संवर्धित शेती ही हवामान बदलावर प्रभावी उपाययोजना – माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत मृद
विज्ञान विभाग आणि भोपाळ येथील भारतीय मृदा विज्ञान संस्था यांच्या संयुक्त
विद्यमाने मराठवाड्यातील नैसर्गिक संसाधनांची उत्पादकता वाढविणे, हवामान बदलास अनुकूल तंत्रज्ञान विकसित करणे तसेच संवर्धित व शाश्वत
शेतीला चालना देण्याच्या उद्देशाने "नानाजी देशमुख कृषि
संजीवनी प्रकल्प" (पोकरा - PoCRA) अंतर्गत
शेतकऱ्यांच्या शेतावर संवर्धित शेतीशी संबंधित प्रयोग राबविण्यात येणार आहेत. या
पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि शेतकऱ्यांसाठी
विशेष ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दि. ३० जून २०२६ रोजी करण्यात आले. हा
प्रशिक्षण कार्यक्रम माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली
पार पडला.
या
प्रकल्पांतर्गत मराठवाड्यातील प्रमुख पिके सोयाबीन,
कापूस आणि मका यामध्ये आधुनिक प्रयोगशील तंत्रज्ञानाचा अवलंब
करण्यात येणार आहे. पारंपरिक मशागतीच्या तुलनेत कमी मशागत, शून्य
मशागत, ठिबक सिंचन पद्धती, बीजप्रक्रिया
तंत्रज्ञान आदी आधुनिक तंत्रांचा वापर करून उत्पादनक्षमता वाढविणे, तसेच जमिनीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म,
मृदा आरोग्य व तणांच्या प्रादुर्भावावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास
करण्यात येणार आहे.
यावेळी
मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी सांगितले की, हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर संवर्धित
शेतीसारख्या शाश्वत शेती पद्धतींचा अवलंब करणे अत्यावश्यक झाले आहे. नैसर्गिक
संसाधनांचे संवर्धन करतानाच उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी आधुनिक व नाविन्यपूर्ण
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याची गरज आहे.
पोकरा
प्रकल्पाचे मृद विज्ञान तज्ज्ञ डॉ. विजय कोळेकर यांनी सांगितले की, संवर्धित शेती ही दीर्घकालीन मृदा आरोग्यासाठी
प्रभावी पद्धत असून, या पद्धतीचे प्रमुख तत्त्व म्हणजे
अनावश्यक मशागत टाळणे होय. सलग दोन हंगाम नांगरणी न करता पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना
प्रोत्साहन देण्यासाठी पोकारा अंतर्गत विशेष योजना राबविण्यात येत असल्याची माहिती
त्यांनी दिली.
या प्रशिक्षण
कार्यक्रमात संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विभागप्रमुख डॉ.
हरिहर कौसडीकर, सहयोगी संचालक (संशोधन) डॉ. सूर्यकांत पवार,
सोयाबीन संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनील उमाटे, कापूस संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. अरविंद पंडागळे, उपसंचालक (संशोधन) डॉ. सुनिता पवार तसेच दीर्घकालीन खत प्रयोग योजनेचे
प्रभारी अधिकारी डॉ. रामप्रसाद खंदारे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
तज्ज्ञांनी मृदा आरोग्य व्यवस्थापन, मका लागवड तंत्रज्ञान,
सोयाबीन व कापूस लागवड तंत्रज्ञान, माती
परीक्षणाचे महत्त्व तसेच कृषि अवजारांचे प्रात्यक्षिक आदी विषयांवर सविस्तर माहिती
दिली.
सदर संशोधन
प्रयोगांसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सहाय्यक कर्मचाऱ्यांना तसेच निवड झालेल्या
शेतकऱ्यांना प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांपूर्वी आवश्यक प्रशिक्षण देण्याच्या
उद्देशाने या ऑनलाइन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मृद
विज्ञान विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर यांनी दिली.
या प्रशिक्षण
कार्यक्रमात मृद विज्ञान विभागातील अधिकारी व कर्मचारी, कृषि विद्यापीठातील विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी
तसेच प्रकल्पांतर्गत निवड करण्यात आलेले शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

