Saturday, June 6, 2026

वनामकृविच्या ऑनलाइन शेतकरी-शास्त्रज्ञ संवादात ‘१० ड्रम थिअरी’द्वारे नैसर्गिक शेतीचे मार्गदर्शन

 माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून संवादाचा १०१ व्या भागाचे यशस्वी आयोजन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालय तसेच मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित कृषि विज्ञान केंद्र, लातूर यांच्या वतीने दिनांक ५ जून २०२६ रोजी आभासी माध्यमाद्वारे शेतकरी-शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रमाच्या १०१ व्या भागाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे आयोजन विद्यापीठाचे माननीय कुलगुरू प्रा. (डॉ.) इन्द्र मणि यांच्या प्रेरणेतून तसेच विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत देशमुख आणि प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्री. एस. बी. देशमुख यांनी केले.

कार्यक्रमात हरंगुळ (ता. जि. लातूर) येथील श्रमनिष्ठा जैव-निविष्ठा संसाधन केंद्राचे प्रमुख तथा “बायोचार” विषयावरील उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी श्री. शरद पवार यांनी नैसर्गिक शेतीसाठी “१० ड्रम थिअरी” या विषयावरील यशोगाथा सांगून सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस केंद्राचे प्रभारी वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख श्री. संदीप देशमुख यांनी श्री. शरद पवार यांच्या शेतीतील नाविन्यपूर्ण जैव-निविष्ठा संसाधन केंद्राच्या कार्याची माहिती दिली. तसेच त्यांनी उत्पादित केलेल्या नैसर्गिक निविष्ठांचा वापर पिकांवरील विविध कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी केल्यास उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होत असल्याचे सांगून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात त्याचा वापर करावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमास डॉ. तुकाराम मोटे, माजी विभागीय कृषि सहसंचालक, छत्रपती संभाजीनगर यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी डॉ. मोटे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना नैसर्गिक निविष्ठा तयार करण्यासाठी प्रशिक्षण घेऊन शास्त्रोक्त पद्धतीने निविष्ठा तयार करणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले.

या ऑनलाईन कार्यक्रमात एकूण ५७ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. नैसर्गिक शेतीतील जैव-निविष्ठांचे महत्त्व, बायोचार निर्मिती व त्याचा वापर याबाबत शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध शंकांचे निरसन करून घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. बेद्रे एस. बी. यांनी केले.