Thursday, June 18, 2026

वनामकृविद्वारा ‘खेत बचाओ अभियान’ अंतर्गत वर्णा येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

 एल निनोचा विचार करून योग्य पीक निवड केल्यास उत्पादनवाढ शक्य : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि


माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय केंद्रीय कृषि व किसान कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहानजी यांच्या नेतृत्वात दिनांक १ जून ते ३० जून २०२६ या कालावधीत देशभर खेत बचाओ अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानात स्वस्थ माती, सक्षम किसान, समृद्ध भारत” या संकल्पनेवर भर देण्यात येत असून, मातीचे आरोग्य जपणे, पाणी संवर्धन करणे, सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे, पर्यावरण संरक्षण करणे तसेच शेतकऱ्यांमध्ये शाश्वत शेतीविषयी जनजागृती करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. आपली शेती, आपले भविष्य – चला, एकत्र करूया संवर्धन” हा संदेश देत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, महाराष्ट्र शासनाचा कृषि विभाग आणि कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या अधिकारी तसेच शेतकरी यांच्यामधील संवाद अधिक प्रभावी करण्यासाठी या अभियानाचे आयोजन करण्यात येत आहे.

याच अभियानांतर्गत विद्यापीठाच्या वतीने माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १७ जून २०२६ रोजी परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील मौजे वर्णा येथे शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख, एकात्मिक शेती पद्धतीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रभारी अधिकारी डॉ. किरण जाधव, मृदाशास्त्रज्ञ डॉ. सुदाम शिराळे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत तसेच तालुका कृषि अधिकारी श्री. नितीन घुगे उपस्थित होते.

मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, यंदाच्या खरीप हंगामाचे नियोजन करताना संभाव्य एल निनो परिस्थितीचा विचार करून तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार योग्य पिकांची निवड करणे आवश्यक आहे. कमी पर्जन्यमान किंवा पावसातील अनिश्चिततेच्या परिस्थितीतही उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी व वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी तूर पिकाला प्राधान्य द्यावे. तसेच कापूस पिकाची लागवड शिफारशीत तंत्रज्ञानानुसार करावी. विद्यापीठाने एल निनोच्या पार्श्वभूमीवर विविध पिकांसाठी विकसित केलेल्या पीक नियोजन सूत्रांचा वापर करून शेतकऱ्यांनी उत्पादनवाढ साध्य करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी बोलताना मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख यांनी विद्यापीठामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध विस्तार कार्यक्रमांची माहिती दिली. विद्यापीठ दर मंगळवार व शुक्रवार या दिवशी ऑनलाइन चर्चासत्रांचे आयोजन करीत असून, शेतकऱ्यांनी या चर्चासत्रांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन आपल्या शेतीविषयक समस्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच विद्यापीठाशी सातत्याने संपर्क ठेवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

प्रभारी अधिकारी डॉ. किरण जाधव यांनी तूर पिकाच्या उत्पादनवाढीसाठी आवश्यक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी आंतरपीक पद्धतीचा अवलंब, योग्य लागवड अंतर, पेरणीनंतर ४५ ते ६० दिवसांनी शेंडा खुडणी, लागवडीपूर्वी खतांचे नियोजन, सुधारित वाणांचा वापर तसेच बीजप्रक्रिया करून पेरणी करण्याचे महत्त्व स्पष्ट केले. या शिफारशींचा अवलंब केल्यास तूर पिकाचे अधिक उत्पादन घेणे शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.

मृदाशास्त्रज्ञ डॉ. सुदाम शिराळे यांनी खेत बचाओ अभियान” चे महत्त्व विशद करताना मातीचे आरोग्य जपण्यासाठी संतुलित खत व्यवस्थापन आवश्यक असल्याचे सांगितले. रासायनिक खतांसोबतच सेंद्रिय खते व जैविक निविष्ठांचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होते. तसेच उत्पादनवाढीसाठी जैविक खतांच्या वापराचे महत्त्व त्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले.

कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत यांनी येत्या खरीप हंगामात हुमणी किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या दिसून येणाऱ्या भुंग्यांच्या व्यवस्थापनापासूनच हुमणी नियंत्रणाची सुरुवात करावी, असे त्यांनी सांगितले. तसेच पीक संरक्षणासाठी आवश्यकतेनुसारच कीटकनाशकांची फवारणी करावी आणि एकात्मिक कीड व्यवस्थापन तंत्रांचा अवलंब करून उत्पादन खर्चात बचत करावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले.

तालुका कृषि अधिकारी श्री. नितीन घुगे यांनी कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शेतकरी कल्याणकारी योजनांची माहिती उपस्थितांना दिली.

या कार्यक्रमास गावातील सुमारे ४० शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यावेळी कृषि संशोधन केंद्र, बदनापूर यांच्या वतीने बीडीएन-७१६ या तूर वाणाच्या प्रात्यक्षिकासाठी निवडक शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वर्णेश्वर ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे सर्व सभासद तसेच संचालक श्री. दिलीप अंभोरे यांनी विशेष प्रयत्न केले.