Saturday, June 6, 2026

वसमतला ‘करवंद नगरी’ बनविण्यासाठी वनामकृविचा पुढाकार : अन्न तंत्र महाविद्यालयात करवंद प्रक्रिया व मूल्यवर्धन चर्चासत्र उत्साहात संपन्न

 करवंद प्रक्रियेला उद्योगाचे स्वरूप देण्यासाठी समन्वय आवश्यक : माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या अन्न तंत्र महाविद्यालयात “करवंद प्रक्रिया आणि मूल्यवर्धन” या विषयावरील एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन दिनांक ४ जून २०२६ रोजी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि हे होते, तर प्रमुख उपस्थिती म्हणून शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार उपस्थित होते. यावेळी परभणी महानगरपालिकेचे नगरसेवक डॉ. केदार खटिंग यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

अध्यक्षीय भाषणात माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी वसमत तालुक्यातील करवंद उत्पादक शेतकरी, महिला बचत गट, युवा उद्योजक आणि अन्न तंत्र महाविद्यालय यांनी समन्वयाने कार्य करून करवंद प्रक्रियेला उद्योगाचे स्वरूप देण्याची आवश्यकता अधोरेखित केली. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या करवंद या पौष्टिक व औषधी गुणधर्म असलेल्या फळाचे वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया, मूल्यवर्धन आणि ब्रँडिंग केल्यास ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ मिळू शकतो, असे त्यांनी सांगितले. भविष्यात वसमत तालुक्याची ओळख “करवंद नगरी” म्हणून राज्यभर निर्माण व्हावी, असे प्रतिपादन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी हवामान बदल आणि सध्या जगासमोर उभ्या असलेल्या ‘एल निनो’ संकटाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी हवामानानुरूप शेती पद्धती अवलंबण्याचे आवाहन केले. जलसंधारण, मृदसंवर्धन, अधिकाधिक वृक्षलागवड आणि जैविक तसेच सेंद्रिय शेतीचा स्वीकार ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करून शाश्वत शेतीस प्रोत्साहन देणे आवश्यक असून “खेती बचाओ अभियान” हे पर्यावरण संरक्षण, मातीची सुपीकता आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार यांनी करवंद लागवडीत कमी खर्चात अधिक उत्पन्न मिळविण्याच्या संधी तसेच प्रक्रियेद्वारे नफा वाढविण्याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

डॉ. केदार खटिंग यांनी करवंद उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रक्रियायुक्त पदार्थ निर्मिती व मूल्यवर्धन क्षेत्रात अन्न तंत्र महाविद्यालयाचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेश क्षीरसागर यांनी प्रास्ताविकातून कार्यशाळेचा हेतू व उद्देश स्पष्ट केला. चर्चासत्रातील तांत्रिक सत्रात उद्यानविद्या महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. व्ही. एस. खंदारे यांनी करवंद लागवडीचे तंत्र आणि त्यामधील आवश्यक काळजी याबाबत सविस्तर माहिती दिली.

कार्यशाळेत उपस्थित करवंद उत्पादक शेतकरी श्री. साखरे यांनी करवंद प्रक्रियेसाठी आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन तसेच प्रक्रियायुक्त पदार्थांचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी विद्यापीठाने व्यापक जनजागृती करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच परिपक्व करवंद फळांच्या काढणीसाठी विद्यापीठाने विशेष काढणी यंत्र विकसित करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून एकमुखाने करण्यात आली.

यावेळी करवंद लागवड व प्रक्रिया उद्योगातील प्रगतिशील शेतकरी श्री. सदाशिव अडकिने यांनी करवंद प्रक्रिया उद्योग उभारणीतील प्रत्यक्ष अडचणी तसेच उद्योग यशस्वी करण्यासाठी आवश्यक बाबींवर मार्गदर्शन केले.

चर्चासत्राच्या समन्वयक अधिकारी डॉ. अनुप्रिता जोशी यांनी करवंद प्रक्रिया व त्यापासून तयार होणाऱ्या विविध मूल्यवर्धित पदार्थांबाबत सखोल मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचे निरसन केले.

विभाग प्रमुख डॉ. के. एस. गाडे यांनी प्रक्रियायुक्त पदार्थांच्या विक्रीसाठी आवश्यक परवाने, गुणवत्ता चाचणी तसेच उत्पादनांच्या टिकवणक्षमतेबाबत सविस्तर विश्लेषण केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. प्रीती ठाकूर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक डॉ. अनुप्रिता जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.

या कार्यशाळेस महाविद्यालयातील विभाग प्रमुख डॉ. विजया पवार, डॉ. बी. एस. आगरकर तसेच इतर प्राध्यापक, विद्यार्थी आणि वसमत तालुक्यातील करवंद लागवड करणारे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.