तीन घटक अत्यंत महत्त्वाचे असतात. मनुष्यबळाची कमतरता असली तरी विद्यापीठ इतर
सर्व बाबतीत सक्षम आहे. विद्यापीठाने आयआयआरएफ (IIRF) क्रमवारीत
महाराष्ट्रात प्रथम स्थान मिळविले असून भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या
अधिस्वीकृतीत ‘अ’ दर्जाही प्राप्त केला आहे. भविष्यात या यशाचा आलेख अधिक
उंचावण्यासाठी संशोधनपर लेखांचे अधिकाधिक प्रकाशन होणे आवश्यक असल्याचे सांगत
त्यांनी सर्वांना संशोधन लेख प्रसिद्ध करण्याचे आवाहन केले.
शिक्षण संचालक
डॉ. भगवान आसेवार यांनी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या
मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने मिळविलेल्या आयआयआरएफ मानांकनातील यश, अधिस्वीकृतीतील ‘अ’ दर्जा तसेच नुकताच मंजूर
झालेला वाढीव पदसंचरचना आकृतीबंध या यशस्वी वाटचालीची पार्श्वभूमी स्पष्ट केली.
राष्ट्रीय स्तरावरील एनआयआरएफ (NIRF) क्रमवारीत विद्यापीठाला
अधिक वरचे स्थान मिळावे यासाठी माननीय कुलगुरूंचा आजचा संवाद अत्यंत महत्त्वाचा
असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी
त्यांनी एनआयआरएफ क्रमवारीसाठी आवश्यक असलेल्या विविध निकषांची माहिती दिली.
यामध्ये शैक्षणिक संसाधने, संशोधनपर लेखांचे Web
of Science आणि Scopus सारख्या आंतरराष्ट्रीय
दर्जाच्या नियतकालिकांमध्ये प्रकाशन, विद्यार्थ्यांनी
मिळवलेले यश, माजी विद्यार्थी संघटना, प्लेसमेंट
सेलची कार्यक्षमता, परदेशातील विद्यार्थी प्रवेश, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांशी सामंजस्य करार (MoU), संशोधन विकास आणि त्याचा सामाजिक परिणाम, बाह्य
स्त्रोतांमधून प्राप्त निधीतून उभारलेले संशोधन प्रकल्प व प्रयोगशाळा, तसेच विद्यापीठातील विद्यार्थ्यांमध्ये राज्यनिहाय वैविध्य या
महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश असल्याचे सांगितले. विशेषतः संशोधनपर लेखांचे प्रमाण
वाढविणे हे सर्वाधिक महत्त्वाचे असल्याचे अधोरेखित करत त्यांनी सर्व शिक्षक व
संशोधकांना अधिकाधिक संशोधन लेख प्रकाशित करण्याचे आवाहन केले.
संशोधन संचालक
डॉ. खिजर बेग यांनी मुख्यमंत्री सहायता निधी,
आरकेव्हीवाय (RKVY) आणि डीएसटी (DST) यांच्या माध्यमातून विद्यापीठात उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पांची
माहिती दिली. मागील चार वर्षांत मर्यादित मनुष्यबळ असूनही विद्यापीठाने अत्यंत मोठ्या
प्रमाणावर विकासकामे उभारली असून इतके मोठे कार्य उभारण्यासाठी साधारणतः दहा
वर्षांचा कालावधीही कमी पडेल, असे त्यांनी नमूद केले. हीच
कार्यक्षमता आणि समर्पण यापुढेही कायम ठेवून सर्वांनी पूर्ण क्षमतेने कार्य
करण्याचे आवाहन त्यांनी केले.
विस्तार
शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीच्या दृष्टीने एनआयआरएफ
क्रमवारी (रँकिंग) अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. मागील चार वर्षांत
विद्यापीठाने उल्लेखनीय प्रगती साधली असून संशोधनपर लेखांच्या प्रकाशनासाठी
सर्वांनी अधिक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यापीठाचे
तंत्रज्ञान प्रभावीपणे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे
सांगताना त्यांनी ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजा सोबत’, ‘ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ
संवाद’ असे नाविन्यपूर्ण कार्यक्रम मागील दोन वर्षांपासून नियमित सुरू असल्याची
माहिती दिली. तसेच सामाजिक माध्यमे,
ब्लॉग, व्हॉट्सअॅप आणि युट्युब यांसारख्या
डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करण्यात विद्यापीठ इतर अनेक विद्यापीठांच्या
तुलनेत आघाडीवर असल्याचे नमूद केले. या सर्व विस्तार कार्याची दखल एनआयआरएफ
मूल्यांकनामध्ये घेण्यात यावी, अशी विनंती संबंधित
संस्थांकडे करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
संवाद बैठकीचे
प्रास्ताविक सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन
डॉ. गजेंद्र जगताप यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. मीनाक्षी पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. आशा चव्हाण यांनी मानले.
कार्यक्रमास विद्यापीठातील सर्व महाविद्यालयांतील प्राध्यापक, पदवी (UG), पदव्युत्तर (PG) तसेच
पीएच.डी.चे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




