Sunday, June 14, 2026

वनामकृविच्या पशुसंवर्धन यांत्रिकीकरण योजनेद्वारे खेत बचाव अभियानांतर्गत नैसर्गिक शेती व बैलचलित सुधारित अवजारांचे प्रात्यक्षिक; शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 

माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माननीय केंद्रीय कृषी व किसान कल्याण मंत्री श्री शिवराज सिंह चौहानजी  यांच्या नेतृत्वात देशभर राबविण्यात येत असलेल्या खेत बचाओ अभियान” अंतर्गत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या अखिल भारतीय समन्वय संशोधन प्रकल्प (पशुसंवर्धन यांत्रिकीकरण योजना) यांच्या वतीने मौजे इट, ता. गेवराई, जि. बीड येथे गुगळा देवी ऑरगॅनिक फार्मिंग शेतकरी गटामार्फत शेतकरी जागरूकता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या पुढाकारातून तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी प्रकल्पाचे शास्त्रज्ञ व संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे यांनी केली.

कार्यक्रमामध्ये योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या विविध बैलचलित सुधारित कृषी अवजारांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे महत्त्व शेतकऱ्यांना समजावून सांगण्यात आले.

मार्गदर्शन करताना संशोधन अभियंता डॉ. दयानंद टेकाळे यांनी सांगितले की, शेतामध्ये उपलब्ध पशुधनापासून मिळणाऱ्या शेणाचा उपयोग करून तयार करण्यात येणाऱ्या गांडूळ खताचा वापर वाढवून रासायनिक खतांचा वापर कमी करणे आवश्यक आहे. तसेच योजनेद्वारे विकसित करण्यात आलेल्या सुधारित बैलचलित अवजारांचा वापर केल्यास इंधनावरील खर्चात मोठी बचत होऊन शेतीचा उत्पादन खर्च कमी करता येतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी गुगळा देवी शेतकरी गटाचे प्रमुख श्रीरामप्रसाद डोईफोडे यांच्यासह गटातील सर्व शेतकरी सभासद उपस्थित होते. तसेच योजनेचे पशुशास्त्रज्ञ डॉ. संदेश देशमुख, वरिष्ठ संशोधन सहाय्यक श्री अजय वाघमारे आणि टेक्निशियन श्री मंगेश खाडे उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित महिला व पुरुष शेतकऱ्यांनी योजनेद्वारे विकसित करण्यात आलेल्या सुधारित अवजारांचा वापर केल्यामुळे शेतीतील उत्पादन खर्च कमी करण्यात मदत झाली असून नैसर्गिक शेती पद्धती अवलंबण्यासाठी मोठे सहकार्य मिळत असल्याचे अनुभव व्यक्त केले.

या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये शाश्वत, पर्यावरणपूरक आणि कमी खर्चातील आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली, अशी माहिती आयोजकांनी दिली.