जैविक शेतीसाठी बायोमिक्स प्रभावी माध्यम.... माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि
शाश्वत, पर्यावरणपूरक
आणि जैविक शेतीला चालना देणाऱ्या परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाद्वारा
विकसित ‘बायोमिक्स’ या अभिनव जैविक उत्पादनाला आंतरराष्ट्रीय
स्तरावर मोठी पसंती आणि मान्यता मिळाली असून, हैदराबाद येथील
आंतरराष्ट्रीय अर्ध-शुष्क उष्णकटिबंधीय पीक संशोधन संस्था (ICRISAT –
International Crops Research Institute for the Semi-Arid Tropics) यांनी या उत्पादनाच्या ४ टन पुरवठ्याची मागणी नोंदविली आहे. ही बाब वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांच्या संशोधन
कार्यासाठी अत्यंत अभिमानास्पद मानली जात आहे.
या पार्श्वभूमीवर वसंतराव
नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथून इक्रीसॅट (ICRISAT), हैदराबाद येथे रवाना करण्यात येणाऱ्या
बायोमिक्सच्या ट्रकला विद्यापीठाचे माननीय
कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रवाना
करण्यात आले.
यानिमित्त बोलताना माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि म्हणाले की, बायोमिक्स हे जैविक
उत्पादन शाश्वत शेतीसाठी अत्यंत उपयुक्त ठरत असून, जमिनीची सुपीकता
वाढविणे, पिकांची वाढ अधिक सक्षम करणे तसेच रासायनिक
खतांवरील अवलंबित्व कमी करणे यामध्ये त्याची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. त्यामुळे
जैविक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी हे उत्पादन प्रभावी माध्यम ठरत आहे. जागतिक
स्तरावरील कृषि संशोधन संस्थांमध्ये अग्रगण्य असलेल्या ICRISAT कडून प्राप्त झालेली ही मागणी बायोमिक्सच्या गुणवत्ता, परिणामकारकता आणि उपयुक्ततेची आंतरराष्ट्रीय पातळीवरील अधिकृत पावती मानली
जात आहे. यामुळे बायोमिक्सला जागतिक बाजारपेठेत नवी ओळख मिळण्याबरोबरच देशातील
शेतकऱ्यांनाही आधुनिक आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा मोठा लाभ मिळणार आहे, असे नमूद
केले.
यानिमित्त विद्यापीठाचे
संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांनी बायोमिक्स संशोधन केंद्राचे
कौतुक करून अभिनंदन केले.
बायोमिक्सच्या ट्रक रवाना
करतेवेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य
(परभणी), सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी शिंदे (गोळेगाव),
वनस्पती रोगशास्त्र विभागप्रमुख डॉ. प्रफुल्ल घंटे, मृदाशास्त्र विभागप्रमुख डॉ. हरिहर कौसडीकर, बायोमिक्स
संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. चंद्रशेखर अंबाडकर तसेच संशोधन सहाय्यक कपिल
निर्वळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
या महत्त्वपूर्ण मागणीचे शेतकरी, कृषि तज्ज्ञ आणि कृषि क्षेत्रातील विविध घटकांकडून स्वागत करण्यात येत असून, आगामी काळात बायोमिक्सची देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मागणी मोठ्या प्रमाणात वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

.jpeg)