Saturday, June 20, 2026

पंतप्रधान किसान सन्मान निधीचा २३ वा हप्ता वितरण सोहळा : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात थेट प्रक्षेपण

 


भारताचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या शुभहस्ते दिनांक २० जून २०२६ रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी” (PM-Kisan) योजनेच्या २३ व्या हप्त्याचे देशभरातील पात्र शेतकऱ्यांना पश्चिम बंगालमधील हुगळी येथून ऑनलाइन पद्धतीने वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाद्वारे देशभरातील ९ कोटी ४४ लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे १९ हजार कोटी रुपयांचा सन्मान निधी थेट हस्तांतरित करण्यात आला. यावेळी माननीय पंतप्रधानांनी देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या प्रेरणादायी भाषणाचा लाभ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि तसेच उपस्थित मान्यवरांनी थेट प्रक्षेपणाद्वारे घेतला.

या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयामार्फत विद्यापीठाच्या सिम्पोजियम हॉल (हॉल क्र. १८) येथे आयोजित करण्यात आले. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या निर्देशानुसार तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले.

कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विद्यापीठ अभियंता श्री दीपक कशाळकर, नियंत्रक श्री अनंत कदम, सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर, डॉ. राहुल रामटेके, डॉ. शिवाजी शिंदे, डॉ. नीता गायकवाड, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. राजेश कदम, विभागप्रमुख डॉ. हिराकांत काळपांडे, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. प्रफुल घंटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरूंनी सांगितले की, पीएम-किसान योजनेच्या २३ व्या हप्त्याअंतर्गत मिळणारी दोन हजार रुपयांची रक्कम ही केवळ आर्थिक मदत नसून शेतकऱ्यांच्या सन्मानाचे प्रतीक आहे. या निधीची अनेक शेतकऱ्यांना मोठी उपयुक्तता असून त्यांच्या दृष्टीने त्याला विशेष महत्त्व आहे. केंद्र शासन शेतकऱ्यांसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून, पुढील पिढीला सुदृढ व पिकांसाठी पोषक जमीन उपलब्ध व्हावी या उद्देशाने खेत बचाओ अभियान’ राबविले जात आहे.

या अभियानात विद्यापीठ उत्स्फूर्तपणे सहभागी झाले असून शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर २५ टक्क्यांनी कमी करून सेंद्रिय घटकांचा वापर वाढविण्यासाठी प्रभावी मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच बदलत्या हवामान परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन शेतकऱ्यांना अकस्मित पीक नियोजनाबाबतही मार्गदर्शन केले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी विद्यापीठाच्या विस्तार कार्याचा आढावा घेताना सांगितले की, ‘माझा एक दिवस माझ्या बळीराजासोबत’ या उपक्रमांतर्गत प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी माननीय कुलगुरूंसह विद्यापीठाचे सर्व शास्त्रज्ञ प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर भेट देऊन त्यांच्या गरजेनुसार मार्गदर्शन करतात. तसेच आठवड्यातील प्रत्येक मंगळवार व शुक्रवार सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ऑनलाइन संवाद कार्यक्रम आयोजित केला जातो.

या उपक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करून त्यांच्या समस्यांचे समाधानकारक निरसन केले जाते. यासोबतच शेतकरी-शेतकरी संवाद’ या संकल्पनेवरही विशेष भर दिला जातो. विद्यापीठाच्या नियमित विस्तार कार्याची माहिती देताना त्यांनी नमूद केले की, मागील चार वर्षांत विद्यापीठाने शिक्षण, संशोधन आणि विस्तार कार्यामध्ये उल्लेखनीय प्रगती साधत महाराष्ट्रात अग्रस्थान प्राप्त केले आहे. तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या अधिस्वीकृतीमध्ये अ’ दर्जा प्राप्त झाल्यामुळे विद्यापीठाची प्रतिष्ठा अधिक उंचावली असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमात औंढा येथील प्रगतशील शेतकरी श्री रामेश्वर मुरकुटे यांनी मनोगत व्यक्त करत शास्त्रज्ञांकडून सातत्यपूर्ण मार्गदर्शन व प्रोत्साहनाची अपेक्षा व्यक्त केली.

या कार्यक्रमात हिंगोली व परभणी जिल्ह्यातील १३० हून अधिक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. प्रारंभी विद्यापीठाच्या वतीने उपस्थित शेतकऱ्यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठातील शास्त्रज्ञ डॉ. किरण जाधव, डॉ. गजानन गडदे आणि डॉ. दिगंबर पटाईत यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख तसेच विस्तार शिक्षण संचालनालयातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रा. राहुल औंधकर यांनी केले. यावेळी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. गजानन गडदे, डॉ. संतोष फुलारी यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांचे अधिकारी, शास्त्रज्ञ, विद्यार्थी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.