Friday, June 19, 2026

वनामकृविद्वारा एल-निनोच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेती तयारीसंदर्भात विभागीय कार्यशाळेचे आयोजन

 एल निनोच्या संभाव्य प्रभावाच्या पार्श्वभूमीवर खरीप नियोजनासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच पेरणी करावी : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि




यंदाच्या संभाव्य एल-निनो परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर कोरडवाहू शेतीचे योग्य नियोजन व तयारी याबाबत शेतकरी, कृषी अधिकारी आणि कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञांना मार्गदर्शन  करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी अंतर्गत अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प यांच्या पुढाकाराने विभागीय स्तरावरील एकदिवसीय ऑनलाइन कार्यशाळेचे दिनांक १९ जून २०२६ रोजी ऑनलाइन पद्धतीने आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी आणि विभागीय कृषी सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

कार्यशाळेस अध्यक्ष म्हणून माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते. तसेच संचालक संशोधन डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कृषी सहसंचालक श्री. सुनील वानखेडे आणि हैदराबाद येथील प्रकल्प समन्वयक डॉ. जे. व्ही. एस. प्रसाद यांची प्रमुख उपस्थित होती. 

मार्गदर्शन करताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी संभाव्य एल निनो परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच पेरणी करावी, असे आवाहन केले. पुढे ते म्हणाले की, या खरीप हंगामात पाण्याचा काटेकोर व आर्थिकदृष्ट्या विचारपूर्वक वापर करणे अत्यंत आवश्यक असून यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. राष्ट्रीय स्तरावर एल निनोचा प्रभाव महाराष्ट्रात, विशेषतः मराठवाड्यात अधिक जाणवण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने पर्जन्यमानात अनिश्चितता निर्माण होऊ शकते. त्यामुळे अतिवृष्टी, अल्पवृष्टी किंवा पावसात मोठा खंड पडण्याची शक्यता लक्षात घेऊन पेरणीचे नियोजन करावे. तसेच पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये, अन्यथा दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते. विद्यापीठ तसेच भारतीय हवामान विभागाच्या सूचनांनुसारच पेरणीचा निर्णय घ्यावा. मराठवाड्यातील विविध भागांनुसार पीक रचना वेगवेगळी असल्याने स्थानिक परिस्थितीनुसार पीक पद्धती स्वीकारणे आवश्यक आहे. विशेषतः कमी पाणी लागणारी, कमी कालावधीची आणि पाण्याचा ताण सहन करणारी पिके निवडावीत. तसेच आंतरपीक पद्धतीचा अवलंब करून आर्थिक जोखीम कमी करता येते.

माननीय कुलगुरूंनी सांगितले की, सध्याची हवामान परिस्थिती ही नवीन सामान्य (न्यू नॉर्मल) बनत असून त्याला सामोरे जाण्यासाठी एकात्मिक शेती पद्धती प्रभावी माध्यम ठरू शकते. केंद्र व राज्य शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक उपक्रम राबवत असून केंद्र शासनाचे “खेती बचाव अभियान” प्रभावीपणे सुरू आहे. या सर्व योजनांची अंमलबजावणी सर्व विभागांनी समन्वयाने करावी. उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता असली तरी कमीत कमी नुकसान कसे होईल यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मार्गदर्शन पोहोचविण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

आपत्कालीन पीक पद्धतीबाबत मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की, मराठवाड्यात सोयाबीन + तूर तसेच सोयाबीन + कापूस या आंतरपीक पद्धती लाभदायक ठरू शकतात. रुंद सरी-वरंबा पद्धती पाण्याचे नियोजन करण्यासाठी अत्यंत प्रभावी असून स्मार्ट सिंचन पद्धतींचा अवलंब करणे काळाची गरज आहे. शेततळे, ठिबक सिंचन, सूक्ष्म सिंचन व तुषार सिंचनाच्या माध्यमातून सिंचनाखालील क्षेत्राची क्षमता तिप्पट वाढू शकते, असे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग यांनी सांगितले की, पावसाचा अचूक अंदाज लक्षात घेऊन पिकांचे नियोजन करणे आवश्यक आहे. या परिस्थितीतही चांगले उत्पादन मिळण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन देणे ही शास्त्रज्ञांचे प्रमुख कार्य असून कोणत्याही औपचारिक परवानगीची वाट न पाहता आवश्यकतेनुसार तातडीने शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करावे, असे त्यांनी सुचविले.

डॉ. भगवान असेवार यांनी कोरडवाहू शेती यशस्वी करण्यासाठी आंतरपीक पद्धती, विहीर पुनर्भरण, योग्य वाणांची निवड आणि उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम केला पाहिजे असे सांगितले.

विभागीय कृषी सहसंचालक श्री. सुनील वानखेडे यांनी एल निनोच्या पार्श्वभूमीवर योग्य तंत्रज्ञान शेतकरी बंधू भगिनी यांना उपलब्ध करून देणे  आणि योग्य अंमलबजावणी साठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पावसाच्या आगमनानुसार पिकांची निवड, बीज प्रक्रिया, जैविक खतांचा वापर, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, तण व्यवस्थापन आणि शेततळे तंत्रज्ञान व उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर यावर भर द्यावा लागेल. यादृष्टीने दिलेली सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सर्व जण प्रयत्न करतील. असे मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक आणि आयोजना मागील पार्श्वभूमी कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्पाचे मुख्य  शास्त्रज्ञ  डॉ. आनंद गोरे यांनी मांडली.

कार्यक्रमाच्या तांत्रिक सत्रामध्ये विद्यापीठाचे शास्त्रज्ञ डॉ. दीपक पाटील, डॉ. सूर्यकांत पवार, डॉ. वसंत सूर्यवंशी, डॉ. कैलास डाखोरे, डॉ. अरविंद पांडागळे, प्रा. किशोर जगताप, डॉ.आनंद गोरे, डॉ. सुनील उमाटे,डॉ. गजेंद्र  जगताप, डॉ. विश्वनाथ खंदारे, डॉ. अंबिका मोरे, डॉ. गणेश गायकवाड, डॉ. एम. आर. मोरे,  डॉ. दीप्ती पाटगावकर, तसेच जालना कृषी विकास अधिकारी श्री. प्रभाकर बनसावडे, डॉ. गायकवाड, डॉ. प्रफुल्ल घंटे, डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. तुषार चव्हाण, डॉ. सचिन मंडलिक आणि प्रा. पंडित वासरे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ आणि कृषि विभाग अधिकारी यांनी अनेक समस्या उपस्थित केल्या त्यावर विद्यापीठ शास्त्रज्ञांनी तांत्रिक मार्गदर्शन केले.

यामध्ये प्रामुख्याने एल-निनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करून कोरडवाहू शेतीतील पीक नियोजन, पाणी व्यवस्थापन, हवामान बदलाशी सुसंगत तंत्रज्ञान आणि उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांबाबत या कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. 

सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. आनंद  गोरे आणि डॉ. पपीता गौरखेडे यांनी केले. कार्यक्रमास विद्यापीठातील विविध विभागांचे प्रमुख, कृषी विज्ञान केंद्रांचे प्रमुख, विभागीय कृषी विस्तार यंत्रणेतील शास्त्रज्ञ, विविध विषयांचे तज्ज्ञ, छत्रपती संभाजीनगर विभागातील सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी तसेच प्रगतशील शेतकरी असे शंभरहून अधिक कृषि विभाग अधिकारी, कृषि विज्ञान केंद्र, प्रगतशील शेतकरी, विद्यापीठ शास्त्रज्ञ  उपस्थित होते.