वसंतराव नाईक मराठवाडा
कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी खरपुडी (जि.
जालना) येथील कृषि विज्ञान केंद्रास दिनांक
२४ जून २०२६ रोजी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत शिक्षण संचालक डॉ.
भगवान आसेवार, मराठवाडा शेती सहाय्य
मंडळाचे अध्यक्ष श्री. राजेंद्रजी बारवाले, संस्थेचे सचिव
कृषिरत्न मा. श्री. विजयआण्णा बोराडे, संस्थेचे विश्वस्त तथा
कृषिभूषण मा. भगवानदादा काळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.
विकास देशमुख, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख
प्रा. श्रीकृष्ण सोनुने यांच्यासह केंद्रातील शास्त्रज्ञ उपस्थित होते.
याप्रसंगी
माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांनी कृषि विज्ञान केंद्रामार्फत कार्यरत असलेल्या रेशीम
हातमाग प्रशिक्षण केंद्रास भेट दिली. येथे त्यांनी हातमागावर प्रत्यक्ष काम
करणाऱ्या महिलांशी संवाद साधून त्यांच्या कार्याची माहिती जाणून घेतली. तसेच कृषि विज्ञान केंद्राच्या संपर्कातील प्रगतशील शेतकरी
व महिला उद्योजकांनी उभारलेल्या प्रदर्शन स्टॉलची पाहणी करून त्यांना मार्गदर्शन
केले.
ग्रामीण
भागातील केवळ आठवी ते दहावी शिक्षण घेतलेल्या महिला आज आठ दिवसांत १५ ते २० हजार
रुपये किमतीची पैठणी साडी तयार करत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. सदर
रेशीम हातमाग प्रशिक्षण केंद्रासाठी जिल्हा नियोजन मंडळामार्फत ५० लाख रुपयांचे
अर्थसहाय्य प्राप्त झाले असून, त्याचप्रमाणे मराठवाडा शेती सहाय्य मंडळानेही तितकीच रक्कम खर्च करून
महाराष्ट्रातील एकमेव नावीन्यपूर्ण उपक्रम कृषि विज्ञान केंद्रामार्फत सुरू केल्याची माहिती कृषि
विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व
प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांनी दिली.
या प्रशिक्षण
केंद्रातून ३० महिलांची पहिली बॅच ९० दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण करून बाहेर पडली असल्याची
माहिती विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) श्री. अजय मिटकरी यांनी दिली. भविष्यात या
महिलांचे नामांकित कंपन्यांसोबत समन्वय (टाय-अप) करून त्यांना स्वयंरोजगाराच्या
अधिक संधी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे यावेळी संबंधितांनी सांगितले.

.jpeg)



.jpeg)